तरुण भारत

उमेदवारीत महिलांना 40 टक्के हिस्सेदारी

उत्तरप्रदेश निवडणूक प्रकरणी प्रियंका वड्रांची मोठी घोषणा- 161 ठिकाणी महिलांना उमेदवारी देणार काँग्रेस

वृत्तसंस्था / लखनौ

Advertisements

उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 40 टक्के मतदारसंघांमध्ये महिलांना उमेदवारी देणार आहे. पक्षाच्या महासचिव प्रियंका वड्रा यांनी मंगळवारी लखनौमधील पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. हा निर्णय सर्व पीडित महिलांसोबत न्याय करणार असल्याचे म्हणत प्रियंका यांनी ‘लडकी हूं लड सकती हूं’ असा नवा नारा दिला आहे.

40 टक्के मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा पाहता काँग्रेसला राज्यातील एकूण 403 विधानसभा मतदारसंघांपैकी 161 ठिकाणी महिला उमेदवार उभे करावे लागणार आहेत. काँग्रेसने उमेदवारीत महिलांना 40 टक्के हिस्सेदारी देण्याची घोषणा केली असली तरीही यात नेत्यांच्या कुटुंबातील महिलांनाच प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. स्वतः प्रियंका यांनी पत्रकार परिषदेत घराणेशाहीचे समर्थन केले. प्रभावी नेते कुटुंबातील महिलांनाच उमेदवारी मिळावी याकरता लॉबिंग करतील असे पत्रकारांकडून सांगण्यात आले असता प्रियंका यांनी यात कुठलाच आक्षेप नसल्याची टिप्पणी केली आहे.

आम्ही अर्ज मागविले असून 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. महिलांना राजकीय गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी मिळणार आहे. मला शक्य असते तर 40 ऐवजी 50 टक्के हिस्सेदारी महिलांना दिली असती. स्वतः निवडणूक लढविण्याबद्दल पुढील काळात विचार करणार असून उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱयासोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीडित महिलांना न्याय मिळणार

2019 च्या निवडणुकीवेळी प्रयागराजमध्ये विद्यापीठात काही युवती मला भेटल्या. येथे मुले आणि मुलांसाठी वेगळे नियम असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उन्नावमध्ये पेटवून देण्यात आलेल्या मुलीसाठी आहे. हा निर्णय हाथरसच्या न्याय न मिळालेल्या मुलीसाठी  घेण्यात आला आहे. स्वतःचे भवितव्य घडवून पाहणाऱया किंवा बदल घडवून आणू पाहणाऱया उत्तरप्रदेशातील प्रत्येक महिलेसाठी हा निर्णय असल्याचे प्रियंका म्हणाल्या.

काँग्रेस आमदाराकडूनच लक्ष्य

रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिति सिंह यांनी पक्षाच्या महासचिव प्रियंका वड्रा यांना सल्ला दिला आहे. प्रियंका वड्रा यांनी प्रथम स्वतःचे हात मजबूत करावेत. महिलांना उमेदवारी दिल्यास तो चांगला पुढाकार ठरेल. परंतु विजय अत्यंत अवघड असलेल्या मतदारसंघातच महिलांना उमेदवारी दिली जाते. विजय शक्य असलेल्या मतदारसंघात उमेदवारी देण्यात यावी. 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसचे भवितव्य हे येणारा काळच ठरणार असल्याचे अदिति यांनी म्हटले आहे.

Related Stories

वीज वितरण कंपन्यांना ‘अच्छे दिन’ शक्य

Patil_p

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार निवडणूक

Amit Kulkarni

मध्यप्रदेशात काँग्रेस आमदाराचा भाजप प्रवेश

Patil_p

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान ; ‘या’ दिग्गजांनी बजवला मतदानाचा हक्क

Abhijeet Shinde

पावसाळी अधिवेशनात केवळ 18 तासांचे कामकाज

Patil_p

हॉट स्प्रिंग-गोगरामधून हटण्यास चीनचा नकार

datta jadhav
error: Content is protected !!