तरुण भारत

‘तीन टीएमसी पाणी दिल्यास तात्पुरती योजना राबवू’

संख/प्रतिनिधी

दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकने राबवलेल्या तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची योजना करण्याचा आम्ही प्रयत्न करू, परंतु यासाठी महाराष्ट्राने कर्नाटकला दरवर्षी तीन टीएमसी पाणी द्यावे, असा प्रस्ताव कर्नाटकचे माजी जलसंपदामंत्री तथा आ. एम. बी. पाटील यांनी दिला.

Advertisements

जत तालुक्यातील संख येथे काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा पक्षप्रवेश कृतज्ञता सोहळा समारंभात आ. एम. बी. पाटील बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री आ. सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, आ. विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार जे. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना एम. बी. पाटील म्हणाले, आम्ही तुबची बबलेश्वर योजना करत असताना त्यावेळी स्व. पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. विक्रम सावंत यांनी पाठपुरावा केला होता, परंतु त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडून निर्णय होण्यास वेळ झाला. त्यामुळे जतचा या योजनेचा समावेश झाला नाही. तरीही आज ओव्हरफ्लोने या योजनेतून जत तालुक्यात पाणी येत आहे. शिवाय दरवर्षी मानवता धर्मातून पाणी सोडणे, अशी विनंती जत तालुक्यातून होते. आ. सावंत ही पाठपुरावा करतात. त्यामुळे आम्ही पाणी देत आहोत.

बोम्मई यांचे मन वळवू

जत तालुक्याला म्हैसाळ योजनेतून पाणी मिळेपर्यंत तुबची योजनेतून पाणी देण्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांचे मन वळवू. एक तात्पुरती योजना राबवून त्यातून पाणी देता येईल. परंतु यासाठी महाराष्ट्राने दरवर्षी तीन टीएमसी पाणी द्यावे. हे पाणी मिळाल्यानंतर आम्ही दोन आवर्तनाच्या माध्यमातून जतला एक ते दीड टीएमसी पाणी देऊ. या प्रस्तावावर  नामदार सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जतचे सर्व प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध : सतेज पाटील

सतेज पाटील म्हणाले, जत तालुक्यातील सर्व प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. पूर्व भागातील लोकांना पाणी देण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू, विस्तारित योजना व तुबची योजना या दोन्ही योजनेतून पाणी आणण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू. आज केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱयांच्या विरोधात काळे कायदे आणले आहेत, हे कायदे रद्द झाले पाहिजेत. यासाठी उद्या 27 तारखेला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सहभागी व्हावे. आज जत तालुक्याला विक्रम सावंत यांच्या रूपाने आश्वासक व कामाचा आमदार मिळाला आहे. तालुक्यातील जनतेने त्यांच्या पाठीशी रहावे. या तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवण्यास मी कुठेही कमी पडणार नाही.

सामाजिक न्याय विभागातून दोन कोटी : विश्वजीत कदम

विश्वजीत कदम म्हणाले, जत तालुक्याला सामाजिक न्याय विभागातून दोन कोटींचा निधी देत आहोत. जत तालुक्याला आमचे नेहमीच झुकते माप राहिले आहे. या तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने काम करत आहोत. आपण सर्वांनी काँग्रेसच्या पाठीशी ठाम राहावे. आ. विक्रमदादा सावंत आज विधानसभेत ताकदीने काम करत आहेत. शिवाय या तालुक्याच्या विकासाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बारकाईने लक्ष आहे. येणाऱया काळात दादांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण होतील.

आ. विक्रम सावंत म्हणाले, जत तालुक्यातील इंच न इंच जमीन सिंचनाखाली आले पाहिजे. यासाठी मला जनतेने विधानसभेत पाठवले आहे, हा प्रश्न सुटल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. आज तुबची योजनेतून पाणी मिळू शकते, हे सिद्ध झाले आहे. आज ओव्हरफ्लोतून आलेल्या पाण्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 28 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे दोन्ही सरकारने मानवता धर्मातून मार्ग काढल्यास जतच्या पूर्व भागाला पाणी मिळू शकते. यासाठी आपला संघर्ष यापुढेही चालूच राहील.

अनेकांचा काँग्रेस प्रवेश

या मेळाव्यात भाजपचे जि. प. सदस्य सरदार पाटील, दिलीप वाघमोडे, अरुण साळे, किसन व्हनखंडे, माणिक वाघमोडे, अमीन नदाफ, धनाजी पाटील यांच्यासह अनेक गावच्या सरपंच, सदस्य यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक आप्पाराया बिराजदार यांनी केले. स्वागत सुजय नाना शिंदे यांनी केले. आभार बाबासाहेब कोडग यांनी मांडले.

Related Stories

कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले आकाश दर्शनाचे धडे

triratna

पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर

triratna

सांगली : कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी २१३ कोटींचा आराखडा

triratna

सांगली : तहसिलदारांच्या आश्वासनाने हणमंतवडी ग्रामस्थांचे आंदोलन मागे

triratna

सांगली : इस्लामपुरातील खुनाचा सीसीटीव्ही फुटेजवरुन छडा

triratna

रत्नागिरी : कोकण मार्गावर धावताहेत ९ रेल्वेगाड्या

triratna
error: Content is protected !!