तरुण भारत

प्ले-ऑफ निश्चितीसाठी मुंबईला आज शेवटची संधी

आयपीएल साखळी फेरीची आज सांगता होणार, मुंबई इंडियन्ससमोर तळाच्या स्थानावरील हैदराबादचे आव्हान

वृत्तसंस्था /अबु धाबी

Advertisements

प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी जर-तरच्या समीकरणात सापडलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आज शेवटच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा धुव्वा उडवण्याचे आव्हान असणार आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध 8 गडी राखून सहज विजय संपादन केल्यानंतर मुंबईच्या आशाअपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. येथे त्यांची हैदराबाद संघाविरुद्धची लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.

मागील लढतीतील विजयानंतर विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सचे 13 सामन्यात 12 गुण झाले आहेत व त्यांची धाव सरासरी -0.048 इतकी आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आजच्या लढतीत मुख्य धुरा स्वतःकडे घेऊन लढावे लागेल. या टप्प्यात त्याने बऱयाचदा आश्वासक सुरुवात केली. मात्र, तो याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करण्यात अपेक्षेइतका यशस्वी ठरलेला नाही. या हंगामात रोहितच्या खात्यावर 363 धावा नोंद आहेत. त्याचा सहकारी सलामीवीर इशान किशनला मात्र फॉर्ममध्ये बरीच सुधारणा करावी लागेल. सध्या त्याच्या खात्यावर 157 धावा आहेत.

मधल्या फळीतील फलंदाजांचा खराब फॉर्म ही मुंबईची सर्वात चिंतेची बाब ठरत आली आहे. सुर्यकुमार यादव (235 धावा), अष्टपैलू हार्दिक पंडय़ा (117), केरॉन पोलार्ड (232), सौरभ तिवारी (115) या सर्वांनाच आज सर्वोत्तम खेळ साकारावा लागेल. गोलंदाजीत मात्र मुंबईला फारशी चिंता नाही. मागील लढतीत राजस्थानला अवघ्या 90 धावांवर रोखत त्यांनी आपला फॉर्म अधोरेखित केला. साहजिकच, आजच्या महत्त्वपूर्ण लढतीत गोलंदाजी लाईनअपमध्ये बदल होण्याची फारशी शक्यता नाही. आघाडीचा जलद गोलंदाज जसप्रित बुमराह (19 बळी) उत्तम बहरात असून त्याला ट्रेंट बोल्ट, नॅथन कोल्टर-नाईलकडून अधिक साथ अपेक्षित आहे. मागील लढतीत कोल्टर-नाईल व जयंत यादव यांनी लक्षवेधी मारा केला होता.

सनरायजर्ससाठी औपचारिक लढत

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद संघाचे या हंगामातील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असून येथील औपचारिक लढतीत विजयी सांगता करणे, हेच त्यांचे लक्ष्य असेल. मागील लढतीत विल्यम्सनला सूर सापडला होता. तोच कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र, जेसॉन रॉयसह नवोदित अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग, अब्दुल समद व साहा यांनाही कामगिरी उंचावण्यावर भर द्यावा लागेल. विंडीजचा अष्टपैलू जेसॉन होल्डरचे योगदान देखील महत्त्वाचे ठरु शकेल.

Related Stories

टेलर, कायतानो यांची अर्धशतके

Patil_p

माराडोना यांच्यावरील उपचारांबद्दल साशंकता

Patil_p

सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंड पुन्हा पराभूत

Patil_p

सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

झगडणाऱया मुंबईसमोर आज पंजाब किंग्सचे आव्हान

Patil_p

चेन्नईसमोर आज आरसीबीचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!