तरुण भारत

केएल राहुलच्या तडाख्यात चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा!

अवघ्या 42 चेंडूत नाबाद 98 धावांची आतषबाजी, औपचारिक लढतीत पंजाब किंग्सचा 6 गडी राखून एकतर्फी विजय, चेन्नईसाठी पराभवाची हॅट्ट्रिक

वृत्तसंस्था /दुबई

Advertisements

कर्णधार केएल राहुलने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम खेळी साकारल्यानंतर पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सचा 6 गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 134 केल्या तर प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने अवघ्या 13 षटकातच 4 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. सामनावीर केएल राहुलने 42 चेंडूत 7 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 98 धावांची आतषबाजी केली व हेच या औपचारिक लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

विजयासाठी 135 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना केएल राहुल जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडत राहिला. चौकारापेक्षाही षटकार अधिक फटकावणाऱया या दिग्गज फलंदाजाने शार्दुल ठाकुरला षटकार फटकावतच संघाच्या विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब केले.

पंजाब किंग्सला या हंगामात काही सामने अगदी निसटत्या फरकाने गमवावे लागले. येथे मात्र राहुलच्या तडाख्यातून चेन्नई सुपरकिंग्सचा एकही गोलंदाज सुटला नाही आणि यामुळे या संघाने औपचारिक लढतीत सहज विजय संपादन केला.

28 धावात 3 बळी घेणारा शार्दुल ठाकुर चेन्नईचा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. मात्र, दीपक चहर (4 षटकात 1-48), जोश हॅझलवूड (3 षटकात 0-22), डेव्हॉन ब्रेव्हो (2 षटकात 0-32) यांच्याकडे राहुलची फटकेबाजी रोखण्यासाठी कोणताच प्लॅन नव्हता. पॅडवर टाकला गेलेला प्रत्येक चेंडू सफाईने फाईनलेग व मिडविकेटच्या दिशेने फटकावत केएलने चेन्नईच्या गोलंदाजांवर उत्तम वर्चस्व गाजवले. केएल व मयांक (12) यांनी अवघ्या 4.3 षटकातच 46 धावा फटकावल्या. नंतर केएलने शाहरुख खानसमवेत (8) तिसऱया गडय़ासाठी 4 षटकात आणखी 34 धावा जोडल्या. अर्थात, या विजयानंतरही पंजाबची धाव सरासरी फारशी सुधारली नाही. या विजयानंतर त्यांच्या खात्यावर 12 गुण झाले.

चेन्नईतर्फे प्लेसिसची फटकेबाजी

प्रारंभी, चेन्नई सुपरकिंग्सतर्फे फॅफ डय़ू प्लेसिसने 55 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांसह सर्वाधिक 76 धावांचे योगदान दिले. मात्र, सहकारी सलामीवीर ऋतुराज गायकवाडसह (12) मधल्या फळीत मोईन अली (0), उत्थप्पा (2), रायुडू (4) अतिशय स्वस्तात बाद झाले. धोनी 12 धावांवर परतला तर रविंद्र जडेजा 17 चेंडूत 15, ब्रेव्हो 2 चेंडूत 4 धावांवर नाबाद राहिले. पंजाबतर्फे ख्रिस जॉर्डन (2-20), अर्शदीप सिंग (2-35) यांनी प्रत्येकी 2 तर रवी बिश्नोईने 1 बळी घेतला.

जेव्हा स्टेडियम गॅलरीतच दीपक चहरने प्रपोज केले!

चेन्नई-पंजाब यांच्यातील सामना पूर्ण झाल्यानंतर येथे अनोखा नजारा पाहण्यास मिळाला. चेन्नईचा जलद गोलंदाज दीपक चहरने सामना संपल्यानंतर लगेच स्टेडियम गॅलरीकडे जात त्याची मैत्रीण जया भारद्वाज हिला प्रपोज केले आणि तिनेही क्षणात होकार दिल्यानंतर नजाराच बदलून गेला. जयाने होकार दिल्यानंतर उभयतांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात  अभिनंदन केले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर नंतर बराच व्हायरल झाला.

धावफलक

चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड झे. शाहरुख खान, गो. अर्शदीप 12 (14 चेंडूत 1 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. राहुल, गो. शमी 76 (55 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), मोईन अली झे. राहुल, गो. अर्शदीप 0 (6 चेंडू), रॉबिन उत्थप्पा झे. ब्रार, गो. जॉर्डन 2 (6 चेंडू), अम्बाती रायुडू झे. अर्शदीप, गो. जॉर्डन 4 (5 चेंडू), महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. बिश्नोई 12 (15 चेंडूत 2 चौकार), रविंद्र जडेजा नाबाद 15 (17 चेंडूत 1 चौकार), डेव्हॉन ब्रेव्हो नाबाद 4 (2 चेंडूत 1 चौकार). अवांतर 9. एकूण 20 षटकात 6 बाद 134.

गडी बाद होण्याचा क्रम ः 1-18 (ऋतुराज, 3.5), 2-29 (मोईन, 5.4), 3-32 (उत्थप्पा, 6.5), 4-42 (रायुडू, 8.3), 5-61 (धोनी, 11.6), 6-128 (प्लेसिस, 19.3).

गोलंदाजी :

शमी 4-0-22-1, हरप्रीत ब्रार 4-0-22-0, अर्शदीप सिंग 4-0-35-2, ख्रिस जॉर्डन 3-0-20-2, रवी बिश्नोई 4-0-25-1, हेन्रिक्यूज 1-0-9-0.

पंजाब किंग्स : केएल राहुल नाबाद 98 (42 चेंडूत 7 चौकार, 8 षटकार), मयांक अगरवाल पायचीत गो. शार्दुल 12 (12 चेंडूत 2 चौकार), सर्फराज खान झे. प्लेसिस, गो. शार्दुल 0 (3 चेंडू), शाहरुख खान झे. ब्रेव्हो, गो. चहर 8 (10 चेंडूत 1 षटकार), एडन मॅरक्रम झे. धोनी, गो. शार्दुल 13 (8 चेंडूत 1 षटकार), मोईसेस हेन्रिक्यूज नाबाद 3 (3 चेंडू). अवांतर 5. एकूण 13 षटकात 4 बाद 139.

गडी बाद होण्याचा क्रम : 1-46 (मयांक, 4.3), 2-46 (सर्फराज, 4.6), 3-80 (शाहरुख, 8.6), 4-126 (मॅरक्रम, 12.1).

गोलंदाजी

दीपक चहर 4-0-48-1, जोश हॅझलवूड 3-0-22-0, शार्दुल ठाकुर 3-0-28-3, रविंद्र जडेजा 1-0-9-0, डेव्हॉन ब्रेव्हो 2-0-32-0.

Related Stories

पॅरीस मॅरेथॉन आगामी ऑक्टोबरमध्ये

Patil_p

रशियाची कॅसात्किना विजेती

Patil_p

सिटी ओपन टेनिस स्पर्धा रद्द

Patil_p

दुखापत गंभीर नाही : बजरंग पुनिया

Amit Kulkarni

मँचेस्टर सिटीमध्ये डायसचा लवकरच समावेश

Patil_p

क्रिकेट न्यूझीलंडने हात झटकले

Patil_p
error: Content is protected !!