तरुण भारत

पत्रादेवी सीमेवर होतेय गर्दी

गोव्यात प्रवेश करताना तपासणीचे दिव्य

वार्ताहर / सावंतवाडी:

Advertisements

महाराष्ट्रातून गोव्यात व नजीकच्या कर्नाटक या दोन राज्यात जायचे असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे पुरावे अथवा आरटीपीसीआर टेस्ट अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. गोवा प्रवेशद्वारावर तुमची टेस्ट केल्यानंतरच तुम्हाला राज्यात प्रवेश दिला जात आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकारने आपली सर्व तपासणी केंद्रे बंद केली आहेत. मात्र, कर्नाटक व गोवा राज्यात प्रवेश करणे आता कठीण झाले आहे. गोव्याच्या हद्दीत प्रवेश करायचा झाल्यास गोव्याच्या पत्रादेवी येथील चेकपोस्टवर प्रत्येक वाहनधारकाकडील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे तेथे गर्दी होत आहे. कर्नाटकात प्रवेश करतानाही असे तपासणी केंद्र आहे.

या दोन्ही राज्यात बेकायदेशीर मायनिंग व अन्य वाहतुकीचे डंपर व ट्रक यांची कोणतीही तपासणी होताना दिसत नाही. ते बिनधास्तपणे ये-जा करत आहेत. गोवा व कर्नाटक राज्य सरकार महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्याय करत आहे, अशी भावना आता व्यक्त होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी आपल्या सीमा तपासणी केंद्रावरील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने गणेश चतुर्थीच्या कालावधीपासून कोकणासह अन्य भागातील सीमेवरील तपासणी केंद्रांतील तपासणीत शिथिलता आणली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गोव्याच्या सीमेलगत महाराष्ट्राच्या हद्दीत बांदा येथे सुरू असलेले तपासणी केंद्र बंद करण्यात आले. या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. तेथे टेस्टही केली जात होती. परंतु आता हे केंद्र बंद करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे हे तपासणी केंद्र बंद झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असले तरी तुम्हाला महाराष्ट्रातून गोव्यात जायचे असेल तर तपासणीचे दिव्य पार पाडावे लागते. कारण गोवा सरकारने अद्यापही आपली तपासणी केंद्रे बंद केलेली नाहीत. पत्रादेवी येथे हायवेवरच तपासणी केंद्र आहे. मात्र, हायवेवरून दुचाकीस्वार या तपासणी केंद्राची नजर चुकवून आडमार्गाने जात आहेत. फक्त चारचाकी व बसमधील प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येत आहे. जर तुमच्याकडे लस घेतल्याचा पुरावा असेल अथवा तुम्ही आरटीपीसीआर टेस्ट केली असेल तर तुम्हाला पुढचा प्रवास करता येतो. सध्या गोव्यात पर्यटकांची गर्दी होत आहे. गणेश चतुर्थी संपताच अनेक मुंबई-पुणेकर चाकरमानी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक गोवा सफरीवर येत आहेत. या तपासणी केंद्रावर गेले दोन दिवस पर्यटकांची रांगच रांग पाहायला मिळत होती. मात्र, गोव्यातून महाराष्ट्रात येताना कोणतीही आडकाठी नाही. गोव्यात सध्या मुंबई-गोवा हायवेचे काम सुरू असल्याने रस्ता खराब झाला आहे. अशाही स्थितीत गोव्यात मोठय़ा प्रमाणात पर्यटकांना तपासणीसाठी अर्धा ते एक तास लागत आहे.

गोव्यात बसेस सुरू

कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेत गेल्या मार्चपासून तब्बल सहा ते सात महिने एसटी गाडय़ा बंद होत्या. गोव्यात महाराष्ट्राच्या एसटी गाडय़ा बंद झाल्याने गोव्यात नेहमी नोकरीनिमित्त ये-जा करणाऱयांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत होते. आता महाराष्ट्राच्या एसटी गोव्याच्या हद्दीत ये-जा करत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कर्नाटक राज्यात अद्यापही एसटी बसना प्रवेश नाही. कुठल्याही राज्यात ये-जा करण्यासाठी आता पर्यायी मार्गांचाही अवलंब होऊ लागला आहे. त्यामुळे मुख्य रस्ते आता खुले होणे गरजे आहे.

Related Stories

कोरोनाचे आणखी तीन बळी

Patil_p

सावंतवाडीत चोरीचे सत्र सुरूच

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : संगमेश्वर डावखोल येथे घराचा दरवाजा फोडून 60 हजार रुपये लंपास

triratna

जन्मतःच्या दिव्यांगत्वावर मात करत ‘तेजस्’वी प्रवास…!

Patil_p

भरणेनजीक अपघातात एकजण गंभीर जखमी

Patil_p

कळसुलकर हायस्कूलच्या आनंद शिशुवाटीकेचे उद्घाटन

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!