तरुण भारत

सांगली : शाळा, कॉलेज आज सुरू, सिटी बस मात्र बंदच !

प्रतिनिधी/सांगली

कोरोनाचे संकट कमी झाल्याने राज्य शासनाच्या नव्या नियमानुसार सोमवारी चार ऑक्टोंबरपासून सांगलीतील शाळा व कॉलेज सुरू होत आहेत. पण राज्य परिवहन विभागाच्या सांगली आणि मिरज एस. टी. आगाराच्या अनेक सिटी बसेस तब्बल दोन वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे सांगलीतील शाळा, कॉलेजला येणाऱया शहराच्या आसपासच्या गावातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला येण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. सांगलीतील सर्व कॉलेजचे याबाबत एकमत झाले असून सिटी बसेस सुरू करण्याबाबत सोमवारीच काही कॉलेज व्यवस्थापनाकडून सांगली आगाराला रितसर पत्र देण्यात येणार आहे.

Advertisements

राज्य शासनाच्या नव्या नियमानुसार सोमवारी चार ऑक्टोंबरपासून शहरी भागात आठवी ते 12 तर ग्रामीण भागात पाचवी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. कॉलेज स्तरावर विशेषतः 11 आणि 12 वीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत आहेत. कोविड 2019 चे सर्व नियम पाळून हे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

 सांगलीतील अनेक कॉलेजमध्ये शहराच्या आसपासच्या गावातून शिक्षणासाठी मुले मुली येत असतात. यात माधवनगर, बुधगांव, कवलापूर, बिसूर, खोतवाडी, वाजेगांव, कर्नाळ, पदमाळे, मौजे डिग्रज, कसबेडिग्रज, तुंग, हरिपूर, कवठेपिरान, दुधगांव, मानमोडी, सुखवाडी, भिलवडी, सावळवाडी, माळवाडी, कुमठे, उपळावी, कांचनपूर, रसुलवाडी, काकडवाडी, बामनोली, काननवाडी, आष्टा, बागणी, नांद्रे, वसगडे, येळावी, बांबवडे, पाचवा मैल आदी अनेक गावांचा यात समावेश आहे. यातील काही अपवाद वगळता ही मुले मुली सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील आहेत. एस.टी. चा पास काढून हे विद्यार्थी सांगलीला येत असतात.

पण कोरोना संकटामुळे सांगली एस. टी. आगाराच्या अनेक मार्गावरील सिटी बसेस गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत. अनलॉकनंतर यातील मिरज, कसबेडिग्रज, औंदुबर, ब्रम्हनाळ, यशवंतनगर अशा काही मोजक्या मार्गावरील सिटी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तर कवलापूर, बुधगांव कॉलेज, बिसूर, मानमोडी, खोतवाडी, मौजे डिग्रज आदी अनेक मार्गावरील सिटी बसेस अजूनही बंद आहेत. आता कॉलेज सुरू होत आहेत. पण शाळा कॉलेजला यायचे कशाने असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. यातील मौजे डिग्रज, मानमोडी, खोतवाडी अशी काही गावे आडवळणी मार्गावर आहेत. येथून शहरात येण्याजाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांना सिटी बसेसचाच आधार आहे. या विद्यार्थ्यांसाठी सिटी बसेस तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.

…कॉलेज आज पत्र देणार

दरम्यान कॉलेज सुरू झाल्याने सांगलीच्या आसपासच्या गावातील विद्यार्थीनींना शहरात येणे सोईचे व्हावे. यासाठी सिटी बसेस सुरू करण्याबाबत सोमवारीच आम्ही कॉलेजच्यावतीने सांगली एसटी आगाराला पत्र देणार असल्याचे येथील पुरोहित कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल मासुले यांनी सांगितले. शाळा, कॉलेज सुरू होत असल्याने सिटी बसेस सुरू करण्याबाबत आता कोणतीच अडचण नाही. असे श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. कुलकर्णी यांनी सांगितले. तर प्रवाशी नसल्याने सिटी बसेस बंद  ठेवण्यात आल्या आहेत. टप्याटप्याने यातील काही मार्गावरील बसेस सुरू करण्यात येत आहेत. शाळा कॉलेज सुरू होत असल्याने आता सिटी बसेसला प्रवाशी मिळतील. त्यामुळे जसजशी मागणी येईल तसतशा बसेस सुरू करण्यात येणार असल्याचे सांगली एसटी आगारातून सांगण्यात आले.

Related Stories

राज्यमंत्री विश्वजित कदम कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

संजयनगर येथे पन्नास हजाराची चोरी

Abhijeet Shinde

सांगलीजवळ माधवनगर मध्ये पिशव्यांच्या कारखान्याला आग

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत कारवाईच्या इशाऱ्याने पुन्हा शटर डाऊन

Abhijeet Shinde

कोरोना काळात औषधांचा काळाबाजार निदर्शनास आल्यास कारवाई करणार

Abhijeet Shinde

‘आरक्षण अधिकार राज्यांना देण्याचा निर्णय चुकीचा’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!