तरुण भारत

रत्नागिरीत ‘महाराष्ट्र बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

प्रतिनिधी/ रत्नागिरी

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ घोषित केला होता. लांजा व खेड तालुका वगळता इतर सात तालुक्यात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. जिह्यात कोठेही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही. जिल्हयात †िठकठिकाणी प्रशासनाला उत्तरप्रदेशमधील लखीमपूर दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी, यासाठे निवेदने देण्यात आली.

Advertisements

रत्नागिरीत दुकाने बंद करण्यास भाग पाडले

  रत्नागिरीत तालुक्यात बंदच्या हाकेला संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातसह अनेक भागात व्यापाऱयानी दुकाने उघडी ठेवली होती. दुकाने उघडी असल्याचे निदर्शनास येताच ती बंद ठेवण्याचे आवाहन राजकीय पक्षातर्फे करण्यात आले तर काही दुकाने शिवसैनिकांनी बंद करायला लावली. काही दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यांनतर सर्व दुकाने उघडण्यात आली. रत्नागिरी शहरासह मुख्य मार्गावरील काही दुकाने सकाळी सुरु होती. शिवसैनिकांनी शहरात रॅली काढून व्यापाऱयांना उघडलेली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. त्यावेळी रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांनी लखीपूर येथील घटनेचा जोरदार घोषणाबाजीने निषेध नोंदवला.

   येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात फेरफटका मारून दुकाने बंद ठेवण्याचे व्यापाऱयांना आवाहन केले. दुकाने वगळता अत्यावश्यक सेवांसह इतर सर्व सेवा रत्नागिरीत सुरळीतपणे सुरू होत्या. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

चिपळुणात बंद पुकारणारे पक्षही गायब

चिपळूण तालुक्यात व्यापाऱयांच्या एका संघटनेने दुपारी 12 पर्यंत दुकाने बंद ठेऊन सहकार्य केले, तर दुसऱया संघटनेने यात सहभाग घेतला नाही. विशेष म्हणजे बंद पुकारणारे पक्षही गायब असल्याचे दिसून आले.

बंदच्या पूर्वसंध्येला व्यापाऱयांच्या दोन संघटना वेगवेगळय़ा भूमिकेत होते. तरीही सोमवारी बाजारपेठ बंद राहत असल्याने सर्वच व्यापारी दुकाने बंद ठेवतील असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात अर्धी बाजारपेठ व खेर्डीतील सर्वच दुकाने सुरू होती.  त्यामुळे या बंदचा  फज्जाच उडाला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 अधिकारी, 40 कर्मचारी, वाहने असा फौजफाटा सकाळपासून ठिकठिकाणी तैनात होता.

दापोलीत  50 टक्केच प्रतिसाद

बंदला दापोलीत 50 टक्केच प्रतिसाद लाभला. शहरातील काहींनी आपली दुकाने उघडली होती. सोमवारी महाराष्ट्र बंद करण्याच्या आवाहनाची कल्पना दापोलीतील अनेक व्यापाऱयांना नव्हती. सायंकाळी राजकीय पक्षांनी बाजारपेठेमध्ये फिरून दुकानदारांना आवाहन केले. या आवाहनाला 50 टक्के दुकानदारांनी साथ दिली, तर काही दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. दापोलीत दुकानदारांची एकी नसल्याने एक दुकान उघडे तर दुसरे बंद अशी परिस्थिती असल्याचे काही दुकानदारांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

मंडणगड शहरासह तालुक्यात संमिश्र  

मंडणगड तालुक्यात बंदला शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात संमीश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी शहरातील मुख्य चौकात आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या तालुक्यातील पदाधिकाऱयांनी एकत्र येत निदर्शने केली व शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध केला. बंदमुळे सर्वसामान्यांचे जीवन प्रभावित असताना शासकीय-निमशासकीय बँका, पतसंस्थांची तालुक्यातील कार्यालये सुरु होती..

 गुहागरात  केवळ 10 मिनिटांचा दिखावा, प्रतिसाद नाही

 गुहागर तालुक्यात शृंगारतळी, आबलोली व पालशेत येथे व्यापाऱयांनी बंद पाळला. परंतु गुहागर शहरामध्ये केवळ 10 मिनिटांसाठी दुकानाची शटर ओढून बंदचा दिखावा करण्यात आला. पूर्ण दिवस शहर मात्र सुरूच होते. सोमवारी शृंगारतळी व आबलोली बाजारपेठ बंदच असते. काही मोजकी दुकाने दर सोमवारी उघडतात त्यांनीही शृंगारतळी व आबलोलीत दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीला साथ दिली. परंतु गुहागर शहरात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

संगमेश्वरात बंद परवडणारा नसल्याची प्रतिक्रीया

सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संगमेश्वर तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील बहुतांश दुकाने सुरू होती. देवरुख व साखरपा बाजारपेठ दर सोमवारी बंद असल्याने त्याचा या बंदवर परिणाम झाला नाही. आधीच बाजारात ग्राहक नाहीत, मंदी आहे अशा स्थितीत हा बंद परवडण्यासारखा नसल्याची प्रतिक्रिया अनेक व्यापाऱयांनी दिली.

  राजापुरात थंड प्रतिसाद 

 राजापूर तालुक्यातील सर्व दुकाने व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू होती. पाचल बाजारपेठेत दुपारनंतर बंद ठेवत सहभाग दर्शवला. राजापुरात या बंदला थंडा प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. राजापूर शहर आणि तालुका परिसरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. राजापूर आगारातून कोल्हापूर, पुणे, सोलापूर, तुळजापूर या मार्गावर जाणाऱया सोमवारच्या फेऱया बंद ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागासह रत्नागिरी, मुंबई मार्गावरिल वाहतूक सुरळीत सुरू होती, अशी माहिती राजापूर आगार प्रशासनाने दिली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राजापूरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.

 खेडमध्ये  उत्स्फूर्त प्रतिसाद

खेडमध्ये  बंदला व्यापाऱयांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बाजारपेठ बंदमुळे सर्वत्र सन्नाटा पसरला होता. काही भागात दुकाने अर्धवट स्थितीत उगडी होती.

लांजातील व्यापाऱयांचा अचानक पूर्ण प्रतिसाद 

महाराष्ट्र बंदला पाठींबा देण्यावरून व्यापाऱयांचा निर्णय मागेपुढे असताना सोमवारी व्यापाऱयांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे लांजा बाजारपेठत दिवसभर शुकशुकाट पसरला होता. लांजा व्यापारी संघटनेने बाजारपेठ बंद न ठेवता काळ्या फिती व निषेध बॅनर लावून सहभाग दर्शवणार असल्याचे रविवारी सोशल मीडियावर जाहीर केले होते. मात्र सोमवारी प्रत्यक्षात पाठींबा देत दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवली होती.

Related Stories

कोकण मार्गावर २३पासून धावणार ‘साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल’

Abhijeet Shinde

शाळा सुरु करण्यासाठी प्रशासनाची लगबग

Patil_p

गाळेल येथे अडकलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

NIKHIL_N

शहरातील रुग्णवाढीला नगराध्यक्ष अन् प्रशासन जबाबदार!

NIKHIL_N

आमच्या सभेला सात-आठ हजारांची गर्दी आणि शिवसेनेच्या शाखेसमोर…; नारायण राणेंचा टोला

Abhijeet Shinde

रत्नागिरी : उपचारादरम्यान काेराेना रुग्णाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!