तरुण भारत

‘यलो आर्मी’विरुद्ध विजयाच्या ट्रकवर परतण्याचे आरसीबीसमोर आव्हान

आयपीएल साखळी सामना : मागील लढतीत मुंबईला नमवल्याने चेन्नईचे मनोबल उंचावलेले, आरसीबीला फलंदाजीची मुख्य चिंता

वृत्तसंस्था /शारजाह

Advertisements

एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या, मात्र मागील सामन्यात दणकून पराभव पत्कराव्या लागलेल्या आरसीबीसमोर आज आयपीएल साखळी सामन्यात बलाढय़ चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार आहे. आरसीबीला केकेआरविरुद्ध मागील लढतीतील पराभवाच्या जखमा विसरुन नव्याने सुरुवात करावी लागेल तर चेन्नईने यापूर्वी विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सला नमवले असल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले असणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता आजच्या लढतीला प्रारंभ होईल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला प्रामुख्याने फलंदाजीत व्यापक सुधारणा करावी लागेल, हे निश्चित आहे. तसे झाले तरच गुणतालिकेत पहिल्या 4 संघात स्थान कायम राखणे त्यांना शक्य होईल. सलामीवीर देवदत्त पडिक्कल (217 धावा) व कर्णधार विराट कोहली (203 धावा) यांनी सॉलिड ओपनिंग देणे महत्त्वाचे असेल, त्याचप्रमाणे, मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल (233 धावा) व एबी डीव्हिलियर्स (207 धावा) यांना सूर गवसणे देखील क्रमप्राप्त असणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलने आयपीएलच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा जमवत लिलावात मिळालेली मोठी रक्कम सार्थकी असेल, याची तजवीज केली. आता तो आणि डीव्हिलियर्स हे तुफानी खेळी साकारण्यासाठी आसुसलेले असतील. आरसीबी गोलंदाजांना येथे केकेआरविरुद्धचे खराब प्रदर्शन विसरावे लागेल. त्या लढतीत पेसर्स मोहम्मद सिराज, हर्षल पटेल यांनी उत्तम गोलंदाजी केली. मात्र, काईल जेमिसन, यजुवेंद चहल, वणिंदू हसरंगा यांनी षटकामागे 10 पेक्षा अधिक गतीने धावा दिल्या.

चेन्नईला फलंदाजीत चिंता

चेन्नईतर्फे त्या लढतीत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला सूर सापडला नसता तर त्यांना विजयासाठी थोडेफार प्रयास निश्चितच करावे लागले असते. ऋतुराजने त्यावेळी अवघ्या 58 चेंडूत 88 धावांची आतषबाजी केली होती. फॅफ डय़ू प्लेसिस, मोईन अली मात्र शून्यावर बाद झाले तर अम्बाती रायुडूला दुखापतीमुळे शून्यावरच निवृत्त व्हावे लागले होते. अनुभवी सुरेश रैना व धोनी हे देखील दुहेरी धावसंख्येपासून दूर राहिले आणि एकवेळ चेन्नईची 4 बाद 24 अशी दाणादाण उडाली होती. गायकवाडने मात्र संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधत संघाला 6 बाद 156 अशी सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली होती.

त्याने अष्टपैलू रविंद्र जडेजा व डेव्हॉन ब्रेव्हो यांच्यासह दमदार भागीदारी साकारली. यामुळे संघाला 150 धावांचा टप्पा सर करता आला होता. या छोटय़ा धावसंख्येचे संरक्षण करण्यात नंतर चेन्नईचा संघ आश्चर्यकारकरित्या यशस्वी ठरला होता. दीपक चहर व डेव्हॉन ब्रेव्हो यांनी त्यावेळी ‘यलो आर्मी’ची ताकद दाखवत हंगामातील सहावा विजय संपादन करुन दिला. येथे विजय संपादन केल्यास चेन्नईचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान होऊ शकेल. चेन्नईकडे येथे युवा इंग्लिश अष्टपैलू सॅम करणचा पर्यायही उपलब्ध असेल. सॅम करण मागील हंगामात फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर मागील आयपीएलमध्ये ब्रेकआऊट स्टार ठरला होता.

संभाव्य संघ

चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अम्बाती रायुडू, रविंद्र जडेजा, डेव्हॉन ब्रेव्हो, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, दीपक चहर, इम्रान ताहीर, फॅफ डय़ू प्लेसिस, रॉबिन उत्थप्पा, कर्ण शर्मा, जोश हॅझलवूड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, कृष्णप्पा गौतम, मिशेल सॅन्टनर, रविश्रीनिवासन साई किशोर, हरी निशांत, एन. जगदीशन, चेतेश्वर पुजारा, केएम असिफ, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तियन, रजत पाटीदार, दुष्मंत चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वणिंदू हसरंगा, जॉर्ज गॅरटॉन, यजुवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काईल जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, टीम डेव्हिड, आकाश दीप, एबी डीव्हिलियर्स.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.

Related Stories

केन विल्यम्सनच्या शतकाने न्यूझीलंड भक्कम स्थितीत

Patil_p

अफगाणची आयर्लंडवर विजयी आघाडी

Patil_p

ऑल इंग्लंड बॅडमिंटनसाठी भारतीय पथकाला परवानगी

Patil_p

टी-20 मानांकनातील कोहलीचे स्थान स्थिर

Amit Kulkarni

भारत-दक्षिण आफ्रिका आज दुसरा वनडे सामना

Amit Kulkarni

ब्रिटनचा कॅमेरून नोरी विजेता

Patil_p
error: Content is protected !!