तरुण भारत

साधुलक्षणे-परोपकार, निरिच्छता, दांतता, कोमलता, पवित्रता

अध्याय अकरावा

भगवंत म्हणाले, सर्वांना समदृष्टीने पहाणे ह्या साधूंच्या सहाव्या लक्षणाबद्दल आता सांगतो. साधूला आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले असल्यामुळे समता प्राप्त झालेली असते म्हणून तो सर्व प्राणिमात्रांना समान दृष्टीने पहात असतो. साधूचे परोपकार हे सातवे लक्षण आहे. वृक्ष ज्याप्रमाणे पाने, फुले, छाया, फळ, साल, लाकूड, इत्यादि प्रत्येक अंगाने लोकांना फलदायक होतो व सर्वावर नेहमी परोपकारच करीत असतो. त्यात काही भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे साधूचे वर्तन असते. साधुचा पुढील गुण निरिच्छता हा आहे. त्याला कोणतीही आणि कसलीही इच्छा होत नाही. माणसाला कामवासनेची जबरदस्त इच्छा होत असते पण साधूच्या शय्येवर जरी उर्वशी आली, तरीसुद्धा त्याचा कामविकार क्षुब्ध होत नाही कारण रात्रंदिवस स्वानंदांत रममाण होता होता विषयवासनेला तो विसरून गेलेला असतो. भिकारी पालखीत बसला म्हणजे त्याला पूर्वीच्या वाहनाचे विस्मरण होते, त्याप्रमाणे हाही आत्मानंदाने तृप्त झालेला असल्यामुळे विषयवासना त्याला क्षुद्र वाटते. त्यामुळे तिचा त्याला विसर पडतो.

Advertisements

खरं म्हणजे साधूला अप्राप्य असं काहीच नसतं पण तो प्राप्त झालेल्या स्थितीतच मोठय़ा आनंदाने आत्मानुभवाने शोभत असतो. त्याची विषयवासना सर्वस्वी नष्ट झालेली असते. ही जी साधूची निरिच्छता, तोच आठवा गुण होय. दक्षतेने मनाचे नियमन केले असता ज्ञानेंद्रियांचे नियमन आपोआप घडते. मुख्य सेनापति हातांत सापडला की, बाकीचे सैन्य युद्ध न करताच पराभव पावते, किंवा वृक्षाचे मूळच तोडले असता सर्व फांद्या तोडल्याप्रमाणे गतप्राण होतात. त्याप्रमाणे मनोवृत्तीचे नियमन केले की, बाह्येनद्रियांचेही नियमन होते. अशा स्थितीत जे कर्म घडते, ते निःसंशय निष्काम असेच होते. मन आत्मस्वरूपात जडले आणि बाह्येनद्रिये माझ्या भक्तीमध्ये तल्लीन झाली म्हणजे जी जी कर्मे घडतात, ती ती ब्रह्मस्वरूपच होतात किंवा बाह्येनद्रियांचे संयमन केले असता मनोमय कर्मामध्येही परब्रह्म प्रगट होते. हे बाह्येनद्रियांचे नियमन आत्म्याच्या ठायी रममाण होणारे पुरुषच जाणतात.

अशा प्रकारे बाह्येनद्रियांचे नियमन करण्याचा गुण हीच साधूची ‘दांतता’ म्हणजे निग्रहशक्ति समजावी. हाच साधुचा नववा गुण. आता कोमलता या पुढच्या गुणबद्दल सांगतो. साधूही सर्वांगांनी सर्वांना मृदुच वाटतो. पिंजलेल्या कापसाचा गोळा कोणाचेच कपाळ फोडू शकत नाही. त्याप्रमाणेच साधूचे अंतःकरण सर्वांनाच अत्यंत कोमल वाटते. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी गाय आणि वाघ दोघांनाही सारखेच शांत करते. त्याप्रमाणेच साधूही सर्वांशी केवळ मृदु आणि गोड वागतो. ह्यालाच साधूची अत्यंत मृदुलता असे नाव आहे हे नीट लक्षात ठेव. आता अकरावे लक्षण ऐक. साधूंना जी पवित्रता प्राप्त होते, ती खरोखर भगवद्भजनामुळेच प्राप्त होते.  तप, ज्ञान, तीर्थ, इत्यादिकांना जी पवित्रता आली आहे, ती साधूंमुळेच त्यांना प्राप्त झालेली आहे. परस्त्री आणि परधन ह्यांना ज्यांचे मन मुळीच शिवत नाही, त्यांच्याच चरणस्पर्शाची इच्छा गंगादिक तीर्थे करतात. स्त्री, धन, ह्यांचा लोभ धरणे म्हणजेच अधोगतीला जाणे होय. म्हणून स्त्रीची व धनाची इच्छा न धरणे हीच साधूंची पवित्रता होय. अशी पवित्रता असूनही तो व्रते, तप, तीर्थे इत्यादिकांची निंदा करीत नाही. त्या त्या व्रतादिकांचे यथाविधि आचरण करतांना अत्यंत श्रे÷ वैदिक ब्राह्मणाप्रमाणे तो सदाचरण ठेवतो. मगरानं एखाद्याला मिठी मारली की, तो प्राणसंकट आले तरी ती सोडीत नाही, सापडेल ते सर्वच गिळून टाकतो त्याप्रमाणे साधूची जीवब्रह्माशी मिठी पडलेली असते. त्या ब्रह्मालाच पुढे करून तो आश्रमधर्मादि आपले कर्म उत्तमोत्तम रीतीने आचरून दाखवितो आणि त्या कर्मामध्ये त्याला सारा ब्रह्माचाच अनुभव येतो. तो कर्म करतो असे लोक म्हणतात पण वस्तुतः तो ब्रह्मस्वरूपामध्येच वागत असतो.

क्रमशः

Related Stories

राजस्थानातील नाटय़

Patil_p

अल्झायमर समजून घेताना…

Patil_p

आवाज बंद करून टाकला…!

Amit Kulkarni

पूरग्रस्तांसाठी राजकारण्यांनी एकत्र येण्याची गरज

Patil_p

अक्रूर वाराणसीत

Patil_p

एका लग्नाची गोष्ट (1)

Patil_p
error: Content is protected !!