तरुण भारत

अवगुण सांडिता जाती।उत्तम गुण अंगीकारिता येता।।

मनुष्यप्राणी हा गुण आणि कौशल्य ह्याने नटलेला आहे. सर्व प्राणीमात्रात मनुष्याला जे हवे आहे ते स्वतःच्या अंगभूत गुणांनी प्राप्त करता येते. काही वेळेस अनेक प्रकारचे गुण आत्मसात करून स्वतःचे ध्येय मनुष्यप्राणी ठरवू शकतो. आत्मसात केलेल्या गुणांनी ध्येय प्राप्तीही करता येते. गुण आत्मसात करणे हे कौशल्य केवळ मनुष्यालाच अवगत आहे. 

गुण आत्मसात करणे हे जरी कौशल्य असले तरीही आत्मसात केलेले गुण टिकवून ठेवणे, चांगल्या गुणांची वृद्धी करणे हाही एक महत्त्वाचा गुण असतो. मानव हा अनेक जन्मांचे संस्कार घेऊनच पृथ्वीतलावर जगत असतो. एका जन्मात मानव प्राणी सगळेच प्राप्त करू शकत नाही. कारण, जीवन हे खूप व्यापक आहे. जीवनाच्या वेगवेगळय़ा शाखा आहेत. ‘पिंडी ते ब्रम्हांडी’ हे शाश्वत सत्य असले तरीही प्रत्येक मनुष्य जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकत नाही. कारण, मनुष्यप्राण्यालासुद्धा खूप मर्यादा आहेत. जर ह्या मर्यादा नसत्या तर पृथ्वीवरील मनुष्य उत्तमरित्या जीवन जगू शकला नसता. जे सकारात्मक दृष्टीने जीवन जगताना किमान तसा जरी विचार करतात त्यांच्याकरिता मानवी जीवनातील मर्यादा ह्याच त्यांना अमर्याद करतात. पण, जे नकारात्मक पद्धतीने जीवन जगतात ते मात्र अमर्याद होऊ शकत नाही. मनुष्यजीवनाची कुठेतरी ही शोकांतिका असावी की जास्तीत जास्त प्रमाणात मनुष्यप्राणी हे अमर्याद होऊ शकत नाहीत.

Advertisements

भारतीय जीवन पद्धतीत किंवा हिंदू जीवन पद्धतीत जे चार पुरुषार्थ सांगितले आहेत ते मनुष्याने यथार्थ जीवन जगून दाखवावे ह्याकरिताच आहेत. हे चारही पुरुषार्थ न्याय, नीतिमत्ता ह्या मर्यादांच्या आधारेच मनुष्याला मार्गदर्शन करत असतात. जे ह्या मर्यादांचे पालन करतात तेच श्रे÷ पुरुष म्हणून मान्यता पावतात. ज्यांना हे श्रे÷त्व मिळवायचे असेल त्यांनी श्रीसमर्थांनी सांगितल्यानुसार अवगुण सांडिता जाती। उत्तम गुण अंगीकारिता येता।। हे तत्त्व आचरणात आणावे. अवगुणांवर विजय मिळवणे म्हणजेच अमर्यादित होणे आणि उत्तम गुणांचा अवलंब करणे म्हणजेच श्रे÷ पुरुष होण्याच्या दिशेने प्रवास करणे होय!

व्यवस्थापनशास्त्रात जे गुणी असतात त्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करता येतात. पण, जे कुशल किंवा ज्यांच्याकडे विशिष्ट कौशल्य आहे ते गुणी असतीलच असे नाही. परंतु, स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नाने ते गुणी होऊ शकतात. व्यवस्थापनशास्त्रात संख्येपेक्षाही गुणांना खूप महत्त्व आहे. एखाद्या उद्योगसमूहात कर्मचाऱयांच्या संख्येपेक्षाही त्यांच्यातील गुणी कर्मचाऱयांच्या योगदानावर औद्योगिक समूहाचे यश अवलंबून असते. ह्यात विशेष म्हणजे जर संबंधित औद्योगिक समूहाचा प्रवर्तक किंवा मालक हा गुणी आणि अनेक प्रकारचे कौशल्य आत्मसात केलेला असेल तर मात्र तो उद्योगसमूह एक आदर्श म्हणून नावारूपाला येतो. श्रीसमर्थांनी ह्याविषयी श्रीमद्दासबोध ग्रंथात म्हटले आहे की

।। श्रीराम।।

पृथ्वीमघ्यें लोक सकळ।

येक संपन्न येक दुर्बळ ।

येक निर्मळ येक वोंगळ ।

काय निमित्य।।

कित्येक राजे नांदती।

कित्येक दारिद्र भोगीति।

कितीयेकांची उत्तम स्थिती।

कित्येक अधमोद्धम।।

ऐसे काय निमित्य जालें।

हें मज पाहिजे निरोपिलें।

याचे उत्तर ऐकिलें ।

पाहीजें श्रोती ।।

हे गुणापासी गती।

सगुण भाग्यश्री भोगिती।

अवगुणांस दरिद्रप्राप्ती।

येदर्थी संदेह नाहीं।।

जो जो जेथें उपजला ।

तो ते वेवसाईं उमजला ।

तयास लोक म्हणती भला ।

कार्यकर्ता ।।

09/04/01-02-03-04 ह्याचा अर्थ असा आहे की, पृथ्वीतलावर अनेक लोक राहतात. त्यातील काही संपन्न तर काही दुबळे आहेत. काही निर्मळ आहेत तर काही ओंगळ आहेत. ह्याचे कारण काय? काहीजण राजवैभव भोगतात, काही दारिद्रय़ भोगतात. काहींची स्थिती उत्तम असते तर काहीजण वाईट अवस्थेत जीवन जगतात. ह्याचे कारण काय ते सांगतो. श्रोत्यांनी ते ऐकावे. गुणांच्या प्रभावामुळे ह्या सर्व गोष्टी घडतात. जे सद्गुणी असतात त्यांचे भाग्य उदयाला येते आणि जे अवगुणी असतात त्यांना दारिद्रय़ात खितपत पडावे लागते यात अजिबात शंका नाही. ज्याने जेथे जन्म घेतला त्याने तेथील व्यवसाय वाढवला तर लोक त्यास उत्तम कार्यकर्ता म्हणतात.

श्रीसमर्थांनी सांगितलेली जाणपण निरुपण समासातील ही लक्षणे व्यवस्थापनशास्त्रातील  उत्तम व्यवस्थापक आणि सर्वोत्तम उद्योजक ज्यांना व्हावयाचे असेल त्यांना लागू पडतात. आधुनिक काळात आपल्या देशात विठ्ठल कामत ह्या यशस्वी उद्योगपतींमध्ये ही लक्षणे जाणवतात. त्यांचा उद्योगक्षेत्रातील प्रवास हा उत्तम गुण आणि विविध कौशल्य आत्मसात करून यश कसे प्राप्त करावे हे सांगणारा आहे. नवीन तरुण व्यवस्थापक आणि उद्योजकांनी विठ्ठल कामत ह्यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून स्वतःच्या क्षेत्रात यश संपादन करावे.

माधव किल्लेदार

Related Stories

‘स्मार्ट केन’ ची ‘स्मार्ट गोष्ट’

Patil_p

हे कृष्णकथा अलोलिक

Patil_p

तो तूं प्रद्युम्न कृष्णनंदन

Patil_p

समदुःखी एकत्र येतील ?

Patil_p

मताला लसीची फोडणी

Patil_p

शिक्षणाचे नवे धोरण

Patil_p
error: Content is protected !!