तरुण भारत

शरदीय चांदणे..

अमृताते केऊधे रांधावे ।

गगनावरी उभवावे ।

Advertisements

घडे केवी।।

ज्ञानेश्वर माऊलींनी जसे आकाशावर उभे राहता येत नाही तसेच ‘अमृत’ हा पदार्थ रांधता येत नाही हे सांगितले आहे. देवदानवांमधील सततच्या वैराला कारण असलेले हे अमृत अगम्य चवीचे आहे. अमृताचा अंर्तमनाला व ज्ञानेंद्रियांना आस्वाद घेता येतो. पण शब्दात वर्णन करता येत नाही. दानवांना अमृत पिऊन देवासारखे अमरत्व हवे आहे. परंतू निसर्गतः अंगभूत रज व तम गुणांमुळे दानवांना अमृताचे दर्शनही दुरापास्त असते.

सृष्टीचालकाचा पृथ्वीवरील सजीवांचा विशेष लोभ म्हणून त्यांनी शारदीय पौर्णिमेला हे अमृत चंद्रप्रभेतून आपणापर्यंत पोच करण्याची तजवीज केली आहे.

नवरात्रोत्सवानंतर येणाऱया अश्विन शुद्ध पौर्णिमेलाच ‘शरद पौर्णिमा’ म्हणतात. संस्कृतीशी सांगड घालत निरामय आरोग्याची किल्ली आपल्या हातात दिली आहे. सोबतच सखोल समृद्धततेचा वारसाही सोपवला आहे. खगोलशास्त्रीय दृष्टय़ा या दिवसांत पृथ्वी 23 1/2 अंशात सूर्याकडे झुकते. चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर कमी होते. त्यामुळे दिवसभर उन्ह व रात्री गारठा वाढतो.

सूर्य व चंद्र दोघांचीही किरणे पृथ्वीवर थेट पडतात. नुकत्याच संपलेल्या वर्षा ऋतुने पृथ्वीवर जागोजागी पाण्याचे साठे तुडुंब भरले आहेत. आता दिवसभरातील तप्त उन्हाने ते निर्विष व रात्रीच्या गारठय़ाने पौष्टीक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या निर्विषिकरणाचा परिणाम चराचरातील प्रत्येक सजीवावर होतो. झाडेझुडपे, लतावेली फळा फुलांनी लगडून येतात. भुचर, जलचर, उभयचर सजीवांचा हा प्रजननाचा काळ असतो. अन्नाच्या मुबलकतेने पशुपक्षी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर करतात. जैवविविधतेला अनुकुल हा काळ मानवी प्रकृतीस अतिशय बलदायी ठरतो. शरद ऋतू हा अश्विन व कार्तिक महिन्यात असतो. यालाच ‘धुंधर मास’ असेही म्हणतात. हवेतील गारठय़ाने त्वचा कोरडी पडते. त्यासाठी या दिवसांत नित्य अभ्यंग म्हणजे अंगाला तेल मालिश व उटण्याने स्नान करणे सांगितले आहे. अंगाला तेल लावून सकाळची कोवळी सूर्यकिरणे त्वचेवर पडली की यकृताची कार्यक्षमता वाढीस लागून शरीर विटॅमिन डीची निर्मिती करते. लहान आतडय़ातील मिनरल्स, फॉलीक ऍसिड व बी कॉम्प्लेक्सचे शोषण वाढते. यामुळे शरीराची झालेली व दैनंदिनी होत असलेली झिज मोठय़ा लगबगीने भरून निघते. परीणाम शरीरात शक्तीसंचाराचा अनुभव येतो. शरीर सशक्त झाले की आपोआप मनालाही तरतरी येते.

शरद ऋतुत कसे वागावे ह्याचे नियम भारतीय चिकित्सा शास्त्रात सांगितले आहेत. दुग्धजन्य पदार्थ, ताज्या फळभाज्या, पालेभाज्या व फळे यांच्या सेवनावर विशेष भर द्यावा. मित्रमैत्रिणी वा जिवलगांसह स्नेहमेळावे आयोजीत करावेत. आपल्या आवडत्या कलेला, छंदाला खाजगी वेळ द्यावा. पहाटेची हवा सुसह्य असेपर्यंत अनवाणी फिरावे. रात्रीच्या जेवणानंतर शरदाच्या टिपूर चांदण्यात न्हावे. विदर्भात या दिवसात मळय़ात डबापार्टींचे आयोजन करतात. त्यावेळी वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी त्यावर लोण्याचा गोळा, हिरव्या मिरचीचा ठेचा, मठ्ठा, ताज्या भाज्यांची कोशींबीर हे पदार्थ हमखास असतात.

