तरुण भारत

एकतर्फी विजयासह दिल्ली पुन्हा ‘टॉप’वर

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 8 गडी राखून विजय

दुबई / वृत्तसंस्था

Advertisements

शिखर धवन (42), श्रेयस अय्यर (नाबाद 47), रिषभ पंत (नाबाद 35) यांची फटकेबाजी आणि रबाडा (3-37), अक्षर पटेल (2-21), नॉर्त्झे (2-12) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी येथील आयपीएल साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान काबीज केले.

प्रथम फलंदाजी करणाऱया हैदराबादला दिल्लीने 9 बाद 134 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखले आणि प्रत्युत्तरात 17.5 षटकात अवघ्या 2 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले.

विजयासाठी 135 धावांचे किरकोळ आव्हान असतान दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (11) स्वस्तात बाद झाला. मात्र, हैदराबादच्या गोलंदाजांसाठी हा आनंद फार काळ टिकून राहू शकला नाही. पुढे धवन (37 चेंडूत 42) व श्रेयस अय्यर (41 चेंडूत नाबाद 47) यांनी दुसऱया गडय़ासाठी 52 धावा जोडत निम्मा रस्ता सर करुन दिला. धवन रशिदच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने रिषभ पंतच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. हैदराबादर्फे खलील अहमद व रशिद खान यांना प्रत्येकी 1 गडी बाद करता आला.

दिल्लीचा भेदक मारा

सनरायजर्सने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, तो त्यांच्यावर उलटल्याचे पहिल्या 5 षटकातच स्पष्ट झाले. प्रारंभी, नॉर्त्झेने किंचीत उसळलेल्या चेंडूवर डावखुऱया वॉर्नरला पटेलकरवी झेलबाद करत पहिला धक्का दिला तर 5 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रबाडाने साहाला मिडविकेटवरील धवनकरवी झेलबाद करत दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतलेले असतील, याची तजवीज केली. साहा व विल्यम्सन यांनी 29 धावांची भागीदारी केली.

मधल्या फळीत केन विल्यम्सन (26 चेंडूत 18) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर लाँगऑफवरील हेतमेयरकडे झेल देत बाद होण्यापूर्वी सातत्याने झगडत राहिला. अनुभवी मनीष पांडेला (16 चेंडूत 17) देखील मोठी खेळी साकारता आली नाही. या उभयतांनी तिसऱया गडय़ासाठी 31 धावा जोडल्या. केदार जाधवला नॉर्त्झेने अवघ्या 3 धावांवर पायचीत केले. त्या तुलनेत अब्दुल समदने 21 चेंडूत जलद 28 धावांचे योगदान दिले. त्याच्या खेळीत 2 चौकार, 1 षटकाराचा समावेश राहिला.

अष्टपैलू जेसॉन होल्डरला (10) फार काळ टिकून राहता आले नाही. तो आणखी एकदा बिग फ्लॉप ठरला. रशीदने 19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 22 धावा फटकावल्या. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता. संदीप शर्मा डावातील शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला तर भुवनेश्वर 5 धावांवर नाबाद राहिला. दिल्ली कॅपिटल्सतर्फे कॅगिसो रबाडाने 37 धावात 3 तर ऍनरिच नॉर्त्झे (2-21), अक्षर पटेल (2-21) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत हैदराबादच्या डावाला सातत्याने सुरुंग लावला.

धावफलक

सनरायजर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. पटेल, गो. नॉर्त्झे 0 (3 चेंडू), वृद्धिमान साहा झे. धवन, गो. रबाडा 18 (17 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), केन विल्यम्सन झे. हेतमेयर, गो. पटेल 18 (26 चेंडूत 1 चौकार), मनीष पांडे झे. व गो. रबाडा 17 (16 चेंडूत 1 चौकार), केदार जाधव पायचीत गो. नॉर्त्झे 3 (8 चेंडू), अब्दुल समद झे. पंत, गो. रबाडा 28 (21 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), जेसॉन होल्डर झे. शॉ, गो. पटेल 10 (9 चेंडूत 1 षटकार), रशीद खान धावचीत (बदली खेळाडू स्मिथ-पंत) 22 (19 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), भुवनेश्वर कुमार नाबाद 5 (3 चेंडूत 1 चौकार), संदीप शर्मा धावचीत (पंत) 0 (1 चेंडू). अवांतर 13. (बाईज 1, लेगबाईज 6, नोबॉल 3, वाईड 3) एकूण 20 षटकात 9 बाद 134.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (वॉर्नर, 0.3), 2-29 (साहा, 4.6), 3-60 (विल्यम्सन, 9.5), 4-61 (पांडे, 10.1), 5-74 (केदार जाधव, 12.6), 6-90 (होल्डर, 15.1), 7-115 (समद, 18.2), 8-133 (रशीद, 19.4), 9-134 (संदीप शर्मा, 19.6).

गोलंदाजी

ऍनरिच नॉर्त्झे 4-0-12-2, अवेश खान 4-0-27-0, अक्षर पटेल 4-0-21-2, कॅगिसो रबाडा 4-0-37-3, मार्कस स्टोईनिस 1.1-0-8-0, रविचंद्रन अश्विन 2.5-0-22-0.

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. विल्यम्सन, गो. अहमद 11 (8 चेंडूत 2 चौकार), शिखर धवन झे. अब्दुल समद, गो. रशीद 42 (37 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर नाबाद 47 (41 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), रिषभ पंत नाबाद 35 (21 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार). अवांतर 4 (वाईड 4). एकूण 17.5 षटकात 2 बाद 139.

गडी बाद होण्याचा क्रम

1-20 (पृथ्वी शॉ, 2.5), 2-72 (धवन, 10.5).

गोलंदाजी

खलील अहमद 4-0-33-1, भुवनेश्वर कुमार 3-0-21-0, जेसॉन होल्डर 3.5-0-33-0, रशिद खान 4-0-26-1, संदीप शर्मा 3-0-26-0.

Related Stories

खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटचा अर्ज

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्ज संघात बेहरेनडॉर्फचा समावेश

Patil_p

सलामी लढतीत ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिका आमनेसामने

Patil_p

भारतीय महिला संघाचा सलग तिसरा पराभव

Patil_p

‘खेलो इंडिया’ हिवाळी क्रीडास्पर्धा गुलमर्गमध्ये

Amit Kulkarni

शान मसूद मानांकनात 19 व्या स्थानावर

Patil_p
error: Content is protected !!