तरुण भारत

संशोधन विकास अन् राज्यात नंबर वन विद्यापीठ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाच्या कालावधीत विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेणे विद्यापीठासमोर मोठे आव्हान होते. तरीही एकसंधपणे काम करीत ऑनलाईन परीक्षा व निकाल वेळेत पूर्ण केले. सर्वांना सोबत घेऊन नॅक मूल्यांकनात पुढील मानांकन मिळवून 2026 ला राज्यातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचा संकल्प आहे. संशोधनातही जागतिक पातळीवरचे मानांकन मिळवल्याने देश नव्हे तर जगाच्या नकाशात शिवाजी विद्यापीठाचे नाव कोरले, अशा भावना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या वर्षपूर्तीनंतर `तरुण भारत’ने त्यांच्याशी संवाद साधला. |

Advertisements

प्रश्न: कोरोनात कमी मनुष्यबळामध्ये ऍडमिशन, परीक्षा अन निकाल ही आव्हाने कशी पेलली ?

कुलगुरू डॉ. शिर्के : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारला. अन ऑनलाईन परीक्षेचा निर्णय सरकारने जाहीर केला. तांत्रिक मुनष्यबळ, आवश्यक प्रणाली नसल्याने परीक्षा कशा घ्यायच्या मोठा प्रश्न होता. सर्व अधिकार मंडळांच्या परवानगीने ऑनलाईन प्रणाली विकसीत केली, शिक्षक, विद्यार्थी अशा परीक्षेला पहिल्यांदाच सामोरे जाणार होते. याचा दबाव असल्याने माझ्या दिवसाची सुरूवात परीक्षा विभागातून व्हायची. किरकोळ तांत्रिक अडचणी सोडल्या तर परीक्षा, निकाल वेळेत पूर्ण केले, याचे समाधान आहे.

प्रश्न: विविध अधिकार मंडळावर असताना अपेक्षित गोष्टी प्रत्यक्ष कुलगुरू म्हणून कशा सोडवत आहात ?

कुलगुरू डॉ. शिर्के: गेली 35 वर्षे विविध अधिकार मंडळावर काम केल्याने, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुलगुरू म्हणून पहिलाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन घेऊन विद्यार्थ्यांना स्पीड पोस्टाने पदवी प्रमाणपत्रे पाठवली. जवळपास 90 शिक्षकांना व कर्मचाऱयांना पदोन्नती तसेच महावीर कॉलेज, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी कॉलेजला स्वायतत्ता दिली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी आयोजित केलेला` मंत्रालय आपल्या दारी’ उपक्रमात 900 तक्रारी ऑनलाईन घेऊन सोडवल्या.

प्रश्न : ऑनलाईनची आव्हाने पेलत समाजाशी नाळ कशी जोडली ?

कुलगुरू डॉ. शिर्के: विद्यापीठात कोरोना केअर सेंटरची स्थापना केली. `माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ ही संकल्पना राबवली. महापुरात शहरातील लोकांना पाणी अन् जनावरांना चारा दिला. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून मोफत मार्गदर्शन दिले जात आहे. कोरोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडीलांचा मृत्यू झाला अशा विद्यार्थ्यांना 50 लाख रुपयांचे वाटप केले.

प्रश्न : लॉकडाऊनमध्ये संशोधन कशा पद्धतीने सुरू होते ?

कुलगुरू डॉ. शिर्के: कोरोनाशी निगडीत व इतर संशोधनासाठी सुविधा पुरविल्या. त्यामुळे विद्यापीठातील 47 संशोधकांनी संशोधनाचा झेंडा अटकेपार लावला. जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटी 34 लाखाचा निधी रेशीम उद्योग विभागासाठी मिळाला. हवामान बदल व शाश्वत विकास नवीन सेंटर सुरु केले. भूकंप मापन तीन वर्षापासून बंद होते ते कार्यान्वित केले. याचा संपर्क हैद्राबाद येथील संस्थेशी जोडला गेला असून प्रत्येक क्षणाचा डेटा पाठविला जात आहे. विविध कंपन्यांशी करार करून संशोधनाला चालना दिली.

प्रश्न : कुलगुरू म्हणून भविष्यातील संकल्प काय ?
कुलगुरू डॉ. शिर्के: युजीसीच्या नियमानुसार दूरशिक्षण विभाग ऑनलाईनसाठी पात्र झाला आहे. भविष्यात एमबीए, एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एम. एस्सी. मॅथस, एम. कॉम अभ्यासक्रम ऑनलाईन होणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्युझियम परिसरात वीरगळ, शिलालेखांचे खुले संग्रहालय सुरू करणार आहे. मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या स्थापनेसाठी कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचे पालकमंत्र्यांकडे 8 कोटींची मागणी केली आहे. वाणिज्य विभाग, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, भगवान महावीर अभ्यास केंद्राच्या नवीन इमारतींचे बांधकाम करणार आहे. 2023 ला एनआयआरएफ मानांकनात निश्चित बदल झालेला दिसेल.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५ हजारांवर

Abhijeet Shinde

संततधार, गारठा, अन् दमट हवामान कम्युनिटी स्प्रेडसाठी ठरतेय पोषक, पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत वाढ

Abhijeet Shinde

मराठा आरक्षण लढ्याचे आज कोल्हापुरातून रणशिंग

Abhijeet Shinde

बेटी बचाव फाऊंडेशनमार्फत स्कूल बॅगचे वाटप

Abhijeet Shinde

पुलाची शिरोलीत चाळीस दिवसात ३२ मृत्यू

Abhijeet Shinde

कर्मचाऱ्यांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!