तरुण भारत

राजपथावर बेशिस्त वाहतुकीचा युवक ठरला बळी

पादचारी युवकास अज्ञात वाहनाची धडक : रात्री साडेअकराची घटना

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

ग्रेड सेपरेटर झाल्यापासून वाहतूक कोंडी दूर झाली असली तरी साताऱयातील रस्त्यांवर वाहनांचा वेग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांनी चालायचे की नाही असा गंभीर सवाल बुधवारी रात्री घटनेमुळे निर्माण झाला आहे. राजपथावर पोलीस करमणूक केंद्रासमोर रात्री 11.30 वाजता एक अज्ञात भरधाव वाहनाने चालत निघालेल्या साताऱयातील एका युवकास ठोकर दिल्याने तो ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. नागेश शंकर भिवटे (वय 35, रा. मल्हारपेठ, सातारा) असे मृत युवकाचे नाव आहे.

  सातारा शहरासह पोवईनाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे भव्य काम झाले आहे. मात्र, त्यातून सध्या किती वाहतूक होते हा संशोधनाचा विषय आहे. त्यातच सध्या शहरातील रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहने चालवणाऱयांची संख्याही वाढली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज असताना पोलीस दल शांत आहे.

   बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्यान नागेश भिवटे हा युवक राजपथावर दत्तमंदिराकडून चालत निघाला होता. यावेळी पोलीस कमरणूक केंद्रासमोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या घटनेत भिवटे गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्रावही होत होता. घटना समोर आल्यावर तिथे काही नागरिक जमले. मात्र, कोणतेही वाहन थांबण्यास तयार नव्हते. त्याच वेळी कोणीतरी मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेवरील चालक दत्ता माने यांना फोन केला.

   रुग्णवाहिक येईंपर्यंत तिथे फक्त बघ्यांचीच गर्दी होती. कोणीही इतर वाहन चालकाने जखमीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची माणुसकीही दाखवली नाही. रुग्णवाहिका आल्यावर चालक माने यांनी नागरिकांच्या सहकार्याने जखमी नागेश भिवटे यास रुग्णवाहिकेत घेवून सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. उपचारापूर्वीच नागेश भिवटे या युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मल्हारपेठेतील रहिवासी सुनील शर्मा यांनी नागेश भिवटे यास ओळखल्यानंतर त्याची ओळख पटली. दरम्यान, अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अज्ञात वाहनाविषयी कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

एकेरी वाहतूक पुन्हा सुरु करण्याची गरज

एकेरी वाहतूक केल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला होता. तर रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लागलेली होती. मात्र, ग्रेडसेपरेटर नंतर सातारा शहरातील एकेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजपथावर तर भरधाव वेगाने रात्रीच्या वेळी वाहने चालवली जातात. त्यामुळे शतपावली करण्यास आलेल्या नागरिकांना जीव मुठीत धरुनच या रस्त्याने चालावे लागते. रात्रीच्या वेळी अशा प्रकारे भरधाव वेगाने वाहने चालवणारांवर कारवाई करण्यासाठी कोणीच नसते मात्र, एखाद्याचा असा जीव जातो तेव्हा त्याचे गांभीर्य अधोरेखित होते.

भिवटे कुटुंबाचा आधार हरपला   नागेश भिवटे हा मल्हारपेठेतील राऊत मिठाईवाले यांच्याकडे नोकरी करत होता. त्याला वडील नाहीत. आई, भाऊ, बहीण असे एकत्रित रहात होते. नागेश हाच सध्या या कुटुंबाचा आधारवड होता. मात्र, भरधाव अज्ञात वाहनाच्या धडके भिवटे कुटुंबाचा आधारवडच हरपला असून भिवटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा स्वभाव खूप चांगला होता. त्याच्या अचानक जाण्याने मल्हारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

साताऱयात फ्लॅट फोडून लाखोंचे दागिने लंपास

Patil_p

देऊळ बंद पण भक्तांना थांबवणार कोण?

Patil_p

सातारा : विविध मागण्यांसाठी सरपंच परिषदेने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट

Abhijeet Shinde

जिल्ह्यात उपचारार्थ रुग्णसंख्या 10 हजार पार

datta jadhav

साविआच्या पार्टी मिटींगला सत्ताधारी नगरसेवकांची दांडी

Patil_p

एसटीची वाहतूक पूर्वीप्रमाणे झाली सुरु

Omkar B
error: Content is protected !!