हर्षोल्हासीत स्नेहमेळाव्याने  मनात साठवलेल्या दुःखद छटा पुसुन टाकायला मदत होते. या दिवसांत शरीराची वाढलेली ताकद मन ऊर्जावान करायला साधक ठरते. यामुळेच शरद ऋतुला ‘नैसर्गिक व्याधीक्षमत्व’ प्रदान करणारा काळ म्हणतात. मन व शरीर सशक्त करणारे शंभर शरद आपण जगावे या आशयाच्या ‘जीवेत शरदं शतः’ शुभेच्छा देण्याची रित आहे.  इतर ऋतुंपेक्षा शरदात सांगितलेली वेगळी व विशेष परिचर्या म्हणजे चंद्राच्या किरणात न्हाऊन घेणे. ही बाब वेगळी आहे म्हणजे महत्त्वाची नक्कीच आहे. पूर्वी शाळेत असताना ‘शरदातील चांदण्या रात्रीची सहल’ हा निबंध लिहायला यायचा. कवि लोकांना तर शरदातील टिपूर चांदण्यांचे फारच अप्रुप असते. शरद ऋतुमध्ये खगोलशास्त्रज्ञांच्या अभ्यासाला गती व यश मिळते. शरदातील टिपूर चांदण्यांच्या मदतीने योग्य दिशा ठरवत जगभरातील पक्षी स्थलांतरण करीत असतात. ठरावीक प्रांतात जाऊन ते तिथे प्रजननाची प्रक्रिया पूर्ण करतात. शरीराचे व निसर्गाचे घडय़ाळ हे सूर्याभोवती फिरणाऱया पृथ्वीच्या गतीवर अवलंबून आहे. दिवस व रात्रीचे प्रहरांनुसार शरीरात वेगवेगळे अंतःसंप्रेरके स्त्रवत असतात. यावरच शरीराच्या शरीरक्रिया अवलंबून असतात. काही संप्रेरके ही रात्रीच्या अंधारात अधिक स्त्रवतात. जसे की मालटोनीन हे स्त्रवायला डोळय़ांना अंधाराचे ज्ञान व्हावे लागले. सायंकाळपासून हळूहळू स्त्रवणारे मालटोनीन तीन तासात म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपल्याला सात तास निवांत झोप येईल एवढय़ा मात्रेत शरीरात गोळा होते व दहा वाजतानंतर आपणास निर्विघ्न निद्रा येते. शरीराची तिवई ज्या तिन खांबावर उभी आहे त्यातील एक खांब म्हणजे शांत निद्रा हा एक आहे.  शांत निदेने  दिवसभरातील कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियांचा थकवा भरून निघतो. ताजेतवाने ज्ञानेंद्रिये ही शरीरातील आजाररुपी बिघाड दुरुस्त करण्यास तत्पर होतात. यालाच ‘सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम’ असे म्हणतात. या ‘सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम’ची कार्यशक्ती व कार्यकाळ हा शरद ऋतुमध्ये चांदण्या रात्री चांदण्यांचा आनंद घेत आपल्याला वाढवायचा असतो. ही निरोगी आयुष्याचा गुप्त खजिना प्राप्त करुन देणारी चावीच आहे. याची सुरुवात ही शरद पौर्णिमेला आकाशात चंद्र षोडष कलांनी युक्त असतो. त्याच्या नाममात्र दर्शनाच्या लोभाने मनात आनंदाचे कारंजे उसळतात. नवरात्रीच्या संतुलीत साधनेने व उपवासाने तनामनास किंचित आलेले दौर्बल्य घालवण्यासाठी चंद्रकिरणांत दुग्ध आटवावे. महालक्ष्मीची आराधना करत स्नेहींसह हास्यविनोदात दुध प्राशन करावे.  तनमन उल्हासाने संपन्न करावे. शरदातील गारवाने को÷ातील पित्त प्रकुपित होऊन पित्तजन्य श्वास या नंतर उसळणार असतो. त्यासाठी पिंपळी वचा सिद्ध औषधी दुग्धपानाचा आयुर्वेद शास्त्रात प्रघात आहे.

