तरुण भारत

चाफळला फौजदाराची खुर्ची रिकामी

उमेश सुतार / चाफळ :

राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या चाफळ येथील पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीतील विभागात दोन महिन्यांपासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भुरट्या चोऱ्या, प्रेमप्रकरणातून खुन या घटना ताज्या असतानाच माजगावला घडलेला घरे जाळण्याचा प्रकार आदी घटनांमुळे क्राईम रेट वाढला असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मात्र चाफळच्या पोलीस दूरक्षेत्रात फौजदाराची खुर्ची रिकामी राहत असल्याने विभागातील जनतेवर मल्हारपेठ पोलीस स्टेशनची वारी करण्याची वेळ आली आहे. परिणामी विभागातील जनतेला रात्री-अपरात्री अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Advertisements

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानसभा मतदार संघातील तीर्थक्षेत्र असलेले बाजारपेठेचे मुख्य ठिकाण चाफळ आहे. हा विभागावर दोन्ही राजकीय गटाचे प्राबल्य राहिले आहे, त्यामुळे चाफळ विभाग नेहमीच अतिसंवेदनशील ठरला आहे. 22 गावे व 23 वाड्या वस्त्यांचा हा विभाग पूर्वीपासून उंब्रज पोलीस स्टेशनला जोडला गेलेला होता. त्यामुळे हे पोलीस स्टेशन चाफळ विभागातील जनतेसाठी सोईचे होते. चाफळ येथे पोलीस दुरक्षेत्र असल्याने व येथील कर्मचारीही याठिकाणी मुक्कामी राहत असल्याने विभागात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत होती. मात्र मल्हारपेठला पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाल्याने चाफळ विभाग मल्हारपेठ पोलीस ठाण्यास जोडल्याने चाफळ विभागातील जनतेची डोकेदुखी वाढली आहे. चाफळच्या दुरक्षेत्राकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने या विभागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. विभागात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दोन महिन्यात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट दिसून येत आहे.
चाफळ पोलीस दुरक्षेत्राचा कारभार सुरु झाल्यावर कर्मचाऱ्यांनी विभागात फेरफटका मारून ज्याप्रमाणे इतर गोष्टींचा सर्व्हे करण्याची तत्परता दाखवली, त्याचप्रमाणे विभागातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी विभागातील जनतेमधून केली जात आहे.

शाळांमधील संगणक चोरीचा तपास ‘जैसे थे’

चाफळ पोलीस दुरक्षेत्राचे हद्दीतील नाणेगांव खुर्द हायस्कुल शाळेत कार्यालय फोडून चोरट्यांनी संगणक संच लंपास केले. त्याअगोदर केळोली येथील अंगणवाडी शाळेतूनही संगणक चोरीची घटना घडली. मात्र याचा तपास अद्यापही जैसे थे अवस्थेत असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येते. विभागात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुक्कामी कर्मचाऱ्यांची गरज

चाफळ पोलीस दूरक्षेत्र यापूर्वी उंब्रज पोलीस ठाण्याशी संलग्न होते. यावेळी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गरड यांच्या मार्गदर्शनाखाली चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी विभागात नेहमीच सतर्क असायचे. मात्र नव्याने रुजू झालेले कर्मचारी व अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात मुक्कामी थांबत नसल्याने विभागातील जनतेला रात्री-अपरात्री अडचण निर्माण झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मीडियाला माहिती मिळण्यास अडचणी

चाफळ पोलीस दूरक्षेत्रात अधिकारी किंवा कर्मचारी थांबत नाहीत. या दुरक्षेत्रात संपर्क करावयाचा झाल्यास याठिकाणी साधा दूरध्वनीही नाही, त्यामुळे विभागात एखादी घटना घडली तर मीडियाच्या प्रतिनिधीना माहिती मिळवण्यासही अडचणी येत आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधला तर त्यांच्याकडूनही प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून चाफळला सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी विभागातील मीडिया प्रतिनिधींनी केली आहे.

Related Stories

लाकूड पुरवठादार कदम यांचे बील अदा करु नये

Amit Kulkarni

ह्यांना काय जिल्हाधिकायांनी वेगळा नियम लावलाय का?

Patil_p

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

datta jadhav

कैलास स्मशानभूमीत 2 वर्षात कोविडच्या 2201 जणांवर अंत्यसंस्कार

datta jadhav

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करणे महिलेच्या अंगलट

Abhijeet Shinde

ग्रामस्तरीय समीत्यांनो कोरोना विरुदध लढाई साठी सतर्क व्हा

Patil_p
error: Content is protected !!