तरुण भारत

आरसीबीकडून मुंबईचा एकतर्फी धुव्वा

54 धावांनी दणदणीत विजय, हर्षलचे हॅट्ट्रिकसह 4 बळी, मॅक्सवेल सामनावीर, चहलचे 3 बळी

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

सूर गवसलेला ग्लेन मॅक्सवेल व कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतके नोंदवल्यानंतर हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल यांच्या भेदक माऱयापुढे मुंबई इंडियन्सचा 18.1 षटकांत 111 धावांत धुव्वा उडवित आरसीबीने आयपीएलमधील सामन्यात 54 धावांनी दणदणीत विजय मिळविला. हर्षल पटेलने हॅट्ट्रिकसह 17 धावांत 4 तर चहलने 3 बळी मिळविले. 56 धावा व 2 बळी मिळविणाऱया अष्टपैलू मॅक्सवेलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

आरसीबीने प्रथम 20 षटकांत 6 बाद 165 धावा जमविल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व क्विन्टॉन डी कॉक यांनी मुंबईला अर्धशतकी सलामी दिल्यानंतरही पटेल व चहल, मॅक्सवेल यांच्या भेदक माऱयासमोर मुंबईचा डाव 111 धावांत आटोपला. रोहित व डी कॉक वगळता मुंबईच्या अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. रोहितने 28 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 43 धावा फटकावल्या तर डी कॉकने 23 चेंडूत 24 धावा जमविल्या.

मुंबईचा लौकीक पाहता आरसीबीचे आव्हान ते सहजपणे पार करतील असे वाटले होते. रोहित-डी कॉक यांनी चांगली सुरुवात करून त्या दिशेने वाटचालही सुरू केली होती. पण ही जोडी फुटल्यानंतर पटेल, चहल, मॅक्सवेल यांच्या गोलंदाजीसमोर त्यांचा उर्वरित एकही फलंदाज टिकाव धरू शकला नाही आणि 1 बाद 79 अशा भक्कम स्थितीवरून सर्व बाद 111 असा त्यांचा डाव कोलमडला. इशान किशन 9, सूर्यकुमार यादव 8, कृणाल पंडय़ा 5, पोलार्ड 7, हार्दिक पंडय़ा 3, मिल्ने 0, राहुल चहर 0, बुमराह 5, बोल्ट 0 अशा त्यांनी धावा जमविल्या. अवांतराच्या रूपात त्यांना 7 धावा मिळाल्या. आरसीबीच्या फक्त काईल जेमीसनला बळी मिळविता आला नाही. पटेलने 4, चहलने 11 धावांत 3, मॅक्सवेलने 23 धावांत 2 व मोहम्मद सिराजने 15 धावांत 1 बळी मिळविला. आरसीबीने विजयाच्या दोन गुणांसह एकूण 12 गुण मिळवित तिसरे स्थान मिळविले आहे. मुंबईची मात्र सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांच्या खात्यावर 8 गुण आहेत.

कोहली, मॅक्सवेलची अर्धशतके

कोहलीने 42 चेंडूत 51 धावा फटकावताना टी-20 क्रिकेटमधील दहा हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार, 3 षटकार मारले. पण मॅक्सवेलने जास्त आक्रमक फटकेबाजी करीत केवळ 37 चेंडूत 56 धावा झोडपल्या. त्याची खेळी बुमराहने संपुष्टात आणली. मॅक्सवेलच्या खेळीत 6 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. त्याने स्विच हिट, लॅप शॉट्स आणि फ्लिक्स फटक्यांचा पुरेपूर वापर करीत ऍडम मिल्ने व बुमराहवर हल्ला चढविला. त्याच्या फटकेबाजीने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही हताश झाल्याचे दिसून आले. बुमराहने त्याला व एबी डिव्हिलियर्सला लागोपाठ बाद केल्याने अखेरच्या दोन षटकांतील संभाव्य 20 ते 25 धावा वाचविल्या.

भेदक मारा करणाऱया बुमराहने देवदत्त पडिक्कलचा त्रिफळा उडवित मुंबईला पहिले यश मिळवून दिले. पण श्रीकर भरत व कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 68 धावांची भागीदारी करीत डाव सावरला. भरतने 24 चेंडूत 32 धावा काढल्या. त्याने राहुल चहरला दोन स्वीपचे षटकार मारले. पण नंतर चहरनेच त्याला बाद केले. मॅक्सवेल आल्यावर धावांचा वेग वाढला आणि कोहलीसमवेत त्याने 7 षटकांत 50 धावांची भर घातली. कोहली बाद झाल्यानंतर मॅक्सवेलने आक्रमण करीत संघाला 160 च्या पुढे मजल मारून दिली. बुमराहने 36 धावांत 3 बळी मिळविले. बोल्ट, मिल्ने, चहर यांनी एकेक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक ः आरसीबी 20 षटकांत 6 बाद 165 ः कोहली 42 चेंडूत 51, पडिक्कल 0, श्रीकर भरत 24 चेंडूत 32, मॅक्सवेल 37 चेंडूत 56, डीव्हिलियर्स 6 चेंडूत 11, डॅन ख्रिश्चन नाबाद 1, शाहबाज अहमद 1, जेमीसन नाबाद 2, अवांतर 11. गोलंदाजी ः बुमराह 3-36, बोल्ट 1-17, मिल्ने 1-48, चहर 1-33, कृणाल पंडय़ा 0-27.

मुंबई इंडियन्स 18.1 षटकांत सर्व बाद 111 ः रोहित शर्मा 28 चेंडूत 43, डी कॉक 23 चेंडूत 24, इशान किशन 9, सूर्यकुमार यादव 8, कृणाल 5, पोलार्ड 7, हार्दिक 3, बुमराह 5, अवांतर 7. गोलंदाजी ः हर्षल पटेल 4-17, यजुवेंद्र चहल 3-11, मॅक्सवेल 2-23, सिराज 1-15.

Related Stories

विश्वविजेत्या न्यूझीलंडवर कौतुकाचा वर्षाव

Amit Kulkarni

झुंजार पंत, लढवय्या गिल…कांगारुंची बत्ती गुल!

Patil_p

आनंदचा सलग पाचवा पराभव

Patil_p

जर्मनीतील 3 महिन्यांच्या वास्तव्यानंतर आनंदचे मायदेशी आगमन

Patil_p

मुसळधार पावसामुळे तिसरा टी-20 सामना वाया

Patil_p

भारताचे तीन पात्रता फुटबॉल सामने कतारमध्ये

Patil_p
error: Content is protected !!