एवढय़ा समृद्ध स्वास्थ संस्कृतीचे आम्ही वारस असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. परंतु हल्लीच्या काळात मात्र रात्रीच्या वेळी कृत्रीम दिव्यांच्या झगमगाटीने आमचे हे स्वास्थ हिरावून घेण्यात मोठा वाटा उचलला आहे. अंतराळात फिरणाऱया हजारो सॅटेलाईटसच्या मदतीने पृथ्वीचे रात्रीचे फोटो 2016 साली ‘वर्ड ऍटलस ऑफ नाईट स्काय ब्राईटनेस’ ने प्रकाशित केले. त्यानुसार आढळून आले की पृथ्वीवरील अमेरीका युरोप आशिया मध्यपूर्व भाग दिवसासारखाच लख्ख चकाकतोय. तर सहारा ऍमेझॉन व सायबेरीया सारखा भाग पूर्णतः काळोखात डुंबला आहे. सिंगापूर सारखे काही भाग तर स्वयंप्रकाशीतच भासतात. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रात्रीच्या वेळी अनैसर्गिक प्रकाश पृथ्वी परावर्तीत करते. खरे तर थॉमस एडीसनने कृत्रीम उजेडाचा दिवा पेटवून मानवी जीवनात क्रांतीच घडवली आहे. परंतु आज जसे अन्न हवा पाण्याच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम समस्त जीवसृष्टी भोगत आहेत तसाच दुष्परिणाम हा या ‘अनैसर्गिक प्रकाशाचे प्रदूषण’ यामुळे भोगावे लागणार आहेत. सततच्या उजेडामुळे मेंदुला रात्रीचे भान राहत नाही. त्यामुळे मालटोनीन स्त्रवत नाही. परिणामी मेंदू सतत कार्यरत राहतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तो काम करतो व नंतर मोठय़ा आजाराच्या रुपात शरीर व मेंदू दोघेही एकसाथ संप पुकारतात. कारण मेंदूतील किकॅडीअन रिदम चुकलेला असतो. रात्रीच्या कृत्रीम उजेडाने मालटोनीनची मात्रा घटते. मग अनिद्रा, शिरःशुल, अस्वस्थता, नैराश्य आदिंचा विळखा पडतो. मालटोनीनची मात्रा प्रमाणापेक्षा अधिक घटली की व्याधीक्षमत्व कमी होऊन कर्करोगाची शक्मयता वाढते. मालटोनीन हे निळय़ा रंगाच्या प्रकाशात अधिकच कमी स्त्रवतं. निळा प्रकाश हा मोबाईल, कॉम्प्युटरची उपकरणे व एलसीडी लाईट्समधून परावर्तीत होतो. एलसीडी लाईट्स हे स्वस्त, कमी ऊर्जेतही पेटणारे व दिर्घ काळ टिकणारे असल्याने मोठमोठय़ा इंडस्ट्रीज, स्ट्रिट लाईट्स, विमानतळ, जेट्टी, स्टेडियम व चौकाचौकात लावले जातात. या कृत्रीम उजेडामुळे स्थलांतर करणारे पक्षी आपली दिशा चुकतात. नको त्या प्रदेशात पोहचतात. तिथल्या प्रतिकूल वातावरणात मरण पावतात. अंधारात वाढणाऱया कित्येक किडय़ांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. ज्यांना खाऊन कित्येक पक्षी जीवंत रहायचे. त्यांच्या अन्नसाखळीवर गदा आली आहे. समुद्री कासवाच्या प्रजननासाठी हवा तो काळोख कमी झाल्याने त्यांची संख्या रोडावली आहे. शहरातील पशुपक्षी ग्रामीण भागातील पशुपक्ष्यांच्या तुलनेत उजेड व रहदारीच्या आवाजाने पहाटे लवकर जागे होतात. त्यामुळे त्यांचे आर्युमान घटलले आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी इथला प्रत्येक जीव आपापली भूमिका बजावत असतो. आपणही आपल्या संस्कृतीत वर्णन केलेल्या चांदण्या रात्रीचा आस्वाद घेत अनावश्यक कृत्रीम प्रकाश टाळला पाहीजे. बऱयाच देशांमधे ‘कृत्रीम प्रकाश प्रदुषणा’ वर उपाययोजना सुरू झाल्या आहेत. पक्षी स्थलांतरित होणाऱया काळात मोठमोठय़ा बिल्डिंगवरचा वीज पुरवठा रात्री थांबवण्यात येत आहे. वनपरिक्षेत्रात आवर्जून रात्रीचा काळोख जपला जातो.

हव्यासापोटी सोयीचा दुरूपयोग केला तर त्याचे परिणाम हे वाईटच भोगावे लागतील. त्यापूर्वीच जागे होऊन चंद्रप्रभेचे दर्शन म्हणजे साक्षात कौमुदीचा आस्वाद घेऊया.

-डॉ. सुवर्णा सोनारे-चरपे

Related Stories

लॉकडाऊनला रामराम

Patil_p

अतिरिक्त भार नसलेला चाकोरीबद्ध!

Patil_p

कोरोनाला हरवूच पण, मूल्ये हरवू नका

Patil_p

आता जिल्हाधिकाऱयांचे ‘खेडय़ाकडे चला’चे आदेश

Patil_p

ठाकरेंच्या प्रशासकीय कुशलतेची चुणूक!

Patil_p

विज्ञानापलीकडील श्रेष्ट विज्ञान

Patil_p
error: Content is protected !!