तरुण भारत

रोमांचक विजयासह केकेआरची अंतिम फेरीत धडक

दिल्ली कॅपिटल्सला 3 गडी राखून नमवले, राहुल त्रिपाठीचा विजयी षटकार निर्णायक

शारजाह / वृत्तसंस्था

Advertisements

प्रारंभी एकतर्फी भासलेल्या, मात्र, नंतर निर्णायक टप्प्यात अचानक चुरस निर्माण झालेल्या दुसऱया क्वॉलिफायर लढतीत केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा सनसनाटी पराभव करत आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले स्थान थाटात निश्चित केले. दिल्लीला निर्धारित 20 षटकात 5 बाद 135 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखल्यानंतर केकेआरने 19.5 षटकात 7 बाद 136 धावांसह निसटता विजय संपादन केला. शेवटच्या षटकात अश्विनने किल्ला लढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने उत्तुंग षटकार खेचत केकेआरचा फायनलमधील प्रवेश निश्चित केला.

विजयासाठी 136 धावांचे आव्हान असताना शुभमन गिल (46 चेंडूत 46) व वेंकटेश अय्यर (41 चेंडूत 55) यांनी 12.2 षटकात 96 धावांची तडाखेबंद सलामी दिली, त्यावेळी केकेआरचा विजय गृहित धरला जाणे साहजिक होते. पण, 1 बाद 123 वरुन अचानक 7 बाद 130 अशी जोरदार पडझड झाल्याने या सामन्यात काही काळ रंगत निर्माण झाली होती.

शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज असताना अश्विनने राऊंड द विकेट मारा करत वाईड ऍक्शनवर भर दिला. त्याच्या नेहमीपेक्षा या वेगळय़ा शैलीला सामोरे जाताना फटकेबाजीच्या प्रयत्नात नरेन व शकीब सलग 2 चेंडूंवर बाद झाले. मात्र, पाचव्या चेंडूवर त्रिपाठीने स्ट्रेट सिक्स लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दिल्लीचे फलंदाजीत अपयश

प्रारंभी, प्रथम फलंदाजीला पाचारण केले गेलेल्या दिल्लीला या लढतीत निर्धारित 20 षटकात 5 बाद 135 अशा तुलनेने किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. अनुभवी, डावखुरा फलंदाज शिखर धवनने 39 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह सर्वाधिक 36 धावांचे योगदान दिले तर श्रेयस अय्यर 27 चेंडूत 30 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत 1 चौकार, 1 षटकाराचा समावेश होता. सहाव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या हेतमेयरने धावचीत होण्यापूर्वी 10 चेंडूत 2 षटकारांसह 17 धावा फटकावल्या.

केकेआरचा कर्णधार मॉर्गनने या लढतीतही पहिले षटक नरेनला दिले आणि त्याने षटकात केवळ एकच धाव देत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. डावखुऱया शिखर धवनला पहिली धाव घेण्यासाठी 7 चेंडू खेळून काढावे लागले. मात्र, नंतर डावातील चौथ्या षटकात त्याने नरेनला सलग दोन षटकारासाठी पिटाळून लावले. त्याने दुसऱया चेंडूवर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तर तिसऱया चेंडूवर लेगसाईडच्या दिशेने खणखणीत षटकार वसूल केले होते. 

वरुण चक्रवर्तीने मात्र आल्या आल्याच पृथ्वी शॉला एका अप्रतिम इनकटरवर पायचीत करत दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिला जोरदार धक्का दिला. मात्र, त्यानंतर धवन व स्टोईनिस या जोडीने धावफलक हलता ठेवण्याबरोबरच खराब चेंडूंची प्रतीक्षा करण्यावर अधिक भर दिला.

केकेआरने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. दिल्लीने या लढतीसाठी तंदुरुस्त होऊन परतलेल्या स्टोईनिसला टॉम करणच्या जागी संधी दिली तर केकेआरने मागील लढतीतील संघ कायम ठेवला.

