तरुण भारत

बनावट नाणी… झाले काळजाचे पाणी!

बेळगाव, चंदगड, आजरा, विजापूर येथील पाच तरुणांची 15 लाखांना फसवणूक

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

स्वस्तात सोने देण्याचे सांगून बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज व विजापूर येथील पाच तरुणांना 15 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी शिमोगा जिल्हय़ात ही घटना घडली असून सोन्याच्या बदल्यात पितळी नाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे.

उपलब्ध माहितीनुसार 23 सप्टेंबर 2021 रोजी शिमोगा जिल्हय़ातील आनवट्टी, ता. सोरब येथे ही घटना घडली आहे. केवळ 15 लाख रुपयांत अर्धा किलो सोने देण्याचे सांगून एका सोनेरी टोळीने पाच मित्रांना तेथे बोलावून घेतले. त्यांच्या हातात सोन्याचे नाणे असलेली पिशवी देऊन पैसे घेतले व भामटे तेथून निघून गेले. थोडय़ा वेळात आपली फसवणूक झाली, हे या मित्रांच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती ‘तरुण भारत’ला उपलब्ध झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी विजापूर येथील व्यवसायाने वाहनचालक असलेला एक युवक हम्पीला गेला होता. कोणत्या तरी अडचणीमुळे विमनस्क अवस्थेत तो हम्पीत बसला होता. त्यावेळी एका वृद्धाने त्याला गाठले. ‘बाळा घाबरू नकोस, तू काही तरी अडचणीत आहेस. तुझा मोबाईल क्रमांक दे. तुला या अडचणीतून बाहेर काढतो’, असे सांगितले.

वृद्धावर विश्वास ठेवून विजापूरच्या युवकाने त्याला आपला मोबाईल क्रमांक दिला. दुसऱयाच दिवशी त्या वृद्धाचा फोन आला. ‘परसात नारळाचे झाड लावण्यासाठी खड्डा खणत होतो. त्यावेळी ब्रिटिशकालीन सोन्याचे नाण्यांनी भरलेला एक हंडा आपल्याला मिळाला आहे. तुला ते सोने स्वस्तात द्यायचे, ही माझी इच्छा आहे’, असे सांगितले.

रोज विजापूरच्या युवकाला फोन करून सोने खरेदी करण्यासाठी तगादा लावण्यात आला. या तगाद्याला कंटाळून युवकाने शिमोगा जिल्हय़ात जाऊन त्या वृद्धाची भेट घेतली. त्यावेळी प्रत्येकी 8 ग्रॅमची दोन नाणी वृद्धाने त्याच्या हातात ठेवली. ‘हवेतर सोनाराकडे तपासून ये, खात्री पटली तर खरेदी कर’ असे सांगून पाठविले. विजापूरच्या युवकाने दोन नाण्यांच्या बदल्यात दहा हजार रुपये वृद्धाच्या हातात ठेवून आपले गाव गाठले. गावात आल्यानंतर सोनाराकडे नाणी तपासली. त्यावेळी ती 23.9 कॅरेटची असल्याचे दिसून आले.

केवळ दहा हजारांच्या बदल्यात मिळालेली दोन नाणी खरोखर सोन्याची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर युवकाचा उत्साह वाढला. आधीच गरीबी, त्यामुळे तो पिचला होता. त्याने आपल्याच गोतावळय़ातील बेळगाव, चंदगड, गडहिंग्लज येथील पाच मित्रांना एकत्र आणले. कसेही करून 15 लाख रुपये जमवा. आपल्याला अर्धा किलो सोने मिळणार आहे, असे सांगितले. सुरुवातीला मित्रांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. परत सोनाराकडे नाण्यांचा कस तपासण्यात आला. ती नाणी सोन्याची असल्याचे मित्रांचीही खात्री पटली.

या पाच जणांनी आपल्या अंगावरील दागिने गहाण ठेवून 15 लाख रुपये जमविले. काही बँका, सोसायटय़ांनी त्यांना 500 च्या नोटा दिल्या होत्या. त्या नोटा बदलून दोन हजाराच्या नोटा जमविण्यात आल्या. गेल्या बुधवार दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री कारने हे पाच मित्र हुबळी, शिरसी मार्गे शिमोगा जिल्हय़ातील अनवट्टीला निघाले. दुसऱया दिवशी सकाळी ते त्या ठिकाणी पोहोचले.

हे तरुण सोने खरेदी करण्यासाठी निघाले, तेव्हापासून वृद्धाने आपला सूर बदलला. सदर सोने म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी असून तिला तुमच्या स्वाधीन करताना मला प्रचंड मानसिक त्रास आणि अस्वस्थपणा जाणवत असल्याचे तो सांगत होता. हळदकुंकू लावून आपण त्या नाण्यांची पूजा केली आहे. घराबाहेर पडण्यासाठी पाऊल उचलत नाही. तरी काही हरकत नाही. अनवट्टी येथील पुरातन मंदिराजवळ थांबा. दुधाच्या वाहनातून मी तेथे येतो. मी, तुमच्याजवळील पैसे मोजणार नाही. तुम्ही माझ्या पिशवीतील नाणी पाहायची नाहीत, अशी ताकीद त्या वृद्धाने दिली.

सकाळी 6 पासून दुपारपर्यंत वृद्धाने या मित्रांना पळविले. हे नेमके कितीजण आहेत, त्याची खात्री करून घेतली. ‘मला त्रास होतोय, त्यामुळे मी माझ्या नात्यातील व्यक्तीला पाठवतो. त्याच्याकडच्या पिशवीत सोन्याची नाणी आहेत, ती घेऊन पैसे द्या’ असे वृद्धाने सांगितले. थोडय़ाच वेळात केवळ 15 लाखाला अर्धा किलो नाणी मिळणार या आशेने या पाच मित्रांनी वृद्धाच्या प्रत्येक शब्दाला होकार देत गेले. दुपारी 12 वाजता वृद्धाने पाठविलेला माणूस त्यांच्याकडे आला. त्याने नाण्यांची पिशवी दिली. त्या बदल्यात पैशांची पिशवी आपल्या हातात घेऊन क्षणाचाही विलंब न करता तो तेथून निघून गेला. थोडय़ाच वेळात पिशवीतील नाणी हातात घेऊन त्या मित्रांनी ती पाहिली. ती खोटी असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले.

कर्जबाजारी माथी

सोनेरी टोळीच्या नादी लागून फशी पडलेले सर्व पाच युवक गरीब व मध्यमवर्गीय आहेत. स्वस्तात मिळणाऱया सोन्यांच्या नाण्यांमुळे आपली गरीबी दूर होणार, या आशेने त्यांनी आपल्या अंगावरील दागिने गहाण ठेवून 15 लाख रुपये जमविले. गुन्हेगारांनी त्यांना ठकविल्यामुळे त्यांची गरीबी तर दूर झाली नाही उलट कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली. आम्ही फसलो किमान इतरांनी तरी फसू नये, अशी आशा एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.

Related Stories

खानापूर येथे भाजप महिला मोर्चा मेळावा

Amit Kulkarni

भारतात हॉलमार्किंग कायदा लागू

Amit Kulkarni

कुडची फाटक बंदच, नागरिकांना फेरा

Omkar B

शहापूर खडेबाजार रस्त्याचे काम अर्धवटच

Patil_p

टिळकवाडीत आणखी दोन उड्डाणपूल होणार

Patil_p

जाहिरात शुल्क वसुली निविदेकडे पाठ

Amit Kulkarni
error: Content is protected !!