तरुण भारत

सुरळीत पाणीपुरवठय़ास दिरंगाई, निम्म्या शहरात पाणीटंचाई

अनगोळ-भाग्यनगर, सातवा क्रॉस येथील नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

पाणीपुरवठा कामगारांच्या आंदोलनाचा फटका संपूर्ण शहरवासियांना बसला आहे. आंदोलन मागे घेऊन तीन दिवस उलटले तरी शहरातील विविध भागात अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. आठवडय़ापासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने संताप क्यक्त करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी उमटली असून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

वेतन वेळेत दिले नाही आणि सेवेत कायम केले नसल्याने एल ऍण्ड टीकडे काम करणाऱया पाणीपुरवठा कामगारांनी सोमवारपासून आंदोलन छेडले होते. पगार देण्याचे आश्वासन एल ऍण्ड टी कंपनीने दिले. मात्र सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी मनपा कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच दुसऱया दिवशी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते. शनिवार सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी सांगितले होते. पण सोमवार उजाडला तरी शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा झाला नाही. चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही भागात आठवडा झाला तरी पाणी नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः बाजारपेठ परिसरासह बहुतांश भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्यासाठी भटंकती करण्याची वेळ आली. ऐन गणेशोत्सवात पाणी नसल्याने शहरवासियांचे हाल झाले आहेत.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहरवासियांना पाणीपुरवठा कामगारांच्या आंदोलनाची झळ बसली आहे. वेळेवर पगार देण्यास एल ऍण्ड टी कंपनीने चालढकल केली. मात्र याचा त्रास शहरवासियांना सोसावा लागत आहे. शहराच्या उपनगर भागात चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उपनगर परिसरातील रहिवासी चोवीस तास पाणीपुरवठय़ावर अवलंबून असतात. गेल्या 12 वर्षांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याने विहिरी किंवा कूपनलिकांचा अवलंब केला जात नाही. पण अचानक आठ दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणाऱया अनगोळ, टिळकवाडी, शाहूनगर, सदाशिवनगर अशा विविध भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे शहराच्या अंतर्गत भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पण आठवडय़ापासून पाणी नसल्याने सणासुदीतच पाण्यासाठी भटकंती करावी लागली.

 कामगारांची उद्धट उत्तरे

शुक्रवारी दुपारी आंदोलन मागे घेतल्यानंतर शनिवारी सकाळपासून विविध भागात पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले होते. पण अनगोळ, भाग्यनगर सातवा क्रॉस, चव्हाट गल्ली परिसर, टिळकवाडी, हनुमाननगर, शहापूर अशा बहुतांश भागात सोमवारी सकाळपर्यंत नळाला पाणी आले नाही. त्यामुळे चव्हाट गल्ली परिसरातील नागरिकांनी आंबेडकर उद्यानातील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात चौकशी केली व पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी केली असता कामगारांनी उद्धट उत्तरे दिली असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

एल ऍण्ड टी कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी

अनगोळ, भाग्यनगर, टिळकवाडी परिसरात नळाला पाणी आले नसल्याने भाग्यनगर सातवा क्रॉस परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढला. आठ दिवसांपासून पाणी नसल्याने हाल होत आहेत. चोवीस पाणीपुरवठा करण्यात येणाऱया भागात एक तासही पाणीपुरवठा केला जात नाही. आजूबाजूच्या विविध परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. मात्र सातवा क्रॉस परिसरातच पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही? असा जाब नागरिकांनी अधिकाऱयांना विचारला. सर्व भागातील पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे सर्वत्र टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असे सांगून अधिकाऱयांनी वेळ मारून नेली. एल ऍण्ड टी कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत असून कंपनीने पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार हाती घेतल्यापासून नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अशी टीका करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सायकली नित्कृष्टच

Patil_p

आतापर्यंत 20 कोटी घरपट्टी जमा

Patil_p

राम मंदिरसाठी रविवारपासून निधी संकलन अभियान

Patil_p

महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कायम

Patil_p

बेकिनकेरे नागनाथ मंदिराचा तिसरा वर्धापन दिन साजरा

Patil_p

अखेर पॅसेंजर रेल्वे सुरू…पण शेडबाळपर्यंतच

Amit Kulkarni
error: Content is protected !!