तरुण भारत

कुळे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास

कुळे व मोले पंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार

प्रतिनिधी /धारबांदोडा

Advertisements

मेटवाडा कुळे येथे बांधकाम खात्यातर्फे उभारण्यात येणाऱया 3 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास स्थानिक आमदार तथा बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याहस्ते करण्यात आला. अंदाजे 25 कोटी रुपये खर्चून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातून कुळे शिगांव व मोले पंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा होणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुळे व मोले पंचायत क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. प्रकल्प उभारताना भविष्याचे नियोजन म्हणून या 3 एमएलडी प्रकल्पाला अजून 1.5 एमएलडी क्षमता वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या जमिनीसाठी नाहरकत दाखला देऊन मळीकेश्वर देवस्थान समितीने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. सावर्डे मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रत्येक पंचायत क्षेत्रात छोटे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या जनजीवन योजनेअंतर्गत हे शक्य होऊ शकले. सध्या गोव्याला दरदिवशी 600 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासत असून पाणी विभागातर्फे 530 एमएलडी पाणी पुरविले जाते. अजूनही 70 एमएलडी पाण्याची कमतरता भासून ती येत्या पाच महिन्यात भरून काढली जाईल. अशी माहिती मंत्री पाऊसकर यांनी दिली.

धारबांदोडा तालुका शैक्षणिक हब बनणार

धारबांदोडा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प उभे राहत असून येत्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय कायदा महाविद्यालयाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. राष्ट्रीय न्याय वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाची नुकतीच पायाभरणी झाली असून धारबांदोडा तालुका शैक्षणिक हब म्हणून विकसित होणार आहे. पर्यटनीय दृष्टय़ाही तालुक्याचा कायापालट होणे शक्य आहे. येत्या 1 नोव्हें.पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील व हॉटमिक्स कामाला सुरुवात होईल, असेही मंत्री पाऊसकर यांनी पुढे बोलताना सांगितले.

यावेळी बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंते उत्तम पार्सेकर, मुख्य अभियंते संतोष म्हापणे, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गावकर, कुळेचे सरपंच गंगाराम लांबोर, उपसरपंच खुशी वेळीप, मोलेच्या सरपंच तन्वी केरकर, उपसरपंच   बाबू शेळके, सावर्डे भाजपा मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, पंचसदस्य मावरीस डिकॉस्ता, मच्छिंद्र देसाई, आरुषी सावंत, निशा शिगांवकर, निलेश सातपालकर, नंदेश देसाई, लक्सो डोईफोडे, सुशांत भगत, रामकृष्ण गावकर, स्नेहलता नाईक, राजेश सांगोडकर, कुळेचे माजी सरपंच यादेंद्र कवळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री पाऊसकर यांच्या कार्यकाळात 540 कर्मचाऱयांना बढती

उत्तम पार्सेकर म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खाते हे इतर खात्यापेक्षा मोठे असून दीपक पाऊसकर यांनी या खात्याचा ताबा घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात 2 हजार कोटी रुपयांच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. शंभर किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यांच्या कार्यकाळात 540 कर्मचाऱयांना बढती मिळाली असून जी यापूर्वी झाली नव्हती. प्रत्येक अधिकाऱयाला काम करण्याचे ते स्वतंत्र देतात असेही त्यांनी नमूद केले.

गेली 25 वर्षे कुळे भागात पाणी प्रकल्प व्हावा अशी सातत्याने मागणी केली जाते. जागेअभावी हा प्रकल्प रखडत होता. मात्र मळीकेश्वर देवस्थानने जमीन उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पाला चालना मिळाली. मंत्री दीपक पाऊसकर यांच्यामुळेच हे शक्य झाले, असे सरपंच गंगाराम लांबोर म्हणाले. तन्वी केरकर व सुधा गावकर यांची यावेळी भाषणे झाली. मंत्री दीपक पाऊसकर यांचा वाढदिवस असल्याने शिगांव ग्रामस्थ तसेच मळीकेश्वर देवस्थानतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रकल्पासाठी जमीन दिल्याबद्दल मळीकेश्वर देवस्थान समितीचा सन्मान करण्यात आला. गांधीनगर येथे पाण्याच्या टाकीसाठी जागा दिल्याबद्दल माजी सरपंच यादेंद्र कवळेकर यांनाही सन्मानित करण्यात आले. किशोर कुबल यांनी सूत्रसंचालन तर संतोष म्हापणे यांनी आभार मानले.

Related Stories

विरोधीपक्ष युतीसाठी भीक मागत फिरतात

Amit Kulkarni

घोषणाबाजी करून सरकारचा केला निषेध उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर

Omkar B

कार खाडीत कोसळून नवजोडप्यास जलसमाधी

Amit Kulkarni

चाचणीनंतर लगेचच मिळणार औषधोपचार

Amit Kulkarni

नेत्रावळी भागात कोरोनाचा शिरकाव

Patil_p

नोकरीसाठी पैसे घेणाऱया आमदारांची न्यायालयाने दखल घ्यावी

Amit Kulkarni
error: Content is protected !!