तरुण भारत

कृष्णकुंज आणि रामलीला!

आयोध्येतील माँ कांचन गिरी यांच्या निमंत्रणानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्येत राम लल्लाच्या दर्शनाला जाणार असल्याची घोषणा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. कृष्णकुंजने बदललेली वाट आणि मुंबई महापालिकेसह उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या तोंडावर होणारी हा रामलीलेचा नवा प्रयोग आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ज्या राज्यांमध्ये भाजप विरोधात सेनेने उमेदवार उभे केले त्यांना अजिबात प्रतिसाद मिळाला नसला तरी भाजपच्या विरोधात टीका करण्यासाठी हिंदुत्ववादी तंबूतील एक जुना पक्ष, ज्यांचा राम मंदिराच्या आंदोलनातही मोठा सहभाग होता, त्या शिवसेनेकडून होणारी टीका भाजपला काही ठिकाणी विरोधी वातावरणात भर घालणारी ठरू शकते. अशावेळी एक ठाकरे विरोधात बोलत असताना दुसरे ठाकरे मित्र म्हणून निमंत्रित असणे भाजपच्या दृष्टीने फायद्याचे आहे. मुख्यमंत्री योगींच्या कारभारावर नाराजी, शेतकरी आंदोलनाचा आणि ओबीसींच्या एकत्रीकरणाचा फटका भाजपला बसण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी योगींना हटवण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना त्यातून माघार घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर मोदींची प्रतिमा, हिंदुत्वाचा मुद्दा आणि राम मंदिराची निर्मिती हे मुद्दे पुढे करूनच भाजपला उत्तर प्रदेशात विरोधकांना मात द्यायची आहे. अशा काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर काँग्रेस किंवा समाजवादी पक्ष भाजपला आडवा जाऊ शकत नाही तर शिवसेना तेथे भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती करू शकते. त्यामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे असे व्दंद्व निर्माण केले तर भाजपला त्या मुद्याचा धोका होणार नाही. मनसेच्यादृष्टीने मुंबई महापालिका महत्त्वाची असल्याने सध्याच्या कुंठित अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपला लाभ उत्तर प्रदेशमध्ये करून द्यायचा आणि त्या बदल्यात मुंबईत भाजपचा लाभ घ्यायचा. त्यांची आणि सेनेपासून संभाव्य दूर राहणारी मते आपल्या मतात मिळवून यशस्वी व्हायचे असा मनसेच्या दृष्टीने एक चांगला प्रस्ताव ठरू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांना सोबत घेऊन अयोध्येचा दौरा केला होता. आम्ही भाजपची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. नेमके त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेच्या एका शिष्टमंडळाने राज ठाकरे यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार मार्च महिन्यात राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार होते. मात्र कोरोनामुळे तो दौरा मागे पडला. आता उत्तर प्रदेश आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरे यांना निमंत्रण आले असून हिंदूराष्ट्र या संकल्पनेवर एकमत असणाऱया मंडळींना राज ठाकरे हे हिंदुत्वासाठी योग्य व्यक्ती वाटतात. त्यामुळेच त्यांना निमंत्रण दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. याचवषी जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात मनसेने राज यांच्या दौऱयाची घोषणा केली होती. मराठी भाषा गौरव दिवस स्वाक्षरी मोहिमेद्वारे साजरा करून एक ते नऊ मार्च दरम्यान राज ठाकरे दौऱयावर निघतील असे त्यावेळी सांगण्यात आले होते.  मराठीचा मुद्दा मागे पडल्यानंतर राज ठाकरे यांना हिंदुत्व आठवले अशी टीका  हिंदी भाषिक पट्टय़ात झाल्यानंतर सावध होत मनसेने मराठी आणि हिंदुत्व दोन्ही मुद्यांना एकत्र सांधत ते कार्यक्रम घोषित केले होते. बदललेला झेंडा आणि त्यावरील राजमुद्रा यामुळे मनसे भाजपशी युती करून पोकळी भरून काढणार असे वातावरण झाले. मात्र गेल्या सात, आठ महिन्यांमध्ये भाजपकडून त्यावर केवळ चर्चाच झाली. नाशिकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी ठाकरे यांची उभ्या उभ्या भेट झाली. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या युतीला मनसेची हिंदी भाषिकांविषयीची भूमिका अडथळा असल्याचे चर्चेतून पुढे आले. त्यानुसार हिंदी भाषकांसमोर राज यांनी केलेल्या भाषणाची प्रतही मनसे नेत्यांनी भाजपला पोहोचवली. मात्र ‘लाव रे तो व्हिडिओ’ मुळे नाराज दिल्लीश्वरांचा सकारात्मक प्रतिसाद आला नव्हता. त्यामुळे मुंबई आणि इतर महापालिकांत स्थानिक पातळीवरच मनसे आणि भाजपचे अंडरस्टँडिंग होईल. सेनेच्या विरोधात उमेदवार देताना मतांची आकडेवारी लक्षात घेऊन उमेदवार दिले जातील असा अंदाज वर्तवला जात होता. स्थानिक भाजपकडून तसे संकेतही होते. आता नऊ महिन्यांनी पुन्हा एकदा मनसेला आयोध्येचे निमंत्रण आल्याने भाजपची गरज अधोरेखित झाली आहे. मनसेशी हातमिळवणीमुळे शिवसेनेला फटका बसेल तसेच उत्तर प्रदेशात एक ठाकरे आमच्या बरोबर आजही आहेत हे भाजपला सांगत सेनेची टीका विरळ करता येईल. अंदाज घेण्यासाठी राज यांना परस्पर राजकारणाच्या बाहेरच्या व्यक्तींकडून निमंत्रण आले आहे. मनसेला मुंबई साथ हवी तसेच भाजपला उत्तर प्रदेशात हवी हे राज ठाकरे जाणून आहेत. त्यामुळेच चर्चेच्या रुतलेल्या रथाची चाके आता धक्का देऊन बाहेर काढली जात आहेत. उत्तर प्रदेश आणि मुंबई दोन्हीच्या बाबतीत यावेळी भाजप आणि मनसे एकमत होणार का? हा महत्त्वाचा मुद्दा असेल. लोकसभा निवडणुकीवेळी आयोध्या दौरा करून उद्धव ठाकरेंनी भाजपवर दबाव वाढवला आणि लोकसभा विधानसभेची युती अमित शहांना एकाच वेळी घोषित करायला लावली. तहात हरल्याचे वातावरण दिसताच उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता वाटाघाटीची वेळ दुसऱया ठाकरेंची आहे. राजकारणाच्या रंगमंचावर सुरू असलेल्या या रामलीलाच्या प्रयोगाचा शेवट मुंबई महापालिकेत होणार असून शेवटचा अंक रामायणाचा असेल कि महाभारताचा हे पाहणे औत्सुक्मयाचे ठरणार आहे.

Related Stories

प्रत्यक्ष झालासि तूं अधोक्षज

Patil_p

शादी किसी की हो

Patil_p

तव मायेच्या मोहें

Patil_p

अपेक्षित निर्णय

Patil_p

शेतकऱयांच्या आर्थिक स्वातंत्र्याची नांदी

Patil_p

लेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी

Patil_p
error: Content is protected !!