तरुण भारत

विजय सरदेसाईंचा काँग्रेसला धक्का, तृणमूलमध्ये जाणार ?

प्रशांत किशोर यांची नवी चाल, प्रसाद गावकर आज तृणमूलशी नाते जोडणार, अमित शहा घेणार सुदिन यांची भेट?,राजकीय हालचाली वाढल्या, भाजपचा युतीसाठी प्रयत्न

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

राज्यात आगामी काही दिवसांत मोठय़ा राजकीय घडामोडी घडण्याच्या मार्गावर आहेत. मगो नेते सुदिन ढवळीकर यांना उद्या अमित शहा भेटण्याची शक्यता वाढली आहे. तृणमूलचे राजकीय सल्लागार आणि देशातले राजकीय स्ट्रटजिस्ट प्रशांत किशोर गेले तीन दिवस गोव्यात ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या विषयाला वेगळे वळण मिळाले आहे. भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे. विजय सरदेसाई हे आता काँग्रेस पक्षाला झुवारीत बुडवायला निघाले असून ते स्वतःच तृणमूलमध्ये जाण्याची शक्यताही वाढली आहे. या साऱया घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे आज तृणमूलशी नाते जोडणार आहेत.

तृणमूलचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी गोव्यात भाजपची राजवट संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला संपविण्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोव्यात कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर युती न करता 40 ही मतदारसंघात स्वबळावर आणि बऱयाच महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन निवडणुकीत जाण्याचा निर्णय तृणमूलने घेतला आहे. प्रशांत किशोर यांनी गळ टाकले असून त्यांच्या गळाला मोठे मासेही लागलेले आहेत. गेले 3 दिवस गोव्यात ठाण मांडून बसलेल्या प्रशांत किशोर यांनी मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्या बांदिवडे निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यांना मोठी ऑफरही दिली.

काँग्रेसचे गोवा निरीक्षक दिनेश गुंडुराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व उपाध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांना घेऊन मंगळवारी रात्री सुदिन ढवळीकर यांच्या निवासस्थानी बांदिवडे येथे त्यांना भेटावयास गेले. सुदिन ढवळीकर यांना भेटावयास जाणाऱयांच्या संख्येत सध्या बरीच वाढ झाली आहे.

अमित शहा भेटणार सुदिन यांना?

प्राप्त माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी गोव्यात भाजपची सत्ता  उलथविण्याचा विडा उचलल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक निरीक्षक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्यावर जबाबदारी टाकून सुदिन यांना मुंबईत बोलावून घेतले. तिथे त्यांनी संभाव्य युतीबाबत चर्चा केली. सुदिन त्यांना भाजप सरकारमधील तीन मंत्र्यांना जनतेने घरी पाठविण्याअगोदर तुम्ही पाठवा. मगच चर्चा करु असे शेवटी सांगितले. फडणवीस यांनी हा विषय अमित शहा यांच्यापर्यंत मांडतो, असे आश्वासन दिले.

प्रशांत किशोर यांनी गेल्या 3 दिवसांत जवळपास सर्वच आमदार, मंत्री, काही पक्षांचे पदाधिकाऱयांशी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या गोवा भेटी दरम्यान मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना युतीबाबतचा प्रस्ताव सादर करतील. भाजपच्या पहिल्या सर्वेक्षणातील अहवालात राज्यात भाजपची स्थिती बिकट असल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपने आपल्या धोरणात बदल केला आहे.

विजय लवकरच घेणार मोठा निर्णय

दरम्यान, काँग्रेसबरोबर युतीसंदर्भात गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने प्रतिसाद दिला नसल्याने अखेर विजय सरदेसाई फार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प्राप्त माहितीनुसार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे तृणमूलमध्ये विसर्जन करण्याचा प्रस्ताव तृणमूलने दिलेला आहे. विजय सरदेसाई यांच्याबरोबर प्रशांत किशोर यांची मंगळवारी झालेली तिसरी महत्त्वाची बैठक होती आणि ही बैठक यशस्वी झाली आहे.

होय महत्त्वाच्या टप्प्यावर आम्ही पोहोचलोय : विजय

तृणमूलने कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही, परंतु विजय सरदेसाई आमच्याबरोबर असतील असे सायंकाळी स्पष्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांना विचारले असता आम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर आलोय. भाजपला हटविणे हे आमचे सर्वांचे उद्दिष्ट आहे. त्याकामी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मनात तसे दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसचा नाद आता आम्ही सोडून दिला. माझ्यासमोर जो प्रस्ताव आहे तो स्वीकारीन आणि राज्यातील जनतेचे स्वप्न आपण पूर्ण करीन असे सांगून तृणमूल पक्षात प्रवेश करणार असे स्पष्ट सांगितले नसले तरी त्यांची देहबोली हेच सांगत आहे. काँग्रेस पक्ष आत्महत्या करतोय याचा आपल्याला खेद होतोय, असेही विजय सरदेसाई म्हणाले.

प्रसाद गावकर तृणमूलमध्ये आज नाते जोडणार

दरम्यान, सांगेचे आमदार प्रसाद गावकर हे आज तृणमूल काँग्रेस पक्षात जात असल्याची घोषणा करतील किंवा ते आपला पूर्ण पाठिंबा तृणमूल काँग्रेसला जाहीर करतील. काँग्रेस पक्षासाठी तो एक मोठा धक्का असून असे अनेक धक्के तृणमूल काँग्रेस पक्ष पुढील 15 दिवसांत काँग्रेस पक्षाला देणार आहे.

सुदिन यांनी घेतले प्रतापसिंह राणे यांचे आशीर्वाद सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सुमारे तास – दीड तास चर्चा केली व त्यांचे आशीर्वाद घेतले. सांखळी येथे जाऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेचा तपशिल समजला नाही.

Related Stories

घरात एकच उमेदवारी, घराणेशाहीला थारा नाहीच!

Patil_p

डिचोलीत मंगळवारी सार्वजनिक गुढीपाडवा

Amit Kulkarni

कोरोंटाईनसाठी खलाशांकडून पैसे आकारणार नाही

Omkar B

भाजीच्या वाहनांवर मोले चेकनाक्यावर बंदी घालावी

Omkar B

पणजी मार्केटात कांदा 20 ते 30 रुपयांनी स्वस्त

Omkar B

प्ले-ऑफमधील चौथ्या स्थानासाठी आज गोवा-हैदराबाद लढत

Amit Kulkarni
error: Content is protected !!