तरुण भारत

दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानविरुद्ध ‘रॉयल’ विजय

आयपीएल साखळी सामन्यात 33 धावांनी सहज मात, श्रेयस-हेतमेयरची फटकेबाजी, ऍनरिच नोर्त्झेला दुहेरी यश

अबु धाबी / वृत्तसंस्था

Advertisements

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध 33 धावांनी विजय संपादन करुन देण्यात सिंहाचा वाटा उचलला. प्रारंभी, दिल्लीने निर्धारित 20 षटकात 6 बाद 154 धावा केल्या आणि राजस्थानला 6 बाद 121 धावांवर रोखून धरत सहज विजय मिळवला. फलंदाजीच्या आघाडीवर दिल्लीतर्फे श्रेयस अय्यर (43) व शिमरॉन हेतमेयर (16 चेंडूत 28) यांची फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन येथे उत्तम बहरात दिसून आला. त्याने नाबाद 70 धावांची दमदार खेळी साकारली. मात्र, दुसऱया बाजूने ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला कायम राहिला आणि त्यांना अपेक्षित मोमेंटमपासून दूरच रहावे लागले.

दिल्लीतर्फे दक्षिण आफ्रिकन पेसर ऍनरिच नोर्त्झेने 18 धावात 2 बळी घेतले. शिवाय, अवेश खान (1-29), रबाडा (1-26), अक्षर पटेल (1-27), अश्विन (1-20) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्लीने या विजयासह पुन्हा एकदा अव्वलस्थान काबीज केले तर राजस्थान रॉयल्स सहाव्या स्थानी फेकला गेला. छोटय़ा धावसंख्येचे संरक्षण करताना अवेश खान व नोर्त्झे यांनी लिव्हिंगस्टोन (1) व यशस्वी जैस्वाल (5) यांना पहिल्या 2 षटकातच तंबूत धाडले आणि दिल्लीसाठी स्वप्नवत सुरुवात करुन दिली.

कर्णधार रिषभ पंतने गोलंदाजीत बदल करताना अश्विनला माऱयावर आणले आणि त्यानेही धोकादायक डेव्हिड मिलरला (7) स्वस्तात बाद करत रॉयल्सची अवस्था 3 बाद 17 अशी केली. आवश्यक धावगती उंचावत असताना राजस्थानला शेवटच्या 10 षटकात 107 धावांची गरज होती. सॅमसन व युवा लोमरोर (19) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, रबाडाने ही भागीदारी मोडीत काढली. रियान पराग (2), राहुल तेवातिया (9) अपेक्षित योगदान देऊ शकले नाहीत. सॅमसनने जोरदार फटकेबाजी केली. पण, त्याचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

दिल्लीचे सलामीवीरही अपयशी

प्रारंभी, मुस्तफिजूर (2-22), चेतन साकरिया (2-33), कार्तिक त्यागी (1-40) यांनी एकत्रित 5 बळी घेतल्यानंतर रॉयल्सच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या डावाला सुरुंग लावला होता. अष्टपैलू राहुल तेवातियाने देखील (1-17) यश मिळवले. पंजाबविरुद्ध स्टार ठरलेल्या त्यागीने येथे शिखर धवनचा (8) त्रिफळा उडवत संघाला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वी शॉ देखील साकरियाच्या गोलंदाजीवर मिडऑफवरील लिव्हिंगस्टोनकडे झेल देत बाद झाला. पॉवर प्ले अखेरीस कॅपिटल्सची 2 बाद 36 अशी दैना उडाली होती.

सातव्या षटकात फिरकीपटूंना पाचारण केले गेल्यानंतर श्रेयस अय्यर (32 चेंडूत 43) व कर्णधार रिषभ पंत (24 चेंडूत 24) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने धावफलक हलता ठेवत 62 धावांची भागीदारी साकारली. नंतर रहमानने पंतला बाद करत ही जोडी फोडली. सॅमसनने अय्यरला यष्टीचीत केले. शिमरॉन हेतमेयरची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. त्याने 16 चेंडूतच 28 धावांची आतषबाजी केली.

धावफलक

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. लिव्हिंगस्टोन, गो. साकरिया 10 (12 चेंडू), शिखर धवन त्रि. गो. कार्तिक त्यागी 8 (8 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर यष्टीचीत सॅमसन, गो. तेवातिया 43 (32 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), रिषभ पंत त्रि. गो. मुस्तफिजूर रहमान 24 (24 चेंडूत 2 चौकार), शिमरॉन हेतमेयर झे. साकरिया, गो. मुस्तफिजूर 28 (16 चेंडूत 5 चौकार), ललित यादव नाबाद 14 (15 चेंडूत 1 चौकार), अक्षर पटेल झे. मिलर, गो. साकरिया 12 (7 चेंडूत 1 षटकार), रविचंद्रन अश्विन नाबाद 6 (6 चेंडू). अवांतर 9. (बाईज 2, लेगबाईज 1, वाईड 6). एकूण 20 षटकात 6 बाद 154.

गडी बाद होण्याचा क्रम

1-18 (धवन, 3.1), 2-21 (शॉ, 4.1), 3-83 (रिषभ, 11.4), 4-90 (श्रेयस, 13.2), 5-121 (शिमरॉन, 16.3), 6-142 (अक्षर, 18.2).

गोलंदाजी

मुस्तफिजूर 4-0-22-2, महिपाल लोमरोर 1-0-5-0, चेतन साकरिया 4-0-33-2, कार्तिक त्यागी 4-0-40-1, तबरेझ शमसी 4-0-34-0, राहुल तेवातिया 3-0-17-1.

राजस्थान रॉयल्स ः लियाम लिव्हिंगस्टोन झे. पंत, गो. अवेश खान 1 (3 चेंडू), यशस्वी जैस्वाल झे. पंत, गो. नोर्त्झे 5 (4 चेंडू), संजू सॅमसन नाबाद 70 (53 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), डेव्हिड मिलर यष्टीचीत पंत, गो. अश्विन 7 (10 चेंडू), महिपाल लोमरोर झे. अवेश, गो. रबाडा 19 (24 चेंडूत 1 षटकार), रियान पराग त्रि. गो. पटेल 2 (7 चेंडू), राहुल तेवातिया झे. हेतमेयर, गो. नोर्त्झे 9 (15 चेंडू), तबरेझ शमसी नाबाद 2 (4 चेंडू). अवांतर 6 (लेगबाय 1, वाईड 5). एकूण 20 षटकात 6 बाद 121.

गडी बाद होण्याचा क्रम

1-6 (लिव्हिंगस्टोन, 0.6), 2-6 (जैस्वाल, 1.1), 3-17 (मिलर, 4.2), 4-48 (महिपाल, 10.2), 5-55 (रियान, 11.5), 6-99 (तेवातिया, 17.2).

गोलंदाजी

अवेश खान 4-0-29-1, नोर्त्झे 4-0-18-2, रविचंद्रन अश्विन 4-0-20-1, रबाडा 4-0-26-1, अक्षर पटेल 4-0-27-1.

Related Stories

स्पेनचा नदाल मानांकनात दुसरा

Patil_p

बॅडमिंटनपटू ऍक्सेलसेन कोरोना बाधित

Patil_p

थिएम, क्रेजोनोव्हिक अंतिम फेरीत

Patil_p

मर्यादित प्रेक्षकांसह रंगणार आयपीएल

Patil_p

बाबरचे अर्धशतक

Amit Kulkarni

सुसज्ज ‘मोटेरा’वर आजपासून ऐतिहासिक कसोटी

Patil_p
error: Content is protected !!