तरुण भारत

आमदार प्रसाद गावकर तृणमूलमध्ये

सध्या पाठिंबा, लवकरच अधिकृत प्रवेश

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोव्यातील लोकांनी काँग्रेसला अनेक वर्षे सरकार चालविण्याची संधी दिली. भाजपलाही 10 वर्षे सत्तास्थानी बसविले. परंतु दोघांनीही त्यांची पूर्णतः निराशा केली. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना बदलून नवीन पक्षाचे सरकार स्थापन झाले पाहिजे, ही गोमंतकीयांची एकमेव इच्छा व मागणी आहे आणि ती केवळ तृणमूल पक्ष आणि ममता दीदीच पूर्ण करू शकतात, असा दावा राज्यसभा खासदार डेरिक ओ ब्रायन यांनी केला.

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी तृणमुलला संपूर्ण पाठिंबा जाहीर केल्याबद्दलची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर श्री. गावकर तसेच माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांची उपस्थिती होती.

हायकमांड संस्कृती नसलेला एकमेव पक्ष

पुढे बोलताना डेरिक यांनी, ’काँग्रेस, भाजप हे परंपरेने हायकमांड संस्कृती पुढे नेणारे पक्ष आहेत. तर तृणमूल हा हायकमांड संस्कृती नसलेला एकमेव पक्ष आहे, असा दावा केला. दीदी म्हणजे समर्पण, निर्धार, निष्ठा, वचनबद्दता, विकास यांचा संगम आहे. नोटाबंदी झाली तेव्हा केवळ दोनच मीनिटात वक्तव्य करून ही नोटाबंदी देशासाठी घातक असल्याचे दीदीनी म्हटले होते. शेतकरी विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले तेव्हाही त्यांनीच सर्वप्रथम विरोधात आवाज उठवला होता. पेट्रोल डिझलच्या किंमती वाढल्या तेव्हा केवळ फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांतूनच विरोध करत न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारा पहिला पक्ष तृणमूलच होता, असे डेरिक यांनी सांगितले.

हीच परंपरा आम्ही गोव्यातही चालविणार आहोत. गोव्यात जो प्रतिसाद लाभत आहे, त्यात क्रीडा, साहित्य, कला, यासारख्या जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. आम्हाला निष्ठा, वचनबद्दता, विकास यांची भाषा समजते म्हणूनच गोव्यातील अनेक लोक आमच्याशी जोडले जात आहेत, असे ते पुढे म्हणाले.

राजकारणात महिलाशक्तीची गरज : गावकर

आमदार गावकर यांनी बोलताना, एक महिला राजकारणात काय जादू करू शकते त्या महिलाशक्तीचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी आहेत, असे सांगितले. मोदी यांची हुकुमशाही मोडित काढण्याचे धैर्य आणि शक्ती ममता दीदीमध्ये आहे. त्यासाठी अधिकाधिक महिलांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या विद्यमान आमदारकीचा कालावधी संपताच अधिकृतरित्या तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शेतकऱयाचा मुलगा तृणमुलमध्ये : फालेरो

मोदी सरकारने देशातील शेतकऱयांच्या घरादारांवर नांगर फिरविण्याचा विडा उचलला असताना एका शेतकऱयाचा मुलगा तृणमुलला समर्थन देतो याचा आपणास अत्यानंद होत आहे. याच शेतकऱयांनी पुढे येऊन आता मोदी सरकारला चिरडले पाहिजे, असे श्री. फालेरो यांनी सांगितले. महिला सशक्तीकरण हे तृणमुलचे मुख्य ध्येय असून 41 टक्के महिलांना प्रतिनिधीत्व देऊन पक्षाने त्याचा प्रत्यय आणून दिला आहे. गोव्यातही अनेक महिला या पक्षात येण्यास इच्छूक असून लवकरच त्यांचा प्रवेश होणार आहे, असे फालेरो पुढे म्हणाले. दरम्यान, याच कार्यक्रमादरम्यान, आमदार गावकर यांचे बंधू संदेश गावकर यांनी आपल्या सहकारी आणि कार्यकर्त्यांसमेवत तृणमूलमध्ये प्रवेश केला. श्री. डेरिक आणि फालेरो यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Related Stories

उसगांव दुचाकी अपघातात युवक ठार

Patil_p

कोटय़वधींची संसाधने घेऊनही मडगावची कचरा समस्या जैसे थे

Patil_p

स्पेनचा झावी फर्नांडिझ ओडिशाला तर नीम दोर्जी, गुरमीत हैदराबादला

Amit Kulkarni

गुरुवारी तब्बल 95 बाधित, 64 जण मुक्त

Patil_p

प्रत्येकाने पाण्याची नासाडी टाळावी

Amit Kulkarni

पर्यटन उद्योगावर कोरोनाचा परिणाम

tarunbharat
error: Content is protected !!