तरुण भारत

नववीच्या पाठय़पुस्तकात संभाजी महाराजांविषयी चुकीचा उल्लेख

संभाजी महाराजांच्या भक्तांमधून तीव्र संताप, चुकीचा मजकूर काढून टाकण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावरून कर्नाटकात राजकारण केले जाते. परंतु यावेळी मात्र याही पुढे जाऊन चक्क संभाजी महाराजांविषयी चुकीचा उल्लेख शालेय पाठय़पुस्तकात करण्यात आला आहे. नववीच्या समाज शास्त्रच्या पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भाग घुसडण्यात आला आहे. या प्रकारामुळे संभाजी महाराजांच्या भक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मराठय़ांचा इतिहास बदलण्याचा प्रकार यापूर्वीही अनेकवेळा झाला आहे. खरा इतिहास विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचू नये याचीच खबरदारी अनेकवेळा घेतली जाते.  नववीच्या कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या समाजविज्ञान पुस्तकात चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. संभाजी महाराज यांच्याकडे दुरदृष्टी नव्हती त्यामुळेच त्यांचे राज्य फार काळ तग धरू शकले नाही. औरंगजेबने केलेल्या हल्ल्यात संभाजी महाराजांचा मृत्यू झाला असा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.

मराठी पुस्तकातून तो मजकूर वगळला

कन्नड पुस्तकाचे मराठीत भाषांतर करण्यात येते. परंतु मराठी माध्यमाच्या पुस्तकात हा मजकूर वगळण्यात आला आहे. भाषांतर करणाऱया व्यक्तीने ही चूक पाठय़पुस्तक मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मराठी माध्यमाच्या पुस्तकात तो उल्लेख वगळण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यावषी पाठय़पुस्तकांच्या छपाईसाठी वेळ झाल्याने टप्प्याटप्प्याने पुस्तकांचे वितरण केले जात आहे. पुस्तकांचे वितरण केल्यानंतर हा चुकीचा उल्लेख निदर्शनास आला.

 मराठी भाषिकांमधून तीव्र संताप

केवळ मराठा समाजातीलच नव्हे तर कर्नाटकात असणाऱया सर्व मराठी भाषिकांमधून पाठय़पुस्तक मंडळाच्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.  बिदर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पाठय़पुस्तक मंडळाचा निषेध करत हा उल्लेख काढून टाकावा. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराच दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मराठीसह कन्नड भाषिकांमध्येही आदराचे स्थान आहे. त्यामुळे हा चुकीचा उल्लेख हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

केवळ सत्तेत येण्यासाठीच थोर पुरूषांच्या नावाचा वापर

छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने निवडणुकांपूरता जयजयकार केला जातो. या थोर पुरूषांच्या कार्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तेव्हा मात्र सर्व राजकारणी मूग गिळून गप्प असतात. केवळ सत्तेत येण्यासाठीच या थोर पुरूषांच्या नावाचा वापर केला जातो का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

पाठय़पुस्तकातील तो मजकूर काढा : युवा समितीची मागणी

नववीच्या कन्नड आणि इंग्रजी पाठय़पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. याचा युवा म. ए. समितीने निषेध केला असून, मंगळवार दि. 28 रोजी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन हा मजकूर काढावा अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिली.

शहापूर लक्ष्मीरोड येथील महा गणपती मंदिरात रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. गणेश विसर्जनावेळी मराठी फलक लावला नाही म्हणून जाब विचारणाऱया मराठी भाषिक तरूणांवरच मनपाच्या अधिकाऱयानी अरेरावी केली. कन्नड संघटनांनी अशा अधिकाऱयांचे सत्कार केले. यामुळे मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून याचा निषेध करण्यात आला. यापुढील काळात संघटना वाढीसाठी नाव नोंदणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सचिन केळवेकर, श्रीकांत कदम, मनोहर हुंदरे, निलेश धामणेकर, इंद्रजीत धामणेकर, अभिजित मजुकर, सागर पाटील, दत्तात्रय पाटील, भैरू पाटील, राहुल भोसले, शांताराम होसुरकर, महांतेश कोळुचे, ओमानी बेडका, प्रवीण रेडेकर, गुंडू कदम, आशिष कोचेरी, निखील देसाई, जोतिबा पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

आज ग्रामीण भागात वीजपुरवठा ठप्प

Patil_p

कर्नाटक पीयूसी द्वितीय वर्षाच्या पुरवणी परीक्षा ७ सप्टेंबरपासून

triratna

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तिथीनुसार शिवपुण्यतिथी गांभीर्याने

Amit Kulkarni

आदिनाथ-आकाशने आपली निवड ठरविली सार्थ

Patil_p

आदर्श सोसायटीच्या खानापूर शाखेचे स्वतःच्या जागेत स्थलांतर

Omkar B

जवानाच्या कुटुंबावर बहिष्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!