तरुण भारत

तेरा चेहरा…

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा

बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा…

Advertisements

गझलकार इलाही जमादार यांनी लिहिलेल्या आणि

गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी उत्कटतेने गायलेल्या ह्या ओळी त्यांच्या पाठी असलेलं फार मोठं गुपित अलगद उलगडत जातात. आरसा आणि चेहरा या दोन गोष्टींची सांगड घालत हे शेर पुढे पुढे सरकतात. थोडक्मयात माणसाचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा आहे हे दाखवते ही गजल. खुद्द आरशालाच आरसा दाखवणारी. पूर्वी माणसं जेव्हा स्वतःला आरशात पहायची तेव्हा आत्मपरीक्षण आपोआप व्हायचं. जर का स्वतःच्या नजरेला नजर देता आली नाही तर ती माणसं अस्वस्थ व्हायची. स्वतःसमोरही स्वतःची मान खाली जाईल असं कृत्य घडू द्यायची नाहीत. कारण जे आपण कुणाशीही बोलत नाही ते त्या चेहऱयावर स्वच्छ लिहिलेलं असतं. जगाशी खोटं बोलणारा स्वतःच्या चेहऱयाची भाषा ना लपवू शकत आणि

ना दुर्लक्षित करू शकत.

चेहरा नसलेल्या चेहऱयाने

मनी एका चेहऱयाला गुंतविले

सावलीने जणु किरणाला पापणीत लपविले.

कविवर्य अभिजीत नांदगावकर यांनी लिहिलेल्या गीताच्या या ओळी अर्थाच्या दृष्टीने काहीशा दुर्बोध जरी वाटत असतील तरीही अगदी बिनचेहऱयाच्या व्यक्तीलाही चेहरा असतो, कुणाच्या तरी चेहऱयाला तो गुंतवू शकतो असं सांगणारं हे सूचक काव्य किती छान आहे!

चाँद भी देखा, फूल भी देखा

बादल, बिजली, तितली, जुगनू

कोई नहीं है ऐसा, तेरा हुस्न है जैसा

किसका चेहरा अब मैं देखूँ

तेरा चेहरा देखकर, मेरी आँखो ने चुना है

तुझको दुनिया देखकर!

आजही लाखेंच्या हृदयाची धडकन? असलेल्या मिलिंद सोमणचा तो मिट्ट गोड चेहरा, त्यावरचे त्याचे तितकेच ‘स्वीट’ बोलके भाव, लाजरं स्मित करत चेहऱयानेच संवाद करणारी ती ग्रेट तब्बू आणि त्या दोघांच्या मनातील भावना चेहऱयावर आणणारे जगजीत सिंग, अलका याज्ञिक जोडीचे ते जादूमय स्वर! हे गाणं 2000 साली रिलीज झालेल्या ‘तरकीब’ या सिनेमाचं आहे. इतकं जुनं आहे यावर कोण विश्वास ठेवील? प्रेयसीच्या चेहऱयाला चंद्राची उपमा देणं म्हणजे काही विशेष नाही पण तिच्या चेहऱयाच्या सौंदर्याचं वर्णन करताना थेट बादल, बिजली, तितली वगैरेंची उपमाही अपुरी पडेल असं म्हणणं म्हणजे निदा फाजलीनी फारच केलं बुवा असं वाटत असेल तर गाणं एकदा ऐकावं. अगदी डोळे मिटून ऐकावं. शब्दांपेक्षा स्वर बोलके असतात, त्यापेक्षा स्पर्श जास्त बोलके असतात आणि सर्वात जास्त तरल असतात त्या जाणिवा. त्या ज्या क्षणी मूर्तिमान होतात तेव्हा पंचेंद्रियं गोठून जातात आणि विरामचिन्हंच बोलतात. हे सगळं कळत जाईल. झिरपत जाईल मनात जेव्हा हे गाणं आपण शांतपणे ऐकू तेव्हा.

जगजीत सिंग यांच्या वैशिष्टय़पूर्ण आवाजातली गाणी ऐकणं हा एक आनंदानुभव असतो. ‘तेरा चेहरा है? आईने जैसा’ हे त्यांनी गायलेलं असंच एक सुंदर गाणं. यातला प्रियकर प्रेयसीला चक्क विचारतो, ‘क्मयूँ न देखूँ मैं देखने जैसा?’ आणि वर तिला बजावतोही की

दोस्त मिल जायेंगे कई लेकिन

न मिलेगा कोई मेरे जैसा. आहे की नाही गंमत? चेहऱयाचं महत्त्व जाणणारा दोस्त तसाही विरळाच असतो. काही गाणी किंवा गायकांचे आवाज हे झिंग आणणारे असतात. अदनान सामीचा आवाज तसा आहे. जुनी हवेली, सुनसान म्हणावं असं वातावरण, रात्रीची वेळ या सगळय़ा पार्श्वभूमीवर दिसणारी ओल्याचिंब चेहऱयाची राणी मुखर्जी आणि विलक्षण झिंग आणणारे ते वातावरणाला साजेसे असणारे सूर,

