तरुण भारत

वायुदलाचे सामर्थ्य वाढणार

वाहतूक अन् बचावमोहिमेसाठी मिळणार 56 विमाने

भारत स्पेनकडून एकूण 56 सी-295 विमानांची खरेदी करणार आहे. यातील 40 विमानांची निर्मिती देशातच होणार आहे. भारतात अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून यात एखादी खासगी कंपनी देशाच्या वायुदलासाठी मिलिट्री एअरक्राफ्टची निर्मिती करणार आहे. या विमानाची वैशिष्टय़े कुठली आणि चीन तसेच पाकिस्तानकडे कुठल्या प्रकारची वाहतूक विमाने आहेत? भारताकडे सध्या कुठले वाहतूक विमान आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

Advertisements

केंद्र सरकारने भारतीय वायुदलासाठी सी-295 वाहतूक विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या विमानांच्या खरेदीला मंजुरी मिळाली आहे. ही विमाने स्पेनकडून खरेदी करण्यात येणार आहे. भारतीय वायुदलात एवरो विमानांची जागा नवी विमाने घेणार आहेत. वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेली अनेक विमाने आता जगातील कुठल्याच देशाकडून सध्या वापरली जात नाहीत. अनेक देशांमध्ये कालबाहय़ ठरलेली विमाने अद्याप वापरली जात असल्याने दुर्घटना आणि त्यातून होणाऱया जीवितहानीचे प्रमाण तुलनेत अधिक आहे. वायुदलात अत्याधुनिक विमानांचा समावेश करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. पण मागील काही काळात वायुदलाच्या ताफ्यात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलण्यात आली आहेत. राफेल लढाऊ विमान याचेच उदाहरण आहे.

करार जाणून घ्या

कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने (सीसीएस) 56 सी-295डब्ल्यू ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. हे विमान एअरबस डिफेन्स अँड स्पेस स्पेनकडून खरेदी करण्यात येणार आहे. या विमानांची किंमत 20 ते 20 हजार कोटी रुपये असू शकते. करारावर स्वाक्षरी झाल्याच्या 48 महिन्यांच्या आता 16 विमाने रेडी-टू-फ्लाय स्थितीत स्पेन पुरविणार आहे. उर्वरित 40 विमानांची निर्मिती टाटा समूह पुढील 10 वर्षांमध्ये देशातच करणार आहे. यामुळे आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी मिळणार आहे.

विमानांची वैशिष्टय़े कुठली?

-हे विमान शॉर्ट टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी ओळखले जाते. एअरक्राफ्ट 320 मीटरच्या अंतरातच टेक-ऑफ करू शकते असे कंपनीचे म्हणणे आहे.

 -लँडिंगसाठी 670 मीटरची लांबी पुरेशी ठरणार आहे. पर्वतीय क्षेत्रांमध्ये विमानांच्या मोहिमेकरता हे अत्यंत मोठे वैशिष्टय़ ठरणार आहे.

-विमान स्वतःसोबत कमाल 7,050 किलोग्रॅमचे पेलोड वाहून नेऊ शकते. एकाचवेळी 71 सैनिक किंवा 5 कार्गो पॅलेट वाहून नेण्याची  क्षमता आहे.

-विमान सलग 11 तासांपर्यंत उड्डाण करू शकते. 2 लोकांच्या क्रू केबिनमध्ये टचस्क्रीन कंट्रोलसह स्मार्ट कंट्रोल सिस्टीम देखील उपलब्ध आहे.

-सी-295 ट्रान्सपोर्ट विमानात मागील बाजूस रॅम्प डोअर असून ते सैनिक किंवा सामग्रीच्या जलद लोडिंग अन् ड्रॉपिंगसाठी अधिक सुविधाजनक आहे.

-विमानात 2 प्रॅट अँड व्हिटनी पीडब्ल्यू127 टर्बोट्रूप इंजिन आहेत. या सर्व विमानांना स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूटने युक्त केले जाणार आहे.

भारत का खरेदी करतोय?

भारतीय वायुदलात सी-295 विमाने एव्हरो विमानांची जागा घेणार आहेत. वायुदलाकडे 56 एव्हरो विमाने असून ती 1960 च्या दशकात खरेदी करण्यात आली होती. या विमानांना तत्काळ बदलण्याची गरज आहे. याचमुळे मे 2013 मध्ये कंपन्यांमध्ये रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरपीएफ) पाठविण्यात आला होता. मे 2015 मध्ये संरक्षण खरेदी परिषदेने (डीएसी) टाटा समूह आणि एअरबसच्या सी-295 विमानाच्या निविदेला मंजुरी दिली होती.

सी-295 भारतासाठी विशेष

भारतीय वायुदलातून एव्हरो विमानांना हटविण्यासाठी ही विमाने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. वायुदलात 60 वर्षांपूर्वी एव्हरो विमानांना सामील करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून ही विमाने बदलण्याची मागणी केली जात आहे. वायुदलाच्या ताफ्यात सामील झाल्यावर या विमानांना सागरी मार्गांवरही तैनात केले जाऊ शकते. या क्षेत्रात एएन-32 या विमानांची जागा सी-295 घेऊ शकते असे मानले जात आहे. भारताकडे सध्या 100 हून अधिक एएन-32 विमाने सेवेत आहेत. सैन्य देखील या विमानांना बदलण्याची तयारी करत आहे.

