तरुण भारत

सातार्यातील पत्रकारांसाठी पत्रकारनगर उभारणार

प्रतिनिधी/ सातारा

 सातार्याच्या विकासात पत्रकारांचे योगदान आहे. त्यांच्या सुचनेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागले. अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी सुधारणाही सुचवल्या. लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्याचे काम डोळस पत्रकारांनी केले आहे. सातार्यात पत्रकारांसाठी पत्रकार भवनाला आम्हीच जागा दिली. पत्रकार आणि आमच्यात असलेल्या बॉन्डींगला कुणाचीही दृष्ट लागू नये. ज्याप्रमाणे पोलिसांसाठी पोलिस वसाहती आहेत. त्याप्रमाणे सातार्यातील पत्रकारांसाठी पत्रकार नगर उभारणार, अशी घोषणा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केली.

Advertisements

सातारा पालिका आणि सातारा शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार सोहळा 2021 पार पडला. कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा  पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दिपक प्रभावळकर, साविआचे प्रतोद ऍड. डी. जी. बनकर प्रमुख उपस्थित होते.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून काम करताना चुका होतात. किंबहुना निवडून गेल्यावर नगरसेवक, आमदार, खासदार लोकांची सेवा नीट करतात का? यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम  डोळस पत्रकार करत असतात. त्यांचा सन्मान  करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला. त्यात नगरपालिकेप्रमाणे पत्रकार संघाचेही योगदान आहे. सातार्यात पत्रकार भवन  या त्यांच्या मागणीचीही पूर्तता आम्ही केली. आता शहराची हद्दवाढ झाल्यामुळे पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. पोलिसांची सोसायटी झाली त्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार पत्रकारांचे पत्रकार नगर झाले पाहिजे. यासाठी आम्ही पुढाकार घेवू. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकार पत्रकारिता करतात. त्यांचे वास्तव्य शहरात झाले पाहिजे, असेही खा. उदयनराजे म्हणाले.

 तुमचे निर्भीडपणे लिखाण असणे आवश्यक आहे. लोकप्रनिधींच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारांचे आहे. मी तर पत्रकारांना माझे  मित्र म्हणून संबोधतो. माझ्या वाटचालीत पत्रकार मित्रांचा मोठा वाटा आहे.  माझा राजकीय प्रवास नगरसेवक पदापासून झाला. मी नगराध्यक्ष कधी होवू शकलो नाही. गेले अनेक वर्षे सातारा विकास आघाडीला सातारकरांनी आशीर्वाद दिला. पत्रकारांनी दाखवलेल्या चुकांमुळे आम्ही सुधारणा केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेले प्रकल्प मार्गस्थ लावण्याचे काम सातारा विकास आघाडीने केले. त्यामध्ये सातारकरांचा मोठा वाटा आहे. पत्रकारांचेही त्यामध्ये मोठे योगदान आहे. कास धरण उंची वाढवणे कामाची फक्त चर्चा व्हायची. शिक्षण पूर्ण सातार्यात आलो त्यावेळी पाणी इतके स्वच्छ होते की काचेच्या ग्लासातून पलिकडचे दिसत नव्हते. आम्हाला वाटायचं की ते ‘सरबत’ आहे. उघडय़ा पाटातून येणारे हे पाणी दूषित असायचे. त्याकाळात ज्यांच्या हातात धुरा होती त्यांनी काम केले नाही. बंदिस्त पाईपलाईन केली. धरणाची उंची वाढवल्यामुळे सातारकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र सातारकरांचा थोडा आर्थिक बोजा वाढला आहे. पूर्वी पाणी गढूळ असल्यामुळे पाहुणे आले की त्यामध्ये साखर मिसळली की ‘सरबत’ म्हणून भागत होतं. पण आता खर्चात वाढ झाली. आता सरबत मागवावं लागतं. त्याकाळातील लोकांना दूरदृष्टी होती, असा टोला त्यांनी हाणला.

खा. उदयनराजे म्हणाले, आपल्या सर्वांचं बॉन्डींग आहे. पत्रकारांच्या सुचनेमुळे स्वच्छता कामात सुधारणा झाली. पूर्वी सफाई कर्मचार्यांची वाईट अवस्था होती. आता कचरा संकलनासाठी घंटागाडय़ा सुरु करण्यात आल्या. ग्रेड सेपरेटरचे काम झाले. पत्रकारांशी विचारविनिमय करत अनेक कामे मार्गी लावली. सातारा पालिकेने उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराची प्रथा पाडली. कुणाला सांगावे लागत नाही, काही बाबी अंतःकरणातून याव्या लागतात. पत्रकारांच्या माध्यमातून सातार्याचे चांगले प्रोजेक्शन व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

