तरुण भारत

स्मार्ट सिटीतील पथदीप सुरू करण्यासाठी वायरचा आधार

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असून डेकोरेटिव्ह दिव्यासह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. तसेच संपूर्ण शहरात एलईडी पथदीप बसविण्याचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र पथदीप चालू-बंद करण्यासाठी स्वीच बसविण्यात आले नसल्याने वायरचा आधार घेतला जात आहे. परिणामी लोंबकळणाऱया वायर नागरिकांसाठी धोकादायक बनल्या आहेत.

Advertisements

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. रस्त्यांचा विकास, अत्याधुनिक पद्धतीचे पथदीप, डिजिटल फलक, डेकोरेटिव्ह दिवे तसेच नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्ची घालण्यात आला आहे. पण शहर आणि उपनगरात असलेला पथदीप सुरू करण्यासाठी स्वीच नसल्याने कामगारांना वायरचा आधार घ्यावा लागत आहे. ठिकठिकाणी पथदीपांकरिता फ्युज बॉक्स बसविण्यात आले होते. पण सदर फ्युज बॉक्स निकामी झाल्याने याचा वापर बंद झाला आहे. साध्या वायरद्वारे पथदीप चालू-बंद करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी विद्युत खांब्यांवर पथदीपांच्या वायर लेंबकळताना दिसतात. बहुतांश ठिकाणी या वायर चार ते पाच फुटाच्या उंचीवर असल्याने खांबाशेजारी थांबणाऱया नागरिकांना धोकादायक आहे. तसेच लहान मुलांना देखील सदर वायर जीवघेण्या बनल्या आहेत. काही ठिकाणी बॉक्सच्या आतमध्ये फ्युज बसवून पथदीप चालू-बंद करण्यात येत होते. पण पावसाळय़ात पाण्यामुळे बॉक्समध्ये विद्युत प्रवाह प्रसारित होऊन धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे बॉक्सच्या बाहेर फ्युज बसविण्यात आले होते. पण सर्व ठिकाणांचे फ्युज खराब झाले असून त्या ठिकाणी कोणतेच स्वीच बसविण्यात आले नाही. त्यामुळे वायरद्वारेच पथदीप चालू-बंद करण्यात येत आहेत.

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱया शहरात प्रत्येक खांबांवर लोंबकळणाऱया विद्युतवाहिन्या आढळून येतात. त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर वायर विद्युत खांबाला चिकटल्यास याचा धोका नागरिकांना होऊ शकतो. तसेच पथदीप चालू-बंद करणाऱया कर्मचाऱयांनादेखील लोंबकळणाऱया वायरचा धोका आहे. पथदीप सुरू करताना विद्युत प्रवाहामुळे ठिणग्या निर्माण होतात. त्यामुळे त्याचा धोका पोहचू शकतो. तेव्हा धोकादायक वायर हटवून पथदीप चालू-बंद करण्यासाठी स्वीच बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

शहराच्या पाणीपुरवठय़ात सोमवारपर्यंत व्यत्यय

Amit Kulkarni

सामूहिक लढय़ातूनच बेळगावचे प्रश्न सुटतील

Omkar B

समस्या सोडविण्यासाठी लघु उद्योजक आले एकत्र

Patil_p

भूमिगत कचराकुंडय़ांचे लवकरच लोकार्पण

Amit Kulkarni

सदाशिव आयोगाला मान्यता द्या

Patil_p

बेळगाव जिल्ह्यातील आणखी 11 जणांना कोरोना

Rohan_P
error: Content is protected !!