तरुण भारत

गुंजी माऊलीदेवी यात्रोत्सवाची सांगता

वार्ताहर /गुंजी

विजया दशमीपासून पालखी सोहळय़ाने सुरुवात झालेली येथील श्री माऊलीदेवीच्या यात्रोत्सवाची आज देवी भंडारण्याचे गाऱहाणे होऊन उत्साहात सांगता झाली. गुंजी माऊलीदेवी ही एक जागृत व नवसाला पावणारी देवी असा सर्वदूर लौकिक असल्याने गेले चार दिवस यात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. भाविकांनी देवीच्या दर्शनाबरोबरच ओटी भरणे, तुलाभार करणे अशा विविध धार्मिक विधी करून आपले नवस फेडले. वास्तविक उत्सव कमिटीने याआधीच हा यात्रोत्सव कोरोना नियमावलीचे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले होते. त्याचबरोबर पूजासाहित्य व्यतिरिक्त कोणतीही दुकाने थाटण्यास मनाई केली होती. त्यामुळे सुरुवातीचे दोन दिवस दुकाने विरहित जत्रा पहावयास मिळाली. मात्र त्यानंतर लोकांचा प्रतिसाद व गर्दी पाहून अनेक दुकानदारानी आपापली दुकाने थाटण्यास सुरुवात केली. पोलीस प्रशासने दुकानदारांना दुकाने लावण्यास मज्जाव केल्याने काही व्यापाऱयांनी मंदिर परिसराच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने थाटली.तिसऱया-चौथ्या दिवशी मंदिर परिसरातही बरीच दुकाने थाटण्यात आली. त्यामुळे भाविकांत प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि शेवटच्या दिवशीही अलोट गर्दी पहावयास मिळाली.

Advertisements

 यात्रोत्सव काळात दिवसभर आरोग्य विभागाच्या वतीने सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंग, गोळय़ा औषधे आणि एका अँबुलन्सचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र काही नागरिकांना कालबाह्य गोळय़ांचे वितरण केल्याने नागरिकांबरोबर येथील आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्या त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याच्या घटनाही घडल्याने हा चर्चेचा विषय ठरला. याविषयी खानापूरचे आरोग्य अधिकारी संजय नांदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

या यात्रोत्सव काळामध्ये मंदिरात सीसीटीव्हीबरोबरच पोलिसांनीही रात्रंदिवस चोख पहारा ठेवला होता. त्यासाठी पोलिसांच्या एका मोठय़ा व्हॅनसह पोलीस मंदिर परिसरात ठाण मांडून होते. खानापूरचे पोलीस अधिकारी व पोलिसांचे फिरते पथकही अधूनमधून फेऱया मारीत होते. अनुचित घटना किंवा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर परिसरातही पोलिसांचे उत्तम सहकार्य पहावयास मिळत होते.

खराब रस्त्यामुळे भाविकांत नाराजीचा सूर

खानापूर-गुंजी-रामनगर हा रस्ता अत्यंत खराब आणि खड्डेमय असल्याने यात्रोत्सव काळामध्ये या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची रहदारी वाढलेली होती. मात्र भाविकांना गुंजीला जाण्यासाठी अत्यंत खराब रस्त्याचा सामना करावा लागला. खराब रस्त्यामुळे आणि खड्डय़ातून प्रवास केल्याने अनेक भाविकांचे शारीरिक हाल झाले. दुचाकी चालकांना रस्त्यावरील धुळीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भाविकांतून तीव्र नाराजीचा सुर उमटत असल्याचे दिसून येत होते.

Related Stories

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Patil_p

रॉजर क्लब-सिग्नेचर क्लब यांच्यात आज अंतिम सामना

Amit Kulkarni

उमेदवारांची पारख करून मतदान करा

Patil_p

हिंदवाडी येथे विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

Patil_p

सोमवारी 769 रुग्ण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

आशादीप सोशल वेल्फेअरतर्फे येळ्ळूर येथे कीट वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!