तरुण भारत

सोन्याची नाणी…अडीच लाखाची हानी

बेळगावातील तरुणाचीही फसवणूक, मोबाईलही घेतले काढून

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

स्वस्तात सोन्याची नाणी देण्याचे सांगून बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज व विजापूर परिसरातील पाच मित्रांना 15 लाख रुपयांना गंडविल्याची घटना ताजी असतानाच शिमोगा जिल्हय़ातील आणखी एका सोनेरी टोळीने बेळगावच्या युवकाला अडीच लाखाला गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.

गेल्या रविवार दि. 19 सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून अनगोळ येथील एका तरुणाला फसविण्यात आले आहे. केवळ त्याच्याजवळील पैसेच नव्हे तर दोन मोबाईल संचही काढून घेऊन त्याला धमकाविण्यात आले आहे.

सोमवारी ‘बनावट नाणी… झाले काळजाचे पाणी’ या मथळय़ाखाली ‘तरुण भारत’ने सोनेरी टोळीकडून झालेल्या फसवणुकीसंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. ही बातमी पाहून अनगोळ येथील एका तरुणाने ‘तरुण भारत’शी संपर्क साधला व गेल्या आठवडय़ात शिमोगा जिल्हय़ातील आणखी एका टोळीने आपली कशी फसवणूक केली, याविषयी माहिती दिली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्वतःचे नाव ‘भरत’ असे सांगणाऱया एका युवकाने अनगोळच्या तरुणाशी संपर्क साधला. ‘अर्धा गुंठा जमिनीत खोदाई सुरू असताना आम्हाला 4 किलो सोन्याची नाणी सापडली आहेत. शिमोग्याला येऊन घेऊन जा,’ असे सांगितले. सुरुवातीला या तरुणाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. तगादा वाढताच 19 सप्टेंबर रोजी शिमोगा जिल्हय़ातील हाडोनहळ्ळी (ता. शिमोगा) गाठले. या तरुणाने बेळगाव येथील आणखी एका मित्राला सोबत नेले होते. रविवारी हे दोघे शिमोग्याला जाणार म्हणजे शनिवारी रात्री त्यांना पुन्हा फोन आला. ‘थोडे ऍडव्हान्स घेऊन या’ असे गुन्हेगारांनी सांगितले.

अनगोळच्या तरुणाने आपल्यासोबत अडीच लाख रुपये घेतले. जर सोन्याची नाणी खरी असतील तर बँकेतून व्यवहार करू, असे सांगितले. गुन्हेगारांनीही याला होकार दिला. ‘तुम्ही आधी या’ असे सांगून त्यांना बोलावून घेतले. दुपारपर्यंत वेगवेगळय़ा ठिकाणी त्यांना फिरविले. दुपारी एक तरुण त्यांच्याजवळ आला. ‘तुमच्याजवळील पैसे द्या, माझ्याजवळ 400 ग्रॅम सोन्याची नाणी आहेत, ती घेऊन जा’ असे सांगितले.

बेळगावच्या तरुणाने त्यांना अडीच लाख रुपये दिले. नाण्यांची पिशवी आपल्या हातात घेतली. करार मोडून तो तरुण तेथे असतानाच त्यांनी नाणी तपासण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पाच ते सहा जणांनी हातात दगड घेऊन त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या खिशातील दोन मोबाईल काढून घेतले. दगड मारण्याची भीती दाखवत त्यांना हुसकावून लावले.

हाडोनहळ्ळी येथे आमच्या कुलदेवीचे मंदिर आहे. तेथेच व्यवहार ठरवूया, असे सांगत त्यांना बोलावून घेण्यात आले होते. हल्ल्याच्या भीतीने बेळगाव गाठलेल्या दोन्ही तरुणांनी दोन दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी पुन्हा हाडोनहळ्ळी गाठले. आपल्याला फसवणाऱया तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

गावकऱयांचाही सहभाग?

फशी पडलेल्या तरुणाने आपल्या दहा-बारा मित्रांना घेऊन सोनेरी टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हाडोनहळ्ळी गाठले. त्यांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. त्यावेळी एका महिलेने दिलेला सल्ला थक्क करणारा होता. ‘ते गुन्हेगार खतरनाक आहेत. तुम्ही आलाय तसे येथून निघून जा, त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, ते तुम्हाला मारून टाकतील’, असे सांगून नागरिकांनीही त्यांना तेथून पळविले. त्यामुळे त्यांना पुन्हा बेळगावला खाली हात परतावे लागले. हाडोनहळ्ळी हे गाव शिमोगा तालुक्मयात असले तरी दावणगेरी जिल्हय़ातील चिरुरपासून जवळ होते. अशा अनेक टोळय़ा शिमोगा व दावणगेरीच्या सीमेवर कार्यरत आहेत. आमच्याशी संपर्क साधताना आपले नाव ‘भरत’ असे सांगितले. तरी फेसबुकवर आम्ही त्याची माहिती काढली. सुंदर के. असे त्याचे नाव आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो सापडला नाही. दोन दिवसांनंतर त्याचा मोबाईलही बंद झाला, असे फशी पडलेल्या तरुणाने सांगितले.

Related Stories

देशमुख रोडच्या कामाला अखेर प्रारंभ

Amit Kulkarni

खानापूरची माती म्हणजे शिंपल्यातला मोती

Omkar B

व्हॉल्वला गळती लागून पाणी वाया ; रस्ताही खराब

Amit Kulkarni

छत्री-रेनकोटच्या खरेदीसाठी पसंती

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील अबनाळी गाव झाले सीलडाऊन

Amit Kulkarni

हनगलमध्ये भाजपचा पराभव हा मुख्यमंत्र्यांचा पराभव: सिद्धरामय्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!