तरुण भारत

उत्तम भागवत

अध्याय अकरावा

भगवंत उद्धवाला म्हणाले, स्वप्रयत्नाने कर्मनदीच्या पलीकडच्या तीराला पोचणारे कोणीच दिसत नाहीत. कारण प्रत्येकाला स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल फाजील आत्मविश्वास वाटत असतो पण जो कोणी हे सर्व उपाय बाजूला ठेवून अनन्य भक्तीने माझे भजन करतो, त्याच्यासाठी मात्र ही कर्मनदी कोरडी ठणठणीत पडते. हे लक्षात घेऊन साधू माझ्या भक्तीला प्राण विकतात. माझ्या भजनाच्या प्रेमापुढे कर्माची आठवणसुद्धा ते विसरून जातात. त्यातून नफ्यातोटय़ाचा विचार तर दूरच. त्यामुळे कर्म बाधत नाही. देह म्हणजेच मी अशी कल्पना, मुख्यत्वेकरून अविद्या समजावी. ती कल्पनाच जागच्या जागी जिरून गेली की, मग खरोखर अविद्या नाहीशी होते. माझे भजन म्हणजेच मुख्य भागवतपणा. माझी भक्ती एव्हढी श्रे÷ आहे की, माझ्या वाढत्या भक्तीमुळे अविद्या अनायासेच नाश पावते. अशी भक्ति कोणती ? तर ऐक, आर्त (रोगपीडित), जिज्ञासु (मोक्षाची इच्छा करणारे) व अर्थार्थी (द्रव्येच्छु) जी जी भक्ति करतात, ती खरोखर अविद्यात्मक असते, म्हणून मुख्यत्वेकरून चौथी भक्ति ती माझी खरी भक्ती होय. त्या भक्तीमध्ये अविद्येचा मुळीच विटाळ नसतो आणि भजन तर जागच्या जागी अनायासानेच होत असते. या भक्तीच्या प्रकारात भक्त माझ्या अनुसंधानाशिवाय काहीच जाणत नसतो. त्या दृष्टीने स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच आहेत. कारण ते माझ्या भजनाचा भाग नव्हेत. नानातऱहेच्या विषयांवर मन ठेवून जो ध्यान आणि अनु÷ान करतो, ती काही पवित्र भक्ति नव्हे. कायावाचामनेकरून माझ्या भक्तीत मग्न असणे, भजन करताना दिवस किंवा रात्र ह्याचेही भान न राहणे, ह्याचंच नाव भक्तीची खरी स्थिति होय. अशा भक्ताच्या मुखात जपाशिवायच माझे नाम असते. धारणेशिवायच ज्याच्या मनात माझे ध्यान, आणि सदासर्वदा सारी कर्मे करून संकल्पाशिवायच तो ती मला अर्पण करतो. प्राणायामाशिवायच वायूचा निरोध, मर्यादेशिवायच स्वरूपज्ञान, विषयाशिवायच सदोदित स्वानंद, असें ज्याचेपाशी असते, तोच माझा माझा शुद्ध भक्त. भक्त म्हणवून घेतांना मोठे गोड वाटते पण भजनमार्गामध्ये हृदय पिळवटून निघते. अकृत्रिम भक्ति जेव्हा प्रगट होते, त्या वेळेसच उद्धवा ! माझी भेट होते. अशा रीतीने जो माझे भजन करतो, तो माझ्यामध्ये व मी त्याच्यामध्ये राहतो. सर्व भक्तांमध्ये तोच उत्तम भक्त होय, आणि खरोखर साधु असे नाव त्यालाच शोभते. माझे विश्रांतीचे अकृत्रिम स्थान तोच असतो. त्याच्यासाठी मी स्वतः सर्वांगाचे आंथरूण करतो आणि पावलोपावली मी त्याच्यावरून आपल्या जीवाचे निंबलोण उतरवतो. तो मला कसा आवडतो म्हणशील तर, जीवाला जसा प्राण आवडतो त्याप्रमाणे. हे उत्तम भक्ताचे लक्षण सांगताना देवही प्रेमाने वेडे झाले. त्याना धीर निघेना. त्यानी उद्धवास कडेवर घेतले आणि ते आनंदाने नाचू लागले. तेव्हा विस्मयाने उद्धवाचाही गळा भरून आला. मी देव आणि हा भक्त हेही श्रीकृष्णनाथ विसरून गेले आणि हा देव आणि मी भक्त हा भाव उद्धवातही उरला नाही. अशी भक्तीच्या साम्राज्यात दोघांची एकरूपता झाली. उत्तम भक्तांची कथा कृष्णनाथाला अतिशयच आवडत असल्यामुळेच तो ती फिरून फिरून सांगत होता. कृष्णनाथाला जे प्रेमाचे भरते आले होते ते त्याने आवरले आणि उद्धवाला हाताने थोपटून श्रीकृष्णाने त्याला सावध केले. कोणी मला जाणून माझे भजन करतात आणि कोणी केवळ भावार्थानंच मला भजतात. पण मी त्या दोघांच्याही भक्तीला भुलतो आणि ते दोघेही माझे आवडते असतात. मी आत्मस्वरूपात राहणारा, सच्चीदानंद, जगताचा आदि, आनंदाचा मूळ उत्पादक, नित्य सिद्ध, परमपवित्र, असे जे माझे स्वरूप ते, ते स्पष्टपणे जाणतात. देश, काल व वर्तमान ह्या सर्वात सर्वदा परिपूर्ण, सर्वात्मा, सच्चीदानंदघन आणि भेदरहित असा एक मीच आहे. सत्य, ज्ञान व अनंतस्वरूप परब्रह्म ते खरोखर मी. असे जाणून जे मला भजतात, तेच उत्तम भागवत होत हे लक्षात ठेव. आता तू म्हणशील की, शुद्ध स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर भजन कसे करावयाचे ? तर त्याचे मी तुला सविस्तर उत्तर देणार आहे कारण भक्त आणि भक्ती हे माझे अत्यंत आवडते विषय आहेत.

Advertisements

क्रमशः

Related Stories

काँग्रेसचे मिशन : 40 टक्के कमिशन

Amit Kulkarni

जेंवि पाडसा दावाग्नि

Patil_p

शोभती जैशा दिव्य योगिनी

Patil_p

संवादती आनंदभरित

Patil_p

लेक वारसा

Patil_p

कोकणातील आरोग्य सेवेच्या मर्यादा उघड

Patil_p
error: Content is protected !!