तरुण भारत

काँग्रेसमध्ये गृहकलह सुरुच

लुईझिन फालेरो-प्रशांत किशोर यांची भेट : काँग्रेसचे अनेक नेते तृणमुलच्या संपर्कात

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

तृणमुल काँग्रेसचे दोन खासदार गोव्यात पोहोचल्यानंतर काँग्रेस पक्षात गृहकलह चालूच आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते लुईझिन फालेरो यांनी आपण तृणमृल काँग्रेसच्या नेत्यांना भेटलेलो नाही आणि आपण आजपर्यंत तरी काँग्रेस पक्षात आहे, असे निवेदन केले. नवी दिल्लीहून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी लुईझिन फालेरो यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये अशी विनंती त्यांना केली.

 दरम्यान, दिल्लीत गेलेल्या विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राहुल गांधींबरोबर सुमारे तासभर चर्चा केली. उपलब्ध माहितीनुसार तृणमृल काँग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

तृणमृल काँग्रेसचे खासदार गोव्यात पोहोचल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात गृहकलह उफाळून वर आला आहे. आगामी निवडणुकीपर्यंत काँग्रेसमधून आणखी तीन नेते बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस पक्षातील संघर्ष आणखी तीव्र होत असून माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना तृणमृल काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. या बातमीने सर्वत्र खळबळ माजली.

प्रशांत किशोर यांना भेटलो : फालेरो

या संदर्भात लुईझिन फालेरो यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण प्रशांत किशोर या राजकीय रणनितीकार यांना भेटल्याचे मान्य केले. त्याचबरोबर गोव्यातील बहुतेक सर्व काँग्रेसचे नेते प्रशांत किशोर यांना भेटलेले आहेत असे ते म्हणाले. आपण आजपर्यंत काँग्रेस पक्षातच आहे. गेली 40 वर्षे या पक्षातून सेवा बजावित आहे आणि आजपावेतो या पक्षात आहे.

तृणमुलच्या नेत्यांना भेटलो नाही

आपण कोणताही निर्णय घेण्याअगोदर माझ्या मतदारांना आपण विश्वासात घेणार असे फालेरो यांनी सांगितले. आपण तृणमृल काँग्रेस पक्षात जाणार का? असे विचारले असता ते जोरजोरात हसले. आपण तृणमृलच्या एकही नेत्याशी चर्चा केलेलीच नाही, असे ते पुढे म्हणाले.

सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार तृणमुलच्या खासदारांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची भेट झाली की नाही याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेस नेत्यांची राहुल गांधी यांच्याशी भेट

राज्यातील ताज्या राजकीय घडामोडीमध्ये काँग्रेस पक्षातील बहुतेक नेते दुसरीकडे वळण्याची शक्यता असून यामुळे निवडणुकीपूर्वीच हा गोव्यातील सर्वात मोठा पक्ष मोकळा होतोय की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राहुल गांधीबरोबर सुमारे तासभर गोव्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यावेळी पी. चिदंबरम् हे देखील उपस्थित होते.

निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा केली : कामत

दिगंबर कामत यांच्याशी रात्री उशिरा संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही गोव्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा केली. या बैठकीनंतर पी. चिदंबरम यांच्याबरोबर आणखीन एक स्वतंत्र बैठक झाली. या नंतर दिनेश गुंडूरावर यांच्याबरोबर देखील स्वतंत्र बैठक घेतली, असे दिगंबर कामत म्हणाले.

तृणमुलचे लक्ष्य ख्रिस्ती मतदार-ख्रिस्ती नेत्यांवर

सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार तृणमुलचे लक्ष्य ख्रिस्ती मतदार व ख्रिस्ती नेत्यांवर आहे. ते जास्तीत जास्त ख्रिस्ती नेत्यांना भेटत असून काँग्रेसची ख्रिस्ती मतदारांवरील मक्तेदारी निसटून जाते की काय, या भीतीने काँग्रेस नेत्यांची धांदल उडाली आहे. दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉटेलवर तृणमुलचे दोन खासदार वास्तव्य करीत आहेत. शुक्रवारी ते पणजीत येऊन काँग्रेसच्या काहीजणांना भेटून गेले. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या दोन मोठय़ा नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांची अलीकडेच भेट घेतली होती.

Related Stories

ऍम्ब्युलन्समध्येच झाला बाळाचा जन्म…

Patil_p

पेडणे पालिका नगराध्यक्षपदी उषा नागवेकर तर उपनगराध्यक्षपदी मनोज हरमलकर यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

गोव्याचे 54 कोटीचे कर्जरोखे विक्रीस

Omkar B

बार्देश तालुक्याचा ताबा पुन्हा समितीकडे सुपूर्द करा

Patil_p

गोव्याचे दोन्ही ज्युनियर्स संघ राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उप-उपान्त्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

आता जनतेनेच परिवर्तन घडवून आणावे

Omkar B
error: Content is protected !!