तरुण भारत

कळंगूटमध्ये सुरक्षा रक्षकावर हल्ला

कोयता, तलवार, मिरी प्रेचा वापर : कळंगुट, पेडणेतून चौघांना अटक

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणात नाईकवाडा-कळंगूट येथे एका सुरक्षा रक्षकावर प्राणघातक खुनी हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा हल्लेखोरांना कळंगूट तसेच पेडणे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला रात्रीच तर तिघांना बुधवारी पहाटे पेडणे येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडण्यात यश मिळविले आहे.

तोर्ड – पर्वरी येथील स्वप्नील रेडकर (30) हा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यात सहभागी झालेला टारझन पार्सेकर (नागवे-बार्देश), सूर्यकांत कांबळी (शंकरवाडी-ताळगाव), इमरान बेपारी (सांताक्रूझ – मेरशी) तसेच सूरज शेटय़े (मेरशी) या चौघाही संशयितांना कळंगूट तसेच पेडणे पोलिसांनी पकडले आहे. त्यांची रवानगी कळंगूट पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या हल्ल्यातील संशयित गुंडांचा याआधीही अनेक गुह्यांत सहभाग असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी दिली.

हल्ल्यात कोयता, तलवार, प्रेचा वापर

कळंगूट पोलीस तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास संशयित गुंड टारझन पार्सेकर हा इमरान बेपारी, सूरज शेटय़े तसेच सूर्या कांबळी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाला. नाईकवाडा-कळंगूट येथे कामावर असलेल्या स्वप्नील रेडकर याला गाठून सर्वप्रथम त्यांनी त्याच्या डोळय़ात काळय़ा मिरीचा प्रे मारला. सूर्यकांत कांबळी याने स्वप्नीलच्या उजव्या पायावर कोयत्याने वार केला. तसेच त्याच्या पोटावर लोखंडी सळीने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. हल्लेखोर टारझन पार्सेकर हा स्वतः हाती तलवार घेऊनच घटनास्थळी आला होता, असे स्वप्नील रेडकर याने सांगितले. आपणास मारहाण होत असताना संशयित इमरान बेपारी हा इतर हल्लेखोरांना चेतावणी देत होता, असेही रेडकर याने पोलिसांना सांगितले.

स्वप्नील रेडकरची प्रकृती स्थिर

या हल्ल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या कळंगूट पोलीस पथकाने संशयित गुंड टारझन पार्सेकरला जागीच ताब्यात घेतले तर अन्य संशयित सूर्यकांत कांबळी, इमरान बेपारी आणि सूरज शेटय़े हे तिघे बुधवारी पहाटे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पेडणे येथे त्यांच्या मुसक्या आवळल्या. हल्ल्यासाठी वापरलेली तलवार सध्या पोलिसांनी जप्त केली आहे. स्वप्नील रेडकर यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे, असे पोलीस निरीक्षक रापोझ यांनी सांगितले.

पर्वरीचे पोलीस अधीक्षक गजेंद्र प्रभूदेसाई, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रापोझ अधिक तपास करीत आहेत.

या हल्ल्याला गॅंगवॉर म्हणता येणार नाही : सक्सेना

उत्तर गोव्याचे अधीक्षक शोबीत सक्सेना पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या हल्ल्याला गँगवॉर म्हणता येणार नाही. सखोल तपास केल्यानंतर हल्ल्याचे कारण उघड होईल. काही क्लबमध्ये गडबड सुरु असल्याचा फोन आल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीस अटक केली. नंतर अन्य तिघांना पेडणेमधून पकडण्यात आले. जे शांतता भंग करतात, अशा या प्रकारच्या गुन्हेगारीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. इमरान बेपारी जामिनावर बाहेर आहे. तो काही गुह्यांमध्ये सामील आहे. अशा गुन्हेगारांना हाताळण्यासाठी कठोर तरतुदी आहेत. आम्ही योग्य कारवाई करू जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा सहन केल्या जाणार नाहीत. याला गँगवॉर म्हणणे योग्य ठरणार नाही.

गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा डागाळली : गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका

भाजप सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर घणाघाती टीका करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात भाजप सरकारला आलेल्या अपयशामुळे कुख्यात गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे आणि ते गुन्हे करत रस्त्यावर मोकळे फिरत आहेत, असे म्हटले आहे. वारंवार होणारी टोळीयुद्धे आणि वाढत्या गुन्हेगारीने गोव्याची प्रतिमा नष्ट केली आहे आणि सामान्य गोमंतकीयांचे जीवन भयभित व असुरक्षित बनवले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत जर गोव्यातील लोकांना सुरक्षा देऊ शकत नसतील, तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. सावंत गृहमंत्रिपदावर असताना राज्यात कित्येक गंभीर गुन्हे घडलेले आहेत आणि गुन्हे वाढतच आहेत. त्यांची असमर्थता लोकांचे जीव घेत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

भाजपने राज्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोवा एक महान, गौरवशाली आणि सुवर्ण राज्य म्हणून ओळखले जाते. एक समृद्ध संस्कृती, वारसा आणि आदरातिथ्य करणारे लोक येथे आहेत. गुन्हेगारीविरुद्ध लढण्याचा आणि न्यायासाठी उभे राहण्याचा आमचा इतिहास आहे. परंतु या भाजप सरकारने ते चुकीच्या धोरणांमुळे नष्ट केले आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

गृहमंत्र्यांची अकार्यक्षमता स्पष्ट दिसते

भाजप सरकाराच्या काळात राज्यात आता टोळय़ा, बंदुका आणि गुंड दिसत आहेत. राज्यातील कुटुंबांना सुरक्षा हवी जी हे सरकार पुरवण्यात अपयशी ठरले आहे. आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा राज्याच्या विधानसभेत मांडला होता, परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गृहमंत्री म्हणून सावंत यांची अकार्यक्षमता सध्या टोळय़ा आणि सर्व प्रकारच्या ग्न्हुय़ांतून दिसत आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.

बलात्कार आणि दरोडे हे आधीच दैनंदिन झालेले आहेत. आता त्यात टोळीयुद्ध जोडले गेले आहे. सरकारची सुस्ती आणि प्रशासनाची मूलभूत, घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यातील अपुरेपणा याचा हा थेट परिणाम आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. गोमंतकीयांना माहीत आहे की, भाजप सरकारचे दिवस भरले आहेत. पण जनतेने एक मिनीट सुद्धा त्रास का सहन करावा, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

Related Stories

बुधवारी कोरोनाचे 17 बळी

Amit Kulkarni

सांखळी राधाकृष्ण देवस्थानच्या मंदिर परिसरात सुशोभीकरण

Amit Kulkarni

पॅटरिंग उद्योगासही प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सक्तीचे

Omkar B

मुरगावात पालिका निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांची जय्यत तयारी, राखीवतेमुळे सुप्त भिती आणि चिंताही, मात्र, काहींचा उघडपणे प्रचार

Amit Kulkarni

पाचव्या दिवशी पेडणेत ट्रक मालक संघटनेचे आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

पुरावे असल्यास त्यांनी ते गुन्हा अन्वेषण वा प्रसार माध्यमाकडे द्यावे-

Patil_p
error: Content is protected !!