तरुण भारत

श्रेयस-अश्विनने मुंबईचे मनसुबे उधळले

आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून विजय

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

श्रेयस अय्यरचे (नाबाद 33) टेम्परामेंट व रविचंद्रन अश्विनने (21 चेंडूत नाबाद 20) गोलंदाजीतील अपयशाची फलंदाजीत विजयी षटकारासह केलेली भरपाई, यामुळे दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल साखळी सामन्यात 4 गडी राखून नमवले व साखळी फेरीअखेर आपले स्थान पहिल्या दोन संघात असेल, हे जवळपास निश्चित केले. मुंबईला प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 129 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 19.1 षटकात 6 बाद 132 धावांसह विजय संपादन केला. 21 धावात 3 बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

शारजाह स्टेडियमच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर 130 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरुवात झाली. एकवेळ तर त्यांचा संघ 11.4 षटकात 5 बाद 77 असा गडगडला होता. पण, पुढे हेतमेयर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर व अश्विन यांनी सावध, संयमी व खराब चेंडूचा समाचार घेणारी भागीदारी साकारत मुंबईचा विजयाचा घास अगदी अलगद हिसकावून घेतला. या जोडीने 39 धावांची अभेद्य भागीदारी साकारली.

विजयासाठी शेवटच्या षटकात 4 धावांची आवश्यकता असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माकडे कृणाल पंडय़ाकडे चेंडू सोपवण्याशिवाय पर्याय नव्हता आणि याचा पुरेपूर लाभ घेत अश्विनने पहिलाच चेंडू षटकारासाठी भिरकावून देत दिल्लीच्या दणकेबाज विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. या विजयासह दिल्लीच्या खात्यावर आता 12 सामन्यात 18 गुण झाले असून दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये स्थान संपादन करण्याच्या आशाअपेक्षांना पहिला जबरदस्त धक्का बसला आहे.

दिल्लीची प्रारंभी पडझड

कमी धावसंख्येचे संरक्षण करताना मुंबईने शिखर धवन (8), पृथ्वी शॉ (6) व स्टीव्ह स्मिथ (9) यांना पॉवर प्लेच्या आतच तंबूत धाडले. केरॉन पोलार्डचा मिडऑनवरुन केलेला डायरेक्ट थ्रो धवनला धावचीत करुन गेला तर डीआरएस घेतल्यानंतर शॉ बाद असल्याचे स्पष्ट झाले. धोकादायक स्मिथला बुमराहने बाद केले. अय्यरने मात्र अनुभव पणाला लावत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला आणि त्याची हीच रणनीती दिल्लीला विजय संपादन करुन देण्यात मोलाची ठरली.

मुंबई फलंदाजीत अपयशी

प्रारंभी, प्रथम फलंदाजीला पाचारण केले गेल्यानंतर मुंबईला 8 बाद 129 अशा तुलनेने किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. अक्षर पटेलने (3-21) क्विन्टॉन डी कॉक (19), सुर्यकुमार यादव (33) व सौरभ तिवारी (15) यांना बाद केले. अर्थात, नंतर अवेश खानने (3-15) रोहितला बाद करत खऱया अर्थाने खळबळ उडवून दिली होती. जागतिक स्तरावरील वेगवान गोलंदाज ऍनरिच नोर्त्झेने (1-19) स्लो ट्रकवर उत्तम मारा केला. सुर्यकुमारचा अपवाद वगळता मुंबईचा एकही फलंदाज 20 धावांचा टप्पाही सर करु शकला नाही, हे दिल्लीच्या गोलंदाजांचे मुख्य यश ठरले.

धावफलक

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. रबाडा, गो. अवेश 7 (10 चेंडूत 1 चौकार), क्विन्टॉन डी कॉक झे. नोर्त्झे, गो. पटेल 19 (18 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), सुर्यकुमार यादव झे. रबाडा, गो. पटेल 33 (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), सौरभ तिवारी झे. पंत, गो. पटेल 15 (18 चेंडूत 1 चौकार), केरॉन पोलार्ड त्रि. गो. नोर्त्झे 6 (9 चेंडू), हार्दिक पंडय़ा त्रि. गो. अवेश 17 (18 चेंडूत 2 चौकार), कृणाल पंडय़ा नाबाद 13 (15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), नॅथन काऊल्टर-नाईल त्रि. गो. अवेश 1 (2 चेंडू), जयंत यादव झे. स्मिथ, गो. अश्विन 11 (4 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), जसप्रित बुमराह नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 6. (नोबॉल 1, वाईड 5). एकूण 20 षटकात 8 बाद 129.

गडी बाद होण्याचा क्रम

1-8 (रोहित, 1.5), 2-37 (क्विन्टॉन, 6.2), 3-68 (सुर्यकुमार, 10.3), 4-80 (सौरभ, 12.5), 5-87 (पोलार्ड, 14.1), 6-109 (हार्दिक, 18.1), 7-111 (नॅथन काऊल्टर-नाईल, 18.4), 8-122 (जयंत यादव, 19.2).

गोलंदाजी

नोर्त्झे 4-1-19-1, अवेश खान 4-0-15-3, रविचंद्रन अश्विन 4-0-41-1, रबाडा 4-0-33-0, अक्षर पटेल 4-0-21-3.

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ पायचीत गो. कृणाल 6 (7 चेंडूत 1 चौकार), शिखर धवन धावचीत (पोलार्ड) 8 (7 चेंडूत 1 चौकार), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. नाईल 9 (8 चेंडूत 1 षटकार), रिषभ पंत झे. हार्दिक, गो. जयंत यादव 26 (22 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), श्रेयस अय्यर नाबाद 33 (33 चेंडूत 2 चौकार), अक्षर पटेल पायचीत गो. बोल्ट 9 (9 चेंडूत 1 चौकार), शिमरॉन हेतमेयर झे. शर्मा, गो. बुमराह 15 (8 चेंडूत 2 चौकार), रविचंद्रन अश्विन नाबाद 20 (21 चेंडूत 1 षटकार). अवांतर 6. एकूण 19.1 षटकात 6 बाद 132.

गडी बाद होण्याचा क्रम

1-14 (धवन, 1.6), 2-15 (शॉ, 2.4), 3-30 (स्टीव्ह स्मिथ 4.1), 4-57 (रिषभ पंत, 8.2), 5-77 (अक्षर, 11.4), 6-93 (हेतमेयर).

गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट 4-0-24-1, जयंत यादव 4-0-31-1, कृणाल पंडय़ा 2.1-0-18-1, जसप्रित बुमराह 4-0-29-1, नॅथन काऊल्टर-नाईल 4-0-19-1, केरॉन पोलार्ड 1-0-9-0.

Related Stories

सलग तिसऱया विजयासाठी एटीके सज्ज; आज ओडिशाशी सामना

Omkar B

माद्रिद ओपनमधून जोकोविचची माघार

Patil_p

स्टेडियम तर रिकामे…मग तो आवाज येतो कुठून?

Patil_p

अल्टमायर, गॅस्टन, व्हेरेव्ह, रुबलेव्ह चौथ्या फेरीत

Patil_p

मियामी स्पर्धेत मरेला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश

Patil_p

आगामी आयपीएल स्पर्धेत आठ संघच राहणार

Patil_p
error: Content is protected !!