‘ये जमीं झुक जाये, आसमां रुक जाये

तेरा चेहरा जब नजर आये.. प्रिये तुझ्या चेहऱयाच्या नुसत्या एका झलकेनेही माझ्या जगातले जमीन आणि आसमान एक होऊन जातात गं….अशी कळवळलेल्या मनाची गोड हाक अदनान सामीकडून दिली जाते ते प्रत्यक्ष गाण्यात अनुभवावं. ‘चेहरा’ या विषयावर तसं म्हटलं तर खूप गाणी आहेत. आपले सर्वांचे लाडके किशोरदा यांचं,

तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूँ

जाना होता है और मगर, तेरी और चला आता हूँ हे गाणं म्हणजे चेहऱयाचं आकर्षण आणि त्यात असणारी ताकद, खिंचाव सगळं काही मांडतं. ‘कभी कभी’ हा एक असाच एव्हरग्रीन पिक्चर. त्यात एकमेकांना

तेरे चेहरे से नजर नहीं हटती

नजारे हम क्मया देखे

म्हणत आपल्या प्रेमाचा इजहार करणारे ऋषि कपूर आणि नीतू सिंग इतके म्हणून गोड दिसलेयत की काय सांगावं! गाण्याचा अर्थ आणखी सुरेखपणे दाखवणारे त्यांच्या चेहऱयांचे भरपूर क्लोज अप्स तर चार चांद लावतात. इथेही आपले किशोरदाच आहेत पण फिरोज खान आणि ऋषि कपूर यांचे चेहरे स्पष्टपणे वेगळे ठेवण्याची कमाल किमया त्यांना साध्य होती. किशोरदांचा आवाज हा नुसता स्वर नसून त्या त्या अभिनेत्याचा ‘चेहरा’ म्हणूनच सामोरा येत असे बरं! अर्थात नुसता चेहरा महत्त्वाचा नसतो तर त्या चेहऱयामागे जर निर्मळ मन असेल तरच उपयोग! हे अक्षरशः आपल्याला ऐकायला मिळेल कुमार शानू आणि आशाताईंच्या स्वरात असलेल्या

चेहरा क्मया देखते हो?

दिल में उतरकर देखो ना

दिलं में उतरकर देखो ना.

या गाण्यातली आर्जवं विनंती ही हुबेहूब उतरली आहे ती सुरांचा चेहरा घेऊनच. असं म्हणावं लागेल की ह्या गाण्याचा खरा चेहरा नायक नायिका ?हा नसून खऱया अर्थानं तो गायक गायिका यांचाच आहे.

कळे न मी पाहते कुणाला,कळे न हा चेहरा कुणाचा

पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे

या गाण्यातल्या, चेहऱयाचं वर्णन करणाऱया ओळी अक्षरशः सुन्न करून टाकतात. समाजसेवेसाठी हिरिरीने बाहेर पडलेल्या सुलभा महाजनला जेव्हा कळतं की तिच्या नवऱयाने तिच्याशी प्रतारणा केली आहे तेव्हा तिला नवऱयाचा खरा चेहरा समजतो आणि ती उध्वस्त होऊन जाते. आपल्या जिवलगाचं हसू पुन्हा पुन्हा आरशात दिसतं आहे. आपल्या पाठी उभ्या असलेल्या त्याचा चेहरा खूप खूप जवळच तर आहे अशी स्वतःची खोटी समजूत घालता घालता ती आक्रंदन करीत राहते. त्याला पुन्हा पुन्हा विचारत रहाते.

उगीच स्वप्नांत सावल्यांची,

कशास केलीस आर्जवे तू

दिलेस का प्रेम तू कुणाला,

तुझ्याच जे अंतरात आहे

आणि उरतात ते फक्त तिचे उसासे. तसंही आरशात दिसणारा चेहरा ही आभासी प्रतिमा असते असं विज्ञान सांगतं. असेच नुसते आभास पदरी घेऊन जगणाऱया स्त्रीच्या चेहऱयाची कहाणी लतादीदींनी काय ताकदीने बोलकी केलीय त्या गाण्यात! गाण्यातले चेहरे जास्त बोलके की चेहऱयावरची गाणी अधिक परिणामकारक हा कधीच न सुटणारा प्रश्न अशा गाण्यांमुळे जटिलच राहतो हे मात्र खरं.

– अपर्णा परांजपे-प्रभु

Related Stories

प्रद्युम्नाचा जन्म

Patil_p

महाभियोगाचा बार निघाला फुसका..!

Patil_p

प्रतिसादाकडे वळण्यासाठी…

Patil_p

कोव्हिड व्हॅक्सिन पासपोर्ट-काळाची गरज ठरेल

Patil_p

इतुके दोष माझ्या ठायीं

Patil_p

उत्तर प्रदेशच्या रणभूमीवर

Patil_p
error: Content is protected !!