तरुण भारत

ग्रामीण भागात बससेवेचा बोजवारा

अपुऱया व अनियमित बसफेऱयांमुळे विद्यार्थी-प्रवाशांची गैरसोय, परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी

Advertisements

ग्रामीण भागात बससेवेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. अनियमित व अपुऱया बसफेऱयांमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी ज्या भागात अपुऱया व अनियमित बसफेऱया आहेत, त्याकडे जातीनिशी लक्ष देऊन बससेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासीवर्गातून होत आहे.

अपुऱया व अनियमित बसफेऱयांमुळे प्रवाशांना तासन् तास बसथांब्यावर ताटकळत बसावे लागत आहे. तालुक्मयातील काही गावांचा अपवाद वगळता बहुतांशी भागात सुरळीत बसफेरी नाहीच. यामुळे प्रवासीवर्ग वैतागून गेला आहे.

बेळवट्टी, बोकनूर, इनाम बडस या भागातील प्रवासी व विद्यार्थ्यांना अपुऱया अनियमित बससेवेचा सामना करावा लागतो आहे. बस कधीही वेळेवर येत नसल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. सध्या शाळा व कॉलेज सुरू झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरातील हायस्कूल व कॉलेजला येऊ लागले आहेत. मात्र, वेळेत बस नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर होतो. तसेच घरी परतण्यासही उशीर होऊ लागला आहे.

विद्यार्थ्यांना बस वेळेत मिळत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ लागले आहे. याचबरोबर आपला मुलगा, मुलगी शाळा-कॉलेजमधून घरी परतल्यास उशीर होत असल्याने पालकवर्गामध्येही चिंता पसरू लागली आहे.

पश्चिम भागाच्या काही गावातून विद्यार्थी व प्रवासी रोज बेळगावला ये-जा करतात. मात्र, बस कधी येते, याचा नेम नसल्यामुळे बसथांब्यावर एक ते दोन तास बसून रहावे लागत आहे, अशी माहिती काही प्रवाशांनी दिली आहे. बेळगावला येऊन ठरविलेले कामकाज करावे व पुन्हा घरी लवकर यावे, असे नियोजन केलेल्या नागरिकांचे मात्र दिवसभराचे वेळापत्रकच बिघडून जाऊ लागले आहे.

ग्रामीण भागातील बहुतांशी गावातून शेतकरीवर्ग रोज बेळगावला येतात. बाजारपेठेतील विविध साहित्याची खरेदी, औषधे, बी-बियाणे यांची खरेदी तसेच सरकारी कार्यालयातील कामकाजानिमित्त शेतकऱयांना शहराची धरावी लागते. मात्र, गावातून किंवा परिसरातून येणारी बस कधी येते? व कधी जाते? याचा पत्ताच नसल्यामुळे बऱयाच शेतकऱयांना बसथांब्यावरच ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे आपला अर्धा अर्धा दिवस वाया जाऊ लागला असल्याची माहिती काही शेतकऱयांनी दिली आहे.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत नेहमीच विविध योजना राबविल्या जातात. वेगवेगळय़ा योजनांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधीही खर्ची दाखविण्यात येतो. मात्र, या भागात कायमस्वरुपी व नियमित बससेवा नाही. या भागासाठी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडूनही हालचाली होण्याची गरज निर्माण झाली आहे.

मच्छे, पिरनवाडी या गावांचा विस्तार झपाटय़ाने वाढलेला आहे. मच्छे गावाला सध्या एकही बसफेरी नाही. या गावातील शालेय विद्यार्थ्यांना खानापूर तसेच वाघवडे या बसेसवरती अवलंबून रहावे लागत आहे. खानापूरला जाणाऱया बस अनेकदा मच्छे बसस्टॉपजवळ थांबत नाहीत. त्यामुळे मच्छे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला जाण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती पालकवर्गाने दिली आहे.

कडोली, हंदिगनूर, अगसगे, चलवेनट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, कुऱयाळ, शिवापूर, इदलहोंड या भागातही बससेवा सुरळीत नसल्यामुळे प्रवासीवर्गासह विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. हंदिगनूर गावाला यापूर्वी आठ ते दहा बसफेऱया येत होत्या. सध्या मात्र बसफेरींमध्ये कपात करण्यात आली असल्यामुळे विद्यार्थ्यांना तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. याशिवाय कुऱयाळ गावाला येणारी बसही अनियमित झाली आहे.

या परिसरातील हंदिगनूर हे गाव केंद्रबिंदू आहे. हंदिगनूर गावात मोठे हायस्कूल आहे. तसेच ज्युनियर कॉलेज असल्याने आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी हंदिगनूरला येत असतात. पण बससेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. पदवी शिक्षणासाठी हंदिगनूर परिसरातून शहराकडे येणाऱया विद्यार्थ्यांनाही बससेवा अपुरी असल्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे.

सोनोली, यळेबैल, राकसकोप या भागातील नागरिकांनाही बससेवेचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. अपुऱया व अनियमित बसफेऱयांमुळे विद्यार्थी व प्रवासीवर्ग अक्षरशः वैतागून गेले होते. गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वीच ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून राकसकोप गावासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे राकसकोप परिसरातील विद्यार्थी व प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तसेच ज्या भागात सुरळीत बससेवा नाही, अशा गावांसाठीही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होऊ लागली आहे.

देसूर गावाला येळ्ळूरमार्गे नव्याने बसफेरी सुरू करण्यात आली आहे. यामुळे देसूरसह सुळगे (ये.) गावातील प्रवाशांची सोय होऊ लागली आहे.

एन. के. नलवडे, बेळवट्टी

बेळवट्टी गावाला सुरळीत बससेवा नाही. यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. सकाळी शाळा व कॉलेजला जाण्याच्या वेळेतच बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन् तास बसून रहावे लागत आहे. तसेच बेळवट्टी हायस्कूलला बेटगिरी, गोल्याळी, तळवडे, मोरब, इनाम बडस येथील विद्यार्थी येतात. हे विद्यार्थीही बसने प्रवास करतात. मात्र, वेळेत बस नसल्यामुळे त्यांना शाळेत वेळेवर हजर राहता येत नाही. परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी बेळवट्टी परिसरासाठी बससेवा सुरळीत करावी, अशी आमची मागणी आहे.

सचिन बेळगावकर, मच्छे

मच्छे गावातून मोठय़ा संख्येने विद्यार्थी बेळगाव शहराला शिक्षणासाठी येतात. यामध्ये पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मच्छे गावाला एकही बससेवा सध्या उपलब्ध नाही. यामुळे आमच्या गावातील विद्यार्थीवर्गाला अन्य बसवरच अवलंबून रहावे लागते. खानापूरला ये-जा करणारी बस मच्छे बसथांब्यावर थांबत नाही. यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मच्छे औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी येणारा कामगारवर्गही मोठय़ा प्रमाणात आहे. बसमधून प्रवास करणाऱया कामगारवर्गालाही याचा फटका बसू लागला आहे.

Related Stories

मंथनतर्फे आज झूमद्वारे व्याख्यान

Amit Kulkarni

रामचंद्र मन्नोळकरांच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ

Omkar B

व्यक्तिमत्त्वाची श्रीमंती महत्त्वाची

Patil_p

कोरोनाच्या काळात पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे

Omkar B

हलगा-मच्छे बायपास रस्ताकाम पुन्हा सुरू करण्याचा डाव उधळला

Amit Kulkarni

लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी मनपा अधिकाऱयांची नियुक्ती

Amit Kulkarni
error: Content is protected !!