तरुण भारत

बेळगुंदी-सोनोली रस्त्याची दैना,नागरिकांना नरकयातना!

पाच वर्षांपासून दुर्लक्षित रस्त्यावर एक फूट खोल खड्डे : रस्त्याबाबत नागरिकांना गावकऱयांकडून सावधानतेचा इशारा

वार्ताहर /किणये

Advertisements

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेडय़ाकडे चला असा संदेश दिला होता. कारण खरा भारत हा ग्रामीण भागातच आहे. ग्रामीण भागाच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे. यामुळे ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी प्रयत्न करा, असेही सांगितले होते. मात्र, पश्चिम भागातील बेळगुंदी-सोनोली या रस्त्याची अवस्था पाहिल्यास या भागाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांपासून रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. नागरिक वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करून थकले आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? असा सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.

बेळगाव-राकसकोप रस्त्यावरील बेळगुंदी व सोनोली गावानजीकचा रस्ता पूर्ण खड्डेमय बनला आहे. रस्त्यावर सुमारे एक फुटापर्यंत खोल खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणीही साचले आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जणू नरकयातनाच सहन कराव्या लागत आहेत.

रस्त्यावर यापूर्वी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. सध्या बेळगुंदी व सोनोली या गावांकडे जाणे म्हणजे जोखमीचे ठरू लागले आहे. कारण या रस्त्यावर किरकोळ अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खड्डय़ांमुळे दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. काही जण तर आपल्या मित्रमंडळी व पाहुण्यांना थेट सांगू लागले आहेत की ‘सावधान! बेळगुंदी-सोनोलीला जाताय, मार्ग खड्डय़ांचाच आहे’. त्यामुळे सांभाळून जा, असा सल्लाही काही जण देताना दिसत आहेत.

बेळगुंदी रस्त्यावर बोकनूर क्रॉसनजीक ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सोनोली गावानजीक रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे. गेल्या मुसळधार पावसात सोनोली गावानजीकच्या नाल्यावर पाणी आले होते. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरित त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत
आहे.

बेळगुंदी, बोकनूर, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बिजगर्णी, बेळवट्टी, इनाम बडस आदी गावांतील वाहनधारकांची या रस्त्यावरून रोज मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. पश्चिम भागातील बेळगुंदी हे गाव अनेक गावांसाठी केंद्रबिंदू असल्याने या गावाशी विविध कामानिमित्त अनेकांचा संपर्क येतच असतो. त्यामुळे बेळगुंदीला ये-जा करणाऱयांची संख्याही लक्षणीय असते. पण खड्डेमय रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारक अक्षरशः वैतागून गेले आहेत.

खड्डय़ांना ग्रामस्थ वैतागल

बेळगुंदी-राकसकोप या रस्त्याच्या कामकाजाचा शुभारंभही गेल्या काही महिन्यांपूर्वी झाला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूने गटारींचे काम करण्यात आले आहे. मात्र, गटारी बांधण्याचे काम व रस्त्याचे काम सद्यस्थितीत अर्धवट राहिले आहे. रस्त्यावर सध्या असलेल्या खड्डय़ांमुळे आम्ही ग्रामस्थ पार वैतागून गेलेलो आहे. लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आम्हा सोनोली व बेळगुंदी गावातील नागरिकांचे हाल पाहून संबंधित अधिकाऱयांनी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी आमची मागणी असल्याचे मत विश्वनाथ चव्हाण यांनी या संदर्भात मांडले.

Related Stories

दहावीची गुणवत्ता वाढविण्यासाठी नियोजन करा

Amit Kulkarni

निवडणूक जाहिरातींवर लक्ष देण्याची जिल्हाधिकाऱयांची सूचना माहिती-प्रसारण विभागाला दिली भेट

Omkar B

बेळगाव जिह्यात शुक्रवारी 94 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

सुवर्णसिंहासनाच्या कर्तव्यनिधीचा ओघ सुरूच

Patil_p

कारवार जिल्हय़ात एका दिवसात 81 बाधित

Patil_p

कोरोनाचा आलेख चढणार की घटणार?

Patil_p
error: Content is protected !!