तरुण भारत

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

नवरात्री सोहळय़ाचे प्रांतिक रंग

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ही ओळख आपण देशाच्या प्रतिज्ञेत केवळ गुणगुणतच नाही तर देशाचा, समाजाचा घटक म्हणून या उक्तीचा अनुभवही घेतो. दहा कोसावर भाषा बदलते, पोषाख बदलतो, राहणीमान वेगळे असते, खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण असते. संस्कृतीचे पदर विविधांगी असतात. सण,उत्सव साजरे करण्याच्या प्रथा-परंपरही निरनिराळय़ा असतात. यातून त्या त्या प्रदेशाचा ठसा उमटवत प्रांतोप्रांतिच्या सण्,उत्सवाचे रंग उधळले जात असतात. यापैकीच एक म्हणजे नवरात्रीचा उत्सव. देशातील प्रत्येक प्रांतात नवरात्रीचा मंगलमय सोहळा होतो मात्र त्या त्या प्रदेशानुसार हा सोहळा साजरा करण्याच्या पध्दती व संस्कृती वैविध्यपूर्ण असते. सोहळा, प्रथा, परंपरा वेगळय़ा असल्या तरी भावनांचा धागा मात्र भक्तीनेच गुंफलेला असतो. याच विविधतेचा उत्सव साजरा करण्याचे ‘नवरात्र’ हे एक उदाहरण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्री. ह्या नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या दरम्यान देवीची नऊ वेगवेगळी रूपे पूजली जातात. हा उत्सव म्हणजे आपण स्वतःला नवचैतन्याने भरून टाकण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. भारतभरात नवरात्र उत्सव विविधतेने साजरा केला जातो.

Advertisements

पश्चिम भारतात रंगतो गरब्याचा फेर

पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात राज्यात नवरात्रीचा उत्सव गरबा आणि दांडिया रास नृत्याच्या माध्यमातून साजरा केला जातो. गरबा हा नृत्याचा मोहक प्रकार असून त्यात स्त्रिया एका कलशात ठेवलेल्या दिव्याभोवती वर्तुळात फेर धरून आकर्षकरित्या नृत्य करतात. गरबा किंवा गर्भा म्हणजे मातेचा गर्भ आणि इथल्या संदर्भात कलशातील दिवा प्रतिकात्मकरित्या गर्भातील जीवाला दर्शवतो.

पूर्व भारतात शक्तीची आराधना

पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात शरद नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गा पूजा म्हणून साजरे केले जातात. दुर्गा देवी हाती सारी शस्त्रs घेऊन सिंहावर आरूढ दाखविली जाते. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हवी असलेली तीव्रता सूचित करतात. आठवा दिवस हा परंपरेनुसार दुर्गाष्टमीचा असतो. महिषासुराचा वध करताना दर्शविणाऱया दुर्गा देवीच्या मूर्तीचे पाच दिवस पूजन केले जाते आणि पाचव्या दिवशी नदीत विसर्जन केले जाते. दुर्गाच्या रूपाने याठिकाणी शक्तीची पूजा होते.

दक्षिण भारतात होतो जागर

दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये वेगवेगळय़ा बाहुल्या आणि छोटे पुतळे यांचे प्रदर्शन असलेला ‘कोलू’चे आयोजन केले जाते. कन्नडमध्ये ह्या प्रदर्शनाला गोंबे हब्बा, तामिळमध्ये बोम्माई कोलू, मल्याळममध्ये बोम्मा गुल्लू तर तेलगूत बोम्माला कोलुवू असे म्हणतात.

कर्नाटकात दसरा विशेष महत्वाचा. नऊ रात्र यक्षगान म्हणजे महाकाव्याचे पठण आणि त्यानंतर जागर केला जातो.कर्नाटकातील म्हैसूरचा शाही दसरा पाहण्यासारखा असतो. आजही ही परंपरा जपली जाते. महानवमीच्या दिवशी आयुध पूजा’ केली जाते. म्हैसूर येथे प्रमुख रस्त्यावरुन चामुंडा देवीची भव्य मिरवणूक काढत दसरा साजरा केला जातो.

  नवरात्र हे पर्व चेतनेशी जोडण्याचे पर्व आहे आणि या रुढी-परंपरा त्यासाठी मदतीस येतात. तसेच हे नऊ दिवस आपल्याला विश्रांतीसाठी, ऊर्जेने भरभरून घेण्यासाठी आणि आपल्या ‘स्व’ सोबत एकरूप होण्यासाठी दिलेले आहेत. म्हणून नवरात्री साजरी करण्याच्या परंपरांचे रंग जरी वेगळे असले तरी असत्याचा विनाश व सत्याचा विजय ही भावना समान आहे.

महाराष्ट्रात बसतो घट

महाराष्ट्रात घटस्थापनेपासून दसऱयापर्यंत नवरात्रीचा सोहळा असतो. महाराष्ट्रात घट बसला की नवरात्रीला सुरुवात होते. नव्या पेरणीला दसऱयानंतर सुरूवात होणार असल्याने शेतातल्या मातीचा कस तपासण्यासाठी पत्रावळीतल्या मातीत बियाणे पेरून पाहिलं जातं. दसऱयापर्यंत ते तरारून आलं की बियाणे शंभर नंबरी आहे हे पाहण्याची ही जणू शेतकऱयाची प्रयोगशाळाच. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही पूर्ण शक्तिपीठे तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. त्याशिवाय प्रमुख मंदिरांमध्ये विधिवत घट बसवून नवरात्र साजरी केली जाते. पंचमी, अष्टमी आणि विजयादशमी यादिवशी देवीचे मुख्य सोहळे असतात. पालखी मिरवणूक, अष्टमीचा जागर यामुळे नवरात्रीला मांगल्याचे रूप येते. व्रतवैकल्ये केली जातात.

उत्तर भारतात होतो विजयोत्सव

उत्तरेत नवरात्रीचा उत्सव हा विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रभूरामाने रावणावर विजय मिळवला म्हणून दसऱयाला रामलीला सादरीकरण करून या उत्सवाची सांगता होते. रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे दहन केले जाते. उत्तरेत नवरात्रीच्या काळात एकमेकांना भेटी देण्याची परंपरा आजही जपली जाते. वाईट गोष्टींचा अंत करून चांगल्या गोष्टींचा आनंद साजरा करूया हा संदेश प्रामुख्याने उत्तरेत दिला जातो.

संकलन – अनुराधा कदम

Related Stories

77 वर्षीय इसमावर जडले 20 वर्षीय युवतीचे प्रेम

Patil_p

किल्ले राजगडावर शिवप्रेमींतर्फे पालखी सोहळा जल्लोषात साजरा

Rohan_P

श्रीराम मंदिराकरीता श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे 51 लाखांचा निधी

Rohan_P

ऊंट गाडीवर पहिली मोबाइल लायब्रेरी

Amit Kulkarni

या गावात पादत्राणे घालण्यावर बंदी

Amit Kulkarni

मोगऱ्याच्या सुवासिक फुलांचा ‘दगडूशेठ गणपतीला’ अभिषेक

Rohan_P
error: Content is protected !!