देशांतर्गत उद्योगाला बळ

स्पेनसोबत होणाऱया करारानुसार 40 विमानांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे. यामुळे देशातील एअरोस्पेस कंस्ट्रक्शन ईको सिस्टीमला चालना मिळणार आहे. एमएसएमई क्षेत्रातील अनेक कंपन्या या विमानांच्या निर्मितीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात जोडल्या जातील. भारताच्या खासगी क्षेत्राला एअरोस्पेस कंस्ट्रक्शनच्या बाजारात प्रवेशाची संधी मिळेल. आयातीवरील निर्भरता कमी होत निर्यातीला चालना मिळू शकणार आहे. या कराराच्या मदतीने प्रत्यक्ष स्वरुपात 600 हायस्किल्ड जॉब्स तयार होतील आणि 3 हजारांहून अधिक मध्यम कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची अपेक्षा आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळ

भारतात मोठय़ा संख्येत सुटे भाग, सब-असेंबली आणि एअरोस्ट्रक्चरच्या कॉम्पोनेंट असेंबलीची निर्मिती केली जाणार आहे. विमानांचा पुरवठा पूर्ण होण्यापूर्वी भरतात सी-295 विमानांसाठी ‘डी’ स्तरीय सर्व्हिसिंग फॅसिलिटी स्थापन करण्याची योजना आहे. ही फॅसिलिटी सी-295 विमानांच्या विविध प्रकारांसाठी एक रीजनल मेंटेनेंस, रिपेयर आणि ऑपरेशन (एमआरओ) हबच्या स्वरुपात काम करणार आहे.

चीन-पाकिस्तानचे आव्हान

पाकिस्तानच्या वायुदलाकडे सध्या 6 प्रकारची ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स आहेत. यात लॉकहीड सी-130 आणि गल्फस्ट्रीमचे प्रकार देखील आहेत. तर चीनकडे 200 हून अधिक ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट्स आहेत. यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वाय-20 देखील सामील आहे.

सी-295 चा इतिहास

जून 1997 मध्ये पॅरिस एअर शोमध्ये स्पेनची कंपनी कासाने या विमानाला सादर केले होते. 1998 मध्ये सी-295 ने स्वतःचे पहिले उड्डाण केले होते. पुढील वर्षीच स्पेनच्या यंत्रणांकडून याला सैन्यात वापराची अनुमती मिळाली आणि स्पेनच्या सैन्याने 9 विमानांची ऑर्डर दिली. नोव्हेंबर 2001 मध्ये स्पेनच्या वायुदलाने याचा वापर सुरू केला. स्पेनकडे सध्या 15 सी-295 विमाने आहेत.

सी-295 ची वैशिष्टय़े…

क्रू                   2

पंख्याची लांबी  25.81 मीटर

विमानाची उंची            8.66 मीटर

विमानाची लांबी           24.45 मीटर

क्षमता ः 71 ट्रूप्स/50 पॅराट्रूप्स/ 5 कार्गो पॅलेट

वायुदलाकडे असणारी वाहतूक विमाने

सी-130जे ः भारताकडे 12 सी-130जे विमाने आहेत. 2013 मध्ये या विमानांना वायुदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते.

सी-17 ः 40-70 टनाच्या पेलोड क्षमतेसह हे विमान एकाचवेळी 4-9 हजार किलोमीटर अंतरापर्यंत उड्डाण करू शकते.

आयएल-76 ः 4 इंजिन्सनी युक्त हे विमान 850 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण करू शकते.

एएन-32 ः 6.7 टनाच्या कमाल पेलोड क्षमतेसह हे विमान 530 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण करू शकते.

एम्ब्ा्रsयर ः या विमानाचा वापर व्हीआयपी आणि व्हीआयपीपींना आणण्यासाठी केला जातो. आतापर्यंत या विमानाची एकही दुर्घटना झालेली नाही.

एव्हरो ः 48 सैनिक किंवा 6 टन पेलोड क्षमतेच्या या विमानालाच सी-295 रिप्लेस करणार आहेत.

डोर्नियर ः 19 प्रवासी किंवा 2057 किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकणारे हे विमान 428 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण करू शकते.

बोइंग 737-200 ः 60 प्रवाशांची क्षमता असणाऱया या विमानाला व्हीआयपी प्रवासी विमान म्हणून देखील वापरले जाते. – संकलन – उमाकांत कुलकर्णी

Related Stories

केंद्र-राज्य संबंधात अडकलेला सहकार

Patil_p

भित्यापाठी ब्रह्मराक्षस…!

Patil_p

स्वागत आणि किळस

Patil_p

प्रियतम ईश्वर सुखनिधान

Omkar B

कोणीही भगवंतांना फसवू शकत नाही!

Patil_p

कूटश्लोक

Patil_p
error: Content is protected !!