तरुण भारत

मासळी मार्केटच्या प्रश्नावरून वास्कोत पुन्हा वाद

नवीन मार्केट बांधकामासाठी स्थलांतर करण्यास मासे विक्रेत्यांचा ठाम नकार

प्रतिनिधी /वास्को

Advertisements

नवीन मासळी मार्केटच्या प्रश्नावरून वास्कोत पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. नवीन मार्केटचे बांधकाम करण्यासाठी जुने मार्केट पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी मासे विक्रेत्यांना तात्पुरत्या काळासाठी मार्केट शेड उपलब्ध करण्यात आलेली आहे. मात्र, या मार्केटमधील मासे विक्रेत्या महिला मार्केट सोडायला तयार नसल्याने कोंडी निर्माण झालेली आहे. गुरूवारी सकाळी या मार्केटबाहेरील फळ विक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न पोलीस संरक्षणात करण्यात आला असता वातावरणात तणाव निर्माण झाला. या प्रश्नावर वास्को शहरात आज पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

वास्कोतील मासे विक्रेत्यांसाठी तात्पूरत्या मासळी मार्केटची व्यवस्था करण्यात आलेली असून पुढील दोन दिवसांत जुन्या मार्केटमधील मासळी विक्रेत्यांचे त्या मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात येणार असल्याचे व त्यानंतर जुन्या मार्केटच्या जागी नवीन मार्केट उभारणीच्या कामाला सुरवात होणार असल्याचे स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांनी म्हटले होते. त्यानुसार काल गुरूवारी सकाळी पहिला प्रयत्न फळविक्रेत्यांपासून झाला. मात्र, अधिकारी व पोलिसांना मासