तरुण भारत

केकेआर-राजस्थान यांच्यात आज महत्त्वाची लढत

कर्णधार मॉर्गनचा खराब फॉर्म केकेआरसाठी चिंतेचा, अन्य खेळाडूंवरच पुन्हा एकदा मुख्य भिस्त

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

दोनवेळचे चॅम्पियन्स कोलकाता नाईट रायडर्स झगडणाऱया राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज (गुरुवार दि. 7) आयपीएल साखळी सामन्यात एकतर्फी विजयासाठी हरसंभव प्रयत्नशील असणार आहे. येथे विजय संपादन केल्यास केकेआर प्ले-ऑफमध्ये पात्रता निश्चित करण्यासाठी पुढे सरसावेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.

केकेआरचा संघ 13 सामन्यात सध्या 12 गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान आहे. ते सरासरी धावगतीच्या निकषावर विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सपेक्षा  आघाडीवर आहेत. मुंबईच्या खात्यावर देखील 13 सामन्यात 12 गुण असून त्यांची शेवटची साखळी लढत शुक्रवारी तळाच्या स्थानावरील सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होत आहे.

केकेआर व मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांनी आपापले शेवटचे सामने जिंकले तर अशा परिस्थितीत धावसरासरीचा निकष अमलात येईल आणि या निकषावर इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ (0.294) आघाडीवर आहे. मुंबईची धावसरासरी -0.048 इतकी आहे. केकेआरची या स्पर्धेतील दुसऱया टप्प्यातील कामगिरी 4 विजय व 2 पराभव अशी संमिश्र आहे. या संघाला दोन वेळा पराभूत व्हावे लागले असले तरी त्यांचे हे दोन्ही पराभव अगदी निसटते होते.

केकेआरने दुसऱया टप्प्यात आरसीबी व मुंबईविरुद्ध सलग दोन विजय संपादन केले होते. नंतर चेन्नईने त्यांची ही विजयी परंपरा खंडित केली. पुढे टेबलटॉपर्स दिल्लीला नमवत ते विजयाच्या ट्रकवर परतले होते. फलंदाजीत वेंकटेश अय्यर या संघाचा स्टार परफॉर्मर ठरला असून राहुल त्रिपाठीने देखील लक्षवेधी योगदान दिले आहे. शुभमन गिलने मागील लढतीत अर्धशतक झळकावले होते. बढती मिळाल्यानंतर नितीश राणाने देखील आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. कर्णधार मॉर्गनचा खराब फॉर्म मात्र या संघासाठी चिंतेचा ठरत आला आहे.

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शकीब अल हसनला या दुसऱया टप्प्यात प्रथमच संधी मिळाली आणि त्यानेही भेदक मारा केला होता. गूढ फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला केकेआरचे पुन्हा एकदा प्राधान्य असेल. सुनील नरेनही सातत्याने विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.

आंद्रे रसेल व लॉकी फर्ग्युसन यांच्या गैरहजेरीत टीम साऊदी व शिवम मावी यांच्याकडे नव्या चेंडूवर मुख्य धुरा सोपवली गेली आहे. पेसर प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात 4 बळी घेतले आहेत. चेन्नईविरुद्ध 19 व्या षटकात 22 धावांची लयलूट करु दिल्यानंतर त्याला यापूर्वी संघातून अर्धचंद्र देण्यात आला होता.

संभाव्य संघ

केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शकीब अल हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, टीम सेफर्ट.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, इव्हिन लुईस, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, ओशेन थॉमस, मुस्तफिजूर रहमान, तबरेझ शमसी, ग्लेन फिलीप्स, चेतन साकरिया, रियान पराग, राहुल तेवातिया, आकाश सिंग, अनुज रावत, केसी करिअप्पा, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मयांक मार्कंडे, जयदेव उनादकट, कुलदीप यादव (ज्युनियर), महिपाल लोमरोर.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

राजस्थान रॉयल्सचा संघ केकेआरची पार्टी स्पॉईल करणार का?

8 संघांच्या गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्सचे या हंगामातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांच्या खात्यात 13 सामन्यातून 10 गुण आहेत. त्यांच्या दृष्टीने यंदाची आयपीएल स्पर्धा जवळपास संपलेली आहे. मात्र, त्यांनी जाता जाता केकेआरला पराभूत केल्यास हा पहिला मोठा धक्का ठरु शकतो. अर्थात, यासाठी यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकरियासारख्या खेळाडूंनी अव्वल योगदान देणे क्रमप्राप्त ठरु शकते.

Related Stories

जपानच्या ओसाकाच्या मानांकनात घसरण

Patil_p

धोनीने वर्ल्डकपनंतर निवृत्त होणे योग्य ठरले असते

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचे सर्व क्रिकेटपटू कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Patil_p

स्पेनचे टेनिसपटू मॅन्युएल सँटाना कालवश

Patil_p

मानांकन यादीत बेलारूसची साबालेन्का सातव्या स्थानी

Patil_p

कोरोना संकटात ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून PM Care फंडला मदत!

Rohan_P
error: Content is protected !!