तरुण भारत

टी-20 वर्ल्डकपसाठी अक्षर पटेलऐवजी शार्दुल ठाकुरला संधी

24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध लढतीने भारताच्या वर्ल्डकप मोहिमेला प्रारंभ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी जलद गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकुरचा  भारतीय संघात समावेश केला गेला आहे. शार्दुल ठाकुर आता अक्षर पटेलची संघात जागा घेईल. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा युएई व ओमानमध्ये दि. 17 ऑक्टोबरपासून खेळवली जाणार आहे.

29 वर्षीय शार्दुल ठाकुरने सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझीतर्फे 18 बळी घेत प्रभावशाली खेळ साकारला. त्याची पोचपावती म्हणून भारतीय संघात त्याची वर्णी लागली आहे. सहभागी संघांना आवश्यक फेरबदल करण्याची दि. 15 ऑक्टोबरपर्यंत मुभा आहे.

‘अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संघव्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर शार्दुल ठाकुरचा मुख्य संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मुख्य संघात समाविष्ट असलेला अक्षर पटेल आता राखीव खेळाडूंमध्ये असेल’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकातून नमूद केले.

अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आयपीएल स्पर्धेत पूर्ण तंदुरुस्त नसल्याने गोलंदाजी करु शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर, त्याला पर्यायी खेळाडू उपलब्ध असणे आवश्यक होते, हा निवड समितीचा दृष्टिकोन होता. ‘हार्दिक पंडय़ा पूर्ण तंदुरुस्त नसल्याने भारतीय संघाला एका जलद गोलंदाजाची आवश्यकता होती. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला’, असे निवड समितीशी संलग्न एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

‘अक्षर पटेल आता राखीव खेळाडूत असेल आणि रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यास तो मुख्य संघात परतेल. रविंद्र जडेजा उपलब्ध असताना अक्षर पटेलची आवश्यकता भासणार नाही’, असे सूत्राने यावेळी नमूद केले. ‘अवेश खान, उमरान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरिवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज नदीम, के. गौतम हे खेळाडू दुबईतच थांबतील आणि भारतीय संघाच्या तयारीसाठी साहय़ करतील’, असे पत्रकात म्हटले गेले आहे.

आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू ः श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल.

अहो आश्चर्यम! ‘लकी मॅस्कॉट’ म्हणून कर्ण शर्माचा समावेश!

राखीव खेळाडूंमध्ये रेल्वेचा लेगस्पिनर कर्ण शर्माचा समावेश आश्चर्यकारक ठरला. आयपीएल स्पर्धेत कर्ण शर्माचा चेन्नई सुपरकिंग्स संघात समावेश आहे. चेन्नई प्रँचायझीसाठी लकी मॅस्कॉट असल्याने कर्ण शर्माला वर्ल्डकप संघात पाचारण केले गेले, अशी सध्या चर्चा सुरु आहे.

…तरीही लेगस्पिनर यजुवेंद्र चहलकडे दुर्लक्ष!

लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने आयपीएल स्पर्धेत आरसीबीतर्फे 15 सामन्यात 18 बळी घेत दर्जेदार कामगिरी साकारली. मात्र, यानंतरही वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळालेले नाही, तो ही आश्चर्याचा आणखी एक धक्का ठरला होता. भारताची वर्ल्डकप मोहीम दि. 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध लढतीने सुरु होईल.

Related Stories

धोनीमुळे आयपीएल अधिक रंगतदार होईल

Patil_p

बेल्जियमची रशियावर एकतर्फी मात

Patil_p

नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी

triratna

अर्जेन्टिना-चिली लढत बरोबरीत

Patil_p

आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून

Patil_p

मोहमेडन स्पोर्टींगचे नवे रशियन प्रशिक्षक

Patil_p
error: Content is protected !!