तरुण भारत

मंत्रिमंडळ बैठकीत बिलांचा प्रस्ताव न आल्याने विश्वजित राणे संतापले

कोरोना काळात खरेदी केलेल्या वस्तूंची बिले : विधानसभा अधिवेशनासही राहिले गैरहजर

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

कोरोना काळातील बिले फेडण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यास टाळाटाळ करीत असल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत मंत्रिमंडळ बैठकीतून आदळआपट करीत काढता पाय घेतला व त्यानंतर संपूर्ण दिवसभराच्या विधानसभा अधिवेशनास टाटा बायबाय केले. सभापती राजेश पाटणेकर यांनी आरोग्यमंत्री आजारी असल्याने ते सभागृहात येऊ शकणार नाही, असे जाहीर केले.

राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरु होण्याच्या 1 तास अगोदर विधानसभा प्रकल्पात मंत्रिमंडळ बैठक ठेवली होती. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांचा प्रस्ताव आला नाही म्हणून ते कमालीचे संतापले. गेले दोन महिने ते हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडून त्वरित बिले संमत करावी असे सांगत आहेत मात्र मुख्य सचिवांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सरकारी कामांमुळे मुख्य सचिवांना नवी दिल्लीला जावे लागते. त्यानुसार अलीकडे दोन – तीन वेळा परिमल राय हे दिल्लीला गेले. परिणामी प्रस्ताव तयार करणे त्यांना शक्य झाले नाही.

कोरोना काळात आरोग्य खात्याने गोमेकॉसह अन्य विभागांसाठी बरीच काही खरेदी केलेली आहे. त्यासाठी आलेला खर्च वसूल होणे आवश्यक आहे. या संदर्भातील फाईलचा शोध विश्वजित राणे हे गेले दोन महिने घेत राहिले. किमान या मंत्रिमंडळ बैठकीसमोर तरी प्रस्ताव यावा अशी त्यांची मागणी होती. परंतु सकाळी मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव आला नाही हे पाहून आरोग्यमंत्री फारच भडकले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शांत राहाण्याचे आवाहन केले. परंतु आरोग्यमंत्री मंत्रिमंडळ बैठक सोडून तडक आपल्या घरी गेले. त्यानंतर आपण आजारी असल्याने विधानसभा कामकाजात सहभागी होऊ शकत नाही असे आरोग्यमंत्र्यांनी सभापतींना कळविले. राणे हे सायंकाळी उशिरापर्यंत सभागृहाकडे फिरकले देखील नाही. आजही ते सभागृहात येण्याची शक्यता कमीच आहे.

Related Stories

कुडचडे पालिकेने एका दिवसाचा स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर करावा

Patil_p

वादग्रस्त आयआयटी प्रकल्प आता पेडण्यात येणार

Amit Kulkarni

पद्मश्री, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे निधन

Amit Kulkarni

कोरोनाचे 12 बळी, 1420 नवे बाधित

Amit Kulkarni

संजीवनी कारखाना लवकरात लवकर सुरू करा

Patil_p

गोवा मराठी अकादमीच्या कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

Omkar B
error: Content is protected !!