तरुण भारत

गोमंतकीयांचा पक्ष बनण्याचे तृणमुलचे ध्येय

2022 च्या विधानसभा निवडणुकीत उतरणार : लवकरच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा तृणमुलचे राष्ट्रीय प्रवक्ता डेरिक ओ ब्रायन यांची माहिती

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोमंतकीयांनी गोमंतकीयांसाठी चालविलेला गोव्याचा पक्ष बनण्याचे ध्येय बाळगून तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात दाखल झाला आहे. या पक्षात ’सुप्रिमो’ संस्कृती नसेल आणि ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्वावर त्याचे काम चालेल, अशी माहिती राज्यसभा खासदार तथा पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता डेरिक ओ ब्रायन यांनी दिली. येत्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असे त्यांनी सांगितले.

दै. तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही गोव्यात असून एकुण राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास आणि आढावा घेतला आहे. गोमंतकीयांना काय हवे, काय नको, आतापर्यंतच्या गोव्यातील राजकीय परिथितीबद्दल त्यांचा अनुभव, समस्या, प्रश्न, मागण्या या सर्वांची माहिती प्राप्त केली आहे, असे ते म्हणाले.

सध्या गोमंतकीय जनता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना कंटाळलेली आहे. दोन्ही पक्षांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. काँग्रेस पक्ष आमदार निर्मिती करतो आणि भाजप त्यांची खरेदी करतो, असे चित्र आहे.  विद्यमान सरकारात सत्तास्थानी असलेले दहाही आमदार हे आजही काँग्रेसचेच आहेत. अशा लोकांना घेऊन सरकार चालविणे भाजपच्या नीतितत्वात बसते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे, सदर दोन्ही पक्ष मिळून गोमंतकीयांची फसवणूक, दिशाभूल करत आहेत. अशा पक्षांवर आता लोक विश्वास ठेवणार का?, आणि येत्या निवडणुकीत हे लोक मतदारांना सामोरे जाऊन स्वतःला विजयी करा, अशी मागणी कोणत्या तोंडाने करणार? असे अनेक सवालही त्यांनी उपस्थित केले.

ममता बॅनर्जी लवकरच गोव्यात

भाजप, काँग्रेसला कंटाळलेल्या गोमंतकीयांना आता बदल हवा आहे. नव्या सरकारकडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा तृणमूल काँग्रेस पूर्ण करणार आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पूर्ण ताकदीने कामाला लागल्या असून तशी घोषणाही त्यांनी भवानीपूर मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारादरम्यान केली आहे, असे ओब्रायन म्हणाले. त्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी स्वतः गोव्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लवकरच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा

आम्ही गोव्यात कोणतीही मतविभागणी किंवा मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी आलेलो नाहीत. तसेच आम्हाला विरोधातही बसायचे नाही. आम्ही एक प्रगल्भ पक्ष असून गोमंतकीय जनता आम्हाला विजयी करेल, असा विश्वास आहे, असे ते म्हणाले. सध्या पक्षाचे दोन खासदार, दोन आमदार तसेच अन्य वरिष्ठ नेते गोव्यात दाखल झाले असून विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. लवकरच आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचीही घोषणा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही पक्षाशी युती नाही

ही निवडणूक पूर्णतः स्वबळावर लढणार असून त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही. तृणमूल हा बंगालमधून गोव्यात आलेला पक्ष नव्हे तर गोमंतकीयांनी गोमंतकीयांसाठी चालविलेला गोव्याचा पक्ष असेल. गोव्यात आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवणार आणि याकामी एक प्रगल्भ पक्ष म्हणून गोव्यातील मतदार आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास ओ ब्रायन यांनी व्यक्त केला.

Related Stories

पारंपरिक कलांचे जतन करणार

Patil_p

जागा निश्चित झाल्यावर आंबेडकरभवन उभारणार

Amit Kulkarni

वीजबिले माफ करणारी योजना जाहीर करावी

Patil_p

स्व. मनोहर पर्रीकरांच्या कल्पनेतील राज्यात बंधारे बांधण्याचे नियोजन झाले तर म्हादई आमच्यापुढे मोठी समस्या नाही- माजी मंत्री दयानंद मांद्रेकर

Omkar B

म्हापशात पहिला कोविड रुग्णाचा मृत्यू – माहिती मिळाल्यावर इस्पितळात एकच धावपळ

Patil_p

चोर्ला घाट महामार्ग डांबरीकरणाचे काम सुरु

Amit Kulkarni
error: Content is protected !!