तरुण भारत

काणकोण पालिकेची थकबाकी पोहोचली 2 कोटींवर

पालिका मंडळाच्या बैठकीत माहिती, कर्मचाऱयांना सायंकाळच्या सत्रात वसुलीसाठी पाठविण्याचा ठराव

प्रतिनिधी /काणकोण

Advertisements

काणकोण पालिकेला घरपट्टी, व्यापार कर, हंगामी शॅक्स, पालिकेच्या दुकानांचे भाडे मिळून अंदाजे 2 कोटी रु. इतकी रक्कम येणे असून ही रक्कम गोळा करण्यासाठी पालिका कर्मचाऱयांवर जबाबदारी सोपविण्यात यावी, असा ठराव काणकोण पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बहुतेक कर्मचारी कार्यालयात ज्या व्यक्ती फी वा कर जमा करायला येतात त्यांच्याकडूनच रक्कम गोळा करून घेतात. संध्याकाळच्या सत्रात या कर्मचाऱयांना वसुलीसाठी पाठविण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक रमाकांत ना. गावकर यांनी यावेळी केली.

नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला पालिकेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी उदय प्रभुदेसाई, पालिका अभियंता अजय देसाई उपस्थित होते. इतिवृत्ताचे वाचन संतोष कोमरपंत यांनी केले. थकीत रक्कम देण्याच्या बाबतीत हयगय केली, तर कारवाई करण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. पालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी सर्व घरांचे सर्वेक्षण करून घरपट्टीत वाढ करण्यासंबंधीचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला होता. त्यावेळी आधी थकीत रक्कम गोळा करा आणि त्यानंतरच घरपट्टी आणि अन्य करांत वाढ करा, असा हट्ट सर्वच नगरसेवकांनी धरला.

त्यामुळे या मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मागील मंडळाच्या कार्यकाळातील बेकायदा व्यवहारांची चौकशी करण्यासंबंधी घेतलेला ठराव बारगळल्यातच जमा झाला आहे. काही वॉर्डांत कामे न करताच रक्कम उकळण्यात आली असून कित्येक घरांना बेकायदेशीररीत्या क्रमांक देण्यात आले आहेत, असा आरोप नगरसेवक रमाकांत ना. गावकर आणि नगरसेविका सारा देसाई यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या पहिल्याच बैठकीत केला होता.

सोपो कर, पार्किंग फी ठेकेदारांना सवलत देण्याचा ठराव

काणकोण पालिकेच्या सोपो कराच्या वसुलीचा 28 लाख 95 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला होता. पालिका क्षेत्रात दर शनिवारी आठवडय़ाचा बाजार भरत असून या बाजारात येणारे विक्रेते त्याचप्रमाणे दररोज विक्रीसाठी बसणारे फळ-भाजी विक्रेते आणि अन्य विक्रेत्यांकडून ही रक्कम गोळा केली जात असते. मात्र मार्च, 2020 पासून कोविडमुळे आठवडय़ाचा बाजार जवळजवळ बंद राहिला असल्यामुळे सोपो कराची पावणी घेतलेल्या व्यक्तीला भुर्दंड बसला आहे. त्यामुळे सदर व्यक्तीच्या रकमेत सवलत देण्यात यावी. त्याचप्रमाणे पाळोळे आणि अन्य भागांतील पार्किंग फीसंदर्भात 7 लाख 40 हजार रुपयांना लिलाव करण्यात आला होता. पण मागच्या वर्षी पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे ज्या व्यक्तीने हा ठेका घेतलेला आहे त्या व्यक्तीलाही काही प्रमाणात सवलत देण्यात यावी, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. दोन्ही ठरावांवर चर्चा केल्यानंतर पालिका संचालनालयाकडे यासंबंधी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे मुख्याधिकारी प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.

रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी

या पालिकेतील मुख्य कारकून, टॅक्स कलेक्टर, कनिष्ठ अभियंता, स्वीपर यासारख्या 7 जागा योग्य त्या वेळी न भरल्यामुळे रद्द झालेल्या आहेत. या रद्द झालेल्या जागा आणि कामाचा वाढता व्याप लक्षात घेता विविध विभागांतील मिळून अन्य 10 जागा त्वरित भरायला हव्यात. यासंबंधीचा अहवाल पालिका संचालनालयाला सादर करून मंजुरी मिळविण्यात यावी, अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी यावेळी केली आणि तसा ठराव घेण्यात आला.

