तरुण भारत

पाकिस्तानात सरकारपेक्षा सैन्य वरचढ

इम्रान यांच्या मर्जीशिवाय सैन्यप्रमुखांनी बदलला आयएसआय प्रमुख – सैन्याच्या विषयांमध्ये हस्तक्षेप न करण्याची ताकीद

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

Advertisements

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. या संघर्षास कारणीभूत तालिबान आहे. तालिबानची काबूलमध्ये भेट घेणारे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या प्रमुखाला बदलण्यात आले आहे. बाजवा यांनी मागील आठवडय़ात आयएसआय प्रमुख जनरल फैज हमीद यांना हटवून लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुमी यांची या पदावर नियुक्ती केली होती. पण इम्रान खान यांच्या कार्यालयाने नियुक्तीची अधिसूचना काढली नव्हती. तेव्हापासून इम्रान खान आणि बाजवा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

फैज हमीद यांना आयएसआय प्रमुखपदावरून हटविले जाऊ नये अशी भूमिका इम्रान यांची होती. पण बाजवाने यांनी इम्रान यांना सैन्याच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करून स्वतःच्या मर्यादा ओलांडू नका अशी ताकीद दिली आहे. इम्रान अद्याप हमीद यांना 15 नोव्हेंबरपर्यंत या पदावर ठेवू शकतात. पाकिस्तानातील कथित निवडणुकांमध्ये आयएसआय प्रमुखाची भूमिका महत्त्वाची ठरत असते. अशा स्थितीत फैज हमीद यांना या पदावर ठेवून इम्रान स्वतःची सत्ता कायम राखू पाहत असल्याचे मानले जात आहे.

इम्रान यांच्या मंत्र्याचे स्पष्टीकरण

इम्रान खान आणि सैन्यप्रमुख यांच्यात कुठलाचा वाद नसल्याचे पाक सरकारचे म्हणणे आहे. आयएसआय प्रमुख बदलण्यावरून दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाली होती. बाजवा यांनी याप्रकरणी सरकारला विश्वासात घेतले होते असा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे. सैन्यप्रमुखांशी चर्चा करून आयएसआय प्रमुखाची नियुक्ती करण्याचा अधिकार पंतप्रधानांकडे आहे.

हमीदवर संतापले बाजवा

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट स्थापन होण्यापूर्वी जनरल फैज हमीद काबूल येथे गेले होते. त्यांच्याच हस्तक्षेपामुळे तालिबानची राजवट स्थापन झाली होती. सैन्यप्रमुख बाजवा यांची मंजुरी न घेताच हमीद काबूलमध्ये पोहोचले होते. यामुळे संतापलेल्या बाजवा यांनी आयएसआय प्रमुख पदावरून हमीद यांना बाजूला सारले आहे.

सैन्यप्रमुख होण्याची धडपड

माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद पाकिस्तानचे नवे सैन्यप्रमुख होण्याची धडपड करत असल्याची चर्चा आहे. हमीद आणि बाजवा यांच्यात तणाव खूप आधीपासून आहे. 3 वर्षांपूर्वी रावळपिंडीत सैन्याच्या एका गृह प्रकल्पावरून दोघांमध्ये मतभेद सुरू झाले होते. इम्रान यांनी बाजवा यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिल्यावर सैन्यप्रमुख पदासाठीची चढाओढ उघडपणे समोर आली होती. फैज यांनी अनेकवेळा बाजवा यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले होते.

Related Stories

अंटार्क्टिकात तुटला विशाल हिमखंड

Patil_p

चीनमध्ये बोट उलटून 8 ठार, 7 जण बेपत्ता

Patil_p

व्यावसायिक अस्वस्थ

Patil_p

अमेरिकेकडून काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट करणाऱ्या हल्लेखोरांचा खात्मा

triratna

चिनी जहाजांना जपानने पिटाळले

Omkar B

रशिया, मेक्सिकोतही नवा संकरावतार

Patil_p
error: Content is protected !!