हरीष पाटणे म्हणाले, पुरस्कार प्राप्त पत्रकारांपैकी अनेकांनी तीस-तीस वर्षे पत्रकारितेत काम केले आहे. जिह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रमाणिकपणे काम केले आहे. थोरले प्रतापसिंह महाराज अत्यंत वाचनप्रिय होते. सातारा शहरातील पेठा त्यांनी वसवल्या.  अत्यंत विद्वान व विद्वत्तापूर्ण असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय आम्ही घेतला. या पुरस्काराची उंची एवढी वाढली आहे की पुरस्कारासाठी अनेकांचे फोन आले. एकावर्षी सगळ्यांनाच  पुरस्कार देता येत नाही. संबंधितांच्या कार्याची दखल निकषांच्या आधारे घेतली जाईल. देशात अनेक संघटना, पक्ष, संस्था आहेत. मात्र पत्रकारांना स्वतःची सत्ता असलेल्या नगरपालिकेमार्फत पुरस्कार प्रदान करण्यासाठी मेहनत घेणारे व स्वतःहून पुढाकार घेणारे देशातील एकमेव खासदार उदयनराजे भोसले हेच असतील.  सातार्यातील पत्रकार आणि उदयनराजे यांच्यात असलेल्या बॉन्डींगचा राज्यभर गवगवा आहे.सातारा जिल्हा पत्रकार संघ हा मराठी पत्रकार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. जिह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियातील पत्रकारांची मजबूत आणि बळकट संघटना निर्माण करण्याचे काम आम्ही सर्वांनी केले आहे. कोरोना काळात पत्रकारांसाठी पहिलं कोरोना  केअर सेंटर राज्यात प्रथम सातारा याठिकाणी उभं करण्यात आलं. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अध्यक्ष म्हणून नव्हे तर संघटनेचा कार्यकर्ता बनून मी कायम तुमच्या सोबत असतो. श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे नाव मोठे असल्याने या पुरस्काराची उंची वाढवण्याचे काम सहकार्यांनी करावे. सातारा नगरीला मनोज शेंडे यांच्यासारखा उपनगराध्यक्ष लाभला. सातार्यातील पत्रकारांसाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात मनोज शेंडे यांचे फार मोठे योगदान आहे. सातारा पालिकेचा हाच आदर्श जिह्यातील अन्य नगरपालिकांनी घ्यावा. त्यासाठी त्याठिकाणी असलेल्या शहर व तालुका पत्रकार संघांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विनोद कुलकर्णी म्हणाले, दरवर्षी पत्रकार पुरस्कार दिले जातात पण दोन वर्षे कोरोनामुळे पुरस्कार कार्यक्रम घेतला आला नाही. खा. उदयनराजे भोसले यांनी योग्यवेळी मनोज शेंडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड केली. या पुरस्कार सोहळ्यामुळे काहीजणांना पोटदुखीही झाली. नगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हणून पुरस्कार दिले, उदयनराजेंनी पत्रकारांना आमीष दाखवलं, असे काहीजण बोलू लागले. उदयनराजेंना आमीष दाखवण्याची गरज नाही आणि सातार्यातील पत्रकार इतके कर्तबगार आहेत की ते कुठल्याही आमीषावर काम करत नाहीत. निवड समितीवर पारदर्शकपणे आमची निवड करुन योग्य पत्रकारांना पुरस्कार द्या, असा आग्रह उदयनराजेंनी आमच्याकडे धरला. दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. युटय़ूब, फेसबुक, सोशल मिडयामुळे सर्व स्वस्त झालं आहे. कुणीही शुटिंग करतंय आणि त्याखाली दोन ओळी लिहून मी पत्रकार झालो म्हणतंय. त्यांनी पत्रकारितेची व्याख्या समजून घ्यावी. सोशल मिडियाला पत्रकारितेचा दर्जा मिळालेला नाही, हे लक्षात घ्यावं. पत्रकारितेचा दर्जा टिकवण्याचं काम प्रत्येकाने केले पाहिजे.

दीपक प्रभावळकर म्हणाले, खा. उदयनराजे आणि पत्रकारांमध्ये बॉन्डींग आहे. यामध्ये आमचं जर्नालिझम किंवा त्यांचं राजकारण आडवं येत नाही. यापुढेही हे बॉन्डिंग कायम राहिल. हा गौरव घराघरात पोहोचावा. प्रास्तविक ऍड. डी. जी. बनकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संपदा देशपांडे यांनी मानले. यावेळी सातारा शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 29 पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात आले. सन्मानचिन्ह, धनादेश, शाल व श्रीफळ देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास  सभापती सीता हादगे, स्नेहा नलावडे, अनिता घोरपडे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर , सुनील काटकर, प्रताप शिंदे आदि उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यास तुडुंब गर्दी होती.

Related Stories

सातारा शहरातील कायदा, सुव्यवस्थेचे ऑडिट करा

Patil_p

सातारा : जुंगटी ते कात्रेवाडी रस्ता होण्यासाठी युवकांनी गाठला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईतील जनता दरबार

Abhijeet Shinde

सातारा शहरातील सलून सुरू

Abhijeet Shinde

सातारा पालिका निवडणुकीत शिवसेना थोपटणार दंड

Patil_p

वाईत बाधिताची नैराश्येतून आत्महत्या

Patil_p

संभाजी मार्केटचा निधी पृथ्वीबाबांच्या प्रयत्नातूनच

Amit Kulkarni
error: Content is protected !!