तरुण भारत

दिल्ली-केकेआर ‘व्हर्च्युअल सेमी फायनल’ आज

आयपीएल हंगामातील फायनलचा दुसरा मानकरी ठरणार, दिल्लीची गोलंदाजी-कोलकाताची फलंदाजी यातच रंगणार खरी चुरस

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

आपल्या पहिल्यावहिल्या आयपीएल जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची आज (बुधवार दि. 13) दुसऱया क्वॉलिफायर लढतीत बलाढय़ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खऱया अर्थाने लिटमस टेस्ट रंगणार आहे. या लढतीतील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार असल्याने एका अर्थाने ही व्हर्च्युअल सेमी फायनल असेल. उभय संघातील ही महत्त्वपूर्ण लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.

यापूर्वी, पहिल्या क्वॉलिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, साखळी फेरीअखेर पहिल्या दोन संघात समाविष्ट असल्याने त्यांना फायनलमध्ये धडक मारण्यासाठी दोनवेळा संधी मिळाली आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाला आज पुन्हा अपयशाचा सामना करावा लागला तर मात्र त्यांच्यासाठी ही हंगामाची सांगता असणार आहे.

केकेआरचे मनोबलही उंचावलेले

यापूर्वी आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर लढत जिंकल्याने दोनवेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्सचे मनोबल उंचावलेले असणार आहे. साहजिकच, आजची लढत अधिक चुरशीची होऊ शकते. केकेआरने विराट कोहलीच्या संघाची आयपीएल जेतेपद संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा संपुष्टात आणली. आता तोच धडाका दिल्लीविरुद्ध कायम राखत फायनलमधील स्थान निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीअखेर 10 विजय संपादन करत अव्वलस्थान काबीज केले होते. पण, हाच धडाका त्यांना पहिल्या क्वॉलिफायरमध्ये चेन्नईविरुद्ध कायम राखता आला नाही. त्यामुळे, त्यांना येथे दुसऱया क्वॉलिफायरवर अवलंबून रहावे लागले आहे. ऑस्ट्रेलियन महान फलंदाज रिकी पाँटिंगने प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने सातत्याने प्रगती केली आहे. 2019 मधील आवृत्तीत हा संघ दुसरा रनर-अप ठरला. त्यानंतर मागील हंगामात ते उपविजेते ठरले. आता यंदा जेतेपदाचे लक्ष्य समोर ठेवून त्यांची वाटचाल असणार आहे.

दिल्ली सर्वोत्तम समतोल संघ

दिल्लीचा संघ या हंगामातील सर्वोत्तम समतोल संघापैकी एक राहिला असून कणखर फलंदाजी आणि मजबूत गोलंदाजी, हे त्यांचे ठळक वैशिष्टय़ ठरले आहे. अनुभवी रविचंद्रन अश्विनची उपलब्धता या संघासाठी जमेची बाजू ठरत आली आहे.

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर यांच्यासारखे अव्वल फलंदाज असल्याने या संघाची आघाडी फळी कणखर असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. मध्यफळीत दुखापतग्रस्त मार्कस स्टोईनिसची जागा शिमरॉन हेतमेयरने तितक्याच ताकदीने भरुन काढली आहे. शिखर धवन (618 धावा) मागील हंगामात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसऱया स्थानी विराजमान होता. यंदाही 551 धावांसह त्याने सातत्य राखले आहे. त्याचा सलामीचा सहकारी पृथ्वी शॉ देखील चेन्नईविरुद्ध लढतीत बहरात परतला आहे.

गोलंदाजीच्या आघाडीवर, या संघाची भिस्त दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाजी जोडी कॅगिसो रबाडा (2020 पर्पल कॅप विजेता) व ऍनरिच नोर्त्झे यांच्यावर अवलंबून आहे. या जोडीने 2020 मध्ये एकत्रित 52 बळी घेतले आहेत. त्यानंतर स्पीडस्टार अवेश खानने या हंगामात 23 बळींसह लक्षवेधी मारा साकारला आहे.

संभाव्य संघ

दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्झे, अवेश खान, बेन डॉर्शुईस, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरिवाला, प्रवीण दुबे, टॉम करण, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोईनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्ज, विष्णू विनोद.

केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शकीब अल हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, टीम सेफर्ट.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

वरुण चक्रवर्ती, सुनील नरेनवर पुन्हा एकदा स्पॉटलाईट

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ संयुक्त अरब अमिरातीतील आयपीएलच्या दुसऱया टप्प्यात सातत्यपूर्ण कामगिरी साकारत आला असून आज दिल्ली कॅपिटल्सला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी आरसीबीविरुद्ध अष्टपैलू योगदान देणाऱया सुनील नरेनसह वरुण चक्रवर्तीवर स्पॉटलाईट असणे साहजिक मानले जाते.

या हंगामात फलंदाजी ही केकेआरची मजबुतीची बाजू राहिलेली नाही आणि याचाच लाभ घेण्याचा दिल्ली कॅपिटल्सचा प्रयत्न असणार आहे. केकेआरने फायनलमधील दुसरे स्थान निश्चित करायचे असेल तर शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी व स्वतः कर्णधार मॉर्गन यांना पुढाकाराने लढावे लागणार आहे. यापैकी राहुल त्रिपाठीने संघातर्फे हंगामात सर्वाधिक 393 धावा जोडल्या आहेत.

कोट्स

जलद गोलंदाज कॅगिसो रबाडा या हंगामात खराब फॉर्ममध्ये आहे, याचा आज दिल्ली कॅपिटल्सला फटका बसणार का, हे पहावे लागेल. मागील 4 सामन्यात एकही बळी घेता न आलेल्या रबाडाला सूर सापडणे दिल्लीसाठी महत्त्वाचे असणार आहे.

-विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा

Related Stories

आरसीबी संघाची घोडदौड आज किंग्स इलेव्हन पंजाब रोखणार?

Omkar B

जर्मनीच्या ऑलिंपिक फुटबॉल संघात क्रूस चा समावेश

Patil_p

केनिन-स्वायटेक यांच्यात आज जेतेपदाची लढत

Patil_p

रिषभ, वॉशिंग्टनची नितांत ‘सुंदर’ फलंदाजी!

Patil_p

विजेत्या गोकुळम केरळाचे कोझिकोडेत भव्य स्वागत

Patil_p

ब्रिस्बेन स्पर्धेतून शरापोव्हाचे पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!