दफ्तराच्या सूचीच्या कामाला प्रारंभ

पालिकेची सध्याची कार्यालयीन इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली असून सरकारकडून रक्कम देखील पालिकेच्या तिजोरीत जमा झालेली आहे. त्यामुळे शक्यतो लवकर पालिकेचे दफ्तर इतरत्र हलविणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेच्या सभागृहाची दुरुस्ती करून त्या ठिकाणी प्रशासनाची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील दफ्तराची सूची तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रिबेलो यांनी यावेळी दिली. प्रशासन आणि अन्य दफ्तर व कपाटांच्या सोयीसाठी चार रस्ता येथील डॉ. धिलोन देसाई यांच्या घराची पाहणी करण्यात आली आहे. मात्र पालिका सभागृहाची इमारत सुरक्षित असल्यासंबंधीचा अहवाल अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून मिळाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्याधिकारी प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले.

पालिकेची भाजी मार्केटची इमारत पाडल्यानंतर ज्या व्यक्तींचे या इमारतीमध्ये गाळे होते त्या व्यक्तींना अद्याप अन्यत्र जागा देण्यात आलेली नाही. सदर व्यक्तींकडे लीज दस्तऐवज असून जोपर्यंत इमारत उभी होती तोपर्यंत त्यांनी पालिकेचे भाडे भरलेले आहे. त्यामुळे नव्या इमारतीमध्ये त्यांची सोय करण्यात यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. मात्र यासंबंधीचा दस्तऐवज तपासून पाहिल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल. शिवाय या प्रस्तावाला पालिका संचालनालयाकडून मंजुरीची आवश्यकता आहे, असे मुख्याधिकाऱयांनी स्पष्ट केले.

जैवविविधता व्यवस्थापन समितीची पुनर्स्थापना

पालिका क्षेत्रासाठी स्थापित केलेल्या जैवविविधता समितीमध्ये बदल करून या समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या समितीवर नगराध्यक्ष रिबेलो यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पालिका मुख्याधिकारी प्रभुदेसाई हे या समितीचे सचिव असून उपनगराध्यक्षा अमिता पागी आणि सारा देसाई महिला प्रतिनिधी, तर संदेश गावकर हे अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी आणि लक्ष्मण पागी, शुभम कोमरपंत हे सदस्य आहेत.

मोकळय़ा जागी दुचाक्या : तक्रार करणार

पालिका क्षेत्रातील कदंब बसस्थानकासमोरच्या मोकळय़ा जागी रस्ता अडवून दुचाक्या पार्क करून ठेवण्यात येत असून त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. यासंबंधी वाहतूक खाते आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे रमाकांत गावकर यांनी सांगितले. कदंब बसस्थानक ते पणसुले रस्त्यापर्यंतच्या भागाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. ते करताना बांधकामाधीन रवींद्र भवनाच्या मागच्या बाजूने रस्ता नेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक हेमंत गावकर यांनी केली.  पालिका क्षेत्रातील विक्रेत्यांची समिती स्थापन करणे, पाळोळे येथील प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे, चावडीवरील पालिका उद्यानाचे नूतनीकरण करणे, पालिका क्षेत्रातील जुने वीजखांब आणि वीजवाहिन्या बदलणे, वॉर्ड 11 मध्ये गटार दुरुस्ती, रस्ता यासंबंधीचे ठराव या बैठकीत घेण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत नीतू देसाई, धीरज ना. गावकर, शुभम कोमरपंत, सारा देसाई यांनीही भाग घेतला.

Related Stories

कोरोनाबाधितांचा एकाच दिवशी शतकपार विक्रम

Patil_p

रेल्वेच्या दोन बोगी भरुन भिकारी गोव्यात दाखल

Patil_p

मगो केंद्रीय समितीची निवडणूक 16 जानेवारीला

Omkar B

कला निकेतन सांस्कृतिक मंडळाचे पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni

मजुरांच्या नावे भाजपकडून 13 कोटींचा घोटाळा

Omkar B

डॉ.सतीश कुडचडकर, डॉ. सिक्लेटिका रिबेलो यांनी मिळविली सुवर्णपदके

Amit Kulkarni
error: Content is protected !!