तरुण भारत

भक्तीतील विरुद्धपणा अर्थात अभक्त लक्षण

अध्याय अकरावा

हरिकीर्तनाचे महत्त्व भगवंतांनी उद्धवाला समजाऊन सांगितले. ते म्हणाले, माझे नामस्मरण करीत कीर्तनामध्ये आवडीने नाचावे. रामकृष्ण, हरि, गोविंद अशा नामांची काव्ये गात असताना त्यातील अनेक प्रकारची पदे, चित्रबंध ह्यांनी कीर्तनामध्ये आनंदीआनंद करून सोडावा. मृदंग, टाळ, वीणा इत्यादि वाद्ये घ्यावी व वैष्णवांचा समुदाय मिळवून कीर्तनामध्ये मोठा गजर करून सोडावा. सुंदर गायन करावे व माझ्या अवतारकृत्यांचे स्मरण करून तसे हावभाव करून दाखवावे. जो आळसाला दूर झुगारून व अभिमानाला बाहेर घालवून रात्रंदिवस कीर्तनाचा घोष चालवतो त्याच्यामुळे मला अप्रतिम आनंद होतो. नामसंकीर्तनाचा कल्लोळ उसळवून गर्जना करीत असता नामोच्चाराबरोबर सर्वांची एकदम टाळी पडते तेव्हा त्याच्या योगाने महान पातकेही भस्म होऊन जातात. त्या वैष्णवांच्या समुदायात मी उभा असतो. नामस्मरणाच्या आवडीपुढे कोटय़वधी मंत्रबीजें लज्जित झाली आणि बिचारी तपादिक साधने तर हरिनामाने वेडी होऊन गेली. ह रनामाचा घोष ऐकताच योगयागांनी आपले तोंडच लपविले. त्या हरिनामाच्या धाकाने विषयसुख तर पळूनच गेले आणि अधर्म होते ते जेथल्या तेथे थिजून गेले. हरिनामाचा कडकडाट ऐकताच सर्व दोष दिगंतामध्ये पळून गेले व तीर्थांचाही अभिमान उतरला. असे हे कीर्तनकौशल्य हरीला अत्यंत प्रिय असते. माझ्या प्रेमाने उन्मत्त होऊन जे आवडीने अहोरात्र कीर्तन करीत असतात, ते मनाने व वाणीने अनेक प्रकारची कर्मे करून देखील  माझ्याशिवाय दुसरे काही जाणतच नाहीत. माझे जे उत्तम भक्त आहेत, त्यांचा धर्म, अर्थ व काम ही सर्व मीच होय. माझ्याशिवाय दुसरे कर्म करणे हे

Advertisements

त्यांचा मनोधर्म जाणतच नाही. माझे भजन तेच त्यांचे उत्तम कर्म. मला जो धर्म अर्पण होतो तोच त्यांचा पवित्र धर्म, माझी आवड धरणे हीच त्यांची शुद्ध इच्छा आणि त्या इच्छेची विश्रांतीही माझ्यामध्येच. ते अनेक प्रकारचे द्रव्य खर्चून परमार्थाचाच संग्रह करून ठेवतात. अशाश्वतरूप संपत्तीचा संग्रह माझे भक्त करीत नाहीत. ज्यांचे चित्त संपत्तीवर असते ते केवळ अभक्त होत, हे लक्षात ठेव. ते जे काही भजन करतात, तो केवळ एखाद्या नटाने पैशासाठी केलेला अभिनय समज. मनाने आणि वाणीने घडलेली कर्मे जर मला अर्पण होत नसतील तर, ते सर्व दांभिक भजन समजावे. ते केवळ पोट भरण्यासाठीच केलेले असते.

भक्तीतसुद्धा विरुद्धपणा असतो. त्या विरुद्धधर्माचे जे लक्षण तेही आता सांगतो. सावधानपणे ऐक. माझ्या भजनाला कमी लेखून त्यापासून जो पैसा मिळवायला निघतो, त्याची भक्ती भजनविरुद्ध असते. पदरचे द्रव्य खर्च करायचे नसल्याने कोरडेपणानेच माझे भजन करतो. अशा रीतीने जो मला ठकवतो. ते त्याचे कृत्य मुख्यतः विरुद्धलक्षण होय. ह्यालाच ‘अर्थविरुद्धता’ असे म्हणतात.

आता जो भक्त दुष्ट वासनेने कर्मे करणारा असतो पण मी भगवंताचे भजन करीत आहे, तेव्हा मला कोणताच दोष मुळीच लागणार नाही या कल्पनेने जो दुष्ट वासनेतच नेहमी गुंतून राहतो, ते विरुद्ध लक्षणच होय. ते भजन भक्तांना अभक्तपणा मात्र आणत असते. आता श्राद्धाबद्दल ऐक, मला अर्पण न करता जे श्राद्ध करतात, ते कृत्यही  श्राद्धाच्या विरुद्धच होय.

 श्राद्धाचा जो संकल्प आहे तो मला अर्पण करण्यानेच विरुद्ध होत नाही असे वेदसुद्धा गर्जून सांगत आहेत. ‘पितरस्वरूपी जनार्दन’ हाच श्राद्धातील मुख्य संकल्प असतो आणि असे असता मला नैवेद्यच अर्पण करीत नाहीत. अन्न हे ब्रह्मच आहे आणि मीही ब्रह्मच आहे, हेच श्राद्धातील गुह्य वर्म आहे. पण असे शुद्ध कर्म न समजून वृथा भ्रम मात्र वाढवतात. सर्व जग उत्पन्न करणारा मी आहे, सर्व पितरांचाही मुख्य पिता मीच आहे, त्या मला कर्म अर्पण न करिता श्राद्ध करणे हे सर्वतोपरी विरुद्ध होय. मला अर्पण न करता जे जे काही करावयाचे ते ते अभक्तपणानेच होते. अशी विरुद्धधर्माची लक्षणे जो आचरतो, त्याला अनिवार व भयंकर दुःख प्राप्त होते.

क्रमशः

Related Stories

ऐसें पाणिग्रहण जालें

Patil_p

व्हॉट्सऍप – फसवणुकीचे नवीन साधन…

Patil_p

चीन पुन्हा आक्रमक

Amit Kulkarni

विवेकशक्ती नसेल तर वैराग्य तग धरू शकत नाही

Patil_p

शेतकरी स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र!

tarunbharat

समाज दिग्दर्शिका!

Patil_p
error: Content is protected !!