धावफलक

दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ पायचीत गो. वरुण चक्रवर्ती 18 (12 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शिखर धवन झे. शकीब, गो. वरुण 36 (39 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), मार्कस स्टोईनिस त्रि. गो. मावी 18 (23 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर नाबाद 30 (27 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), रिषभ पंत झे. त्रिपाठी, गो. फर्ग्युसन 6 (6 चेंडूत 1 चौकार), शिमरॉन हेतमेयर धावचीत (अय्यर-कार्तिक) 17 (10 चेंडूत 2 षटकार), अक्षर पटेल नाबाद 4 (4 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 5 बाद 135.

गडी बाद होण्याचा क्रम

1-32 (पृथ्वी शॉ, 4.1), 2-71 (स्टोईनिस, 11.3), 3-83 (धवन, 14.1), 4-90 (पंत, 15.2), 5-117 (हेतमेयर, 18.3).

गोलंदाजी

शकीब हसन 4-0-28-0, लॉकी फर्ग्युसन 4-0-26-1, सुनील नरेन 4-0-27-0, वरुण चक्रवर्ती 4-0-26-2, शिवम मावी 4-0-27-1.

केकेआर ः शुभमन गिल झे. पंत, गो. अवेश 46 (46 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), वेंकटेश अय्यर झे. बदली खेळाडू (स्मिथ), गो. रबाडा 55 (41 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), नितीश राणा झे. हेतमेयर, गो. नोर्त्झे 13 (12 चेंडूत 1 षटकार), राहुल त्रिपाठी नाबाद 12 (11 चेंडूत 1 षटकार), दिनेश कार्तिक त्रि. गो. रबाडा 0 (3 चेंडू), इयॉन मॉर्गन त्रि. गो. नोर्त्झे 0 (3 चेंडू), शकीब हसन पायचीत गो. अश्विन 0 (2 चेंडू), सुनील नरेन झे. पटेल, गो. अश्विन 0 (1 चेंडू), लॉकी फर्ग्युसन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 10. एकूण 19.5 षटकात 7 बाद 136.

गडी बाद होण्याचा क्रम

1-96 (वेंकटेश, 12.2), 2-123 (राणा, 15.6), 3-125 (गिल, 16.4), 4-126 (कार्तिक, 17.6), 5-129 (मॉर्गन, 18.6), 6-130 (शकीब हसन, 19.3), 7-130 (नरेन, 19.4).

गोलंदाजी

नोर्त्झे 4-0-31-2, रविचंद्रन अश्विन 3.5-0-27-2, अवेश खान 4-0-22-1, अक्षर पटेल 4-0-32-0, रबाडा 4-0-23-2.

केकेआरचे 6 फलंदाज अवघ्या 7 धावात गारद, तरीही…

विजयासाठी 136 धावांचा पाठलाग करताना केकेआरने एकवेळ 1 बाद 123 अशी भक्कम स्थिती प्राप्त केली होती. यावेळी त्यांना विजयासाठी 25 चेंडूत जेमतेम 13 धावांची आवश्यकता होती. पण, याचवेळी नितीश राणा, शुभमन गिल, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, शकीब हसन, सुनील नरेन असे 6 फलंदाज अवघ्या 7 धावातच गारद झाले आणि पाहता पाहता केकेआरची 1 बाद 123 वरुन 7 बाद 130 अशी पडझड झाली. नंतर केवळ राहुल त्रिपाठीच्या निर्णायक षटकारामुळेच केकेआरला आगेकूच करता आली.

Related Stories

केरळ ब्लास्टर्सच्या प्रशिक्षकाची उचलबांगडी

Patil_p

प्रज्नेश विजयी, रामकुमार, अंकिता पराभूत

Patil_p

कोरोनाबाधित मिल्खा सिंग इस्पितळात

Patil_p

उमरान मलिकचा हैदराबाद संघात समावेश

Patil_p

रेल्वे मंत्रालयाकडून चानूला 2 कोटी, नोकरीत बढती

Patil_p

विनेश फोगटची शिबिरातून माघार

Patil_p
error: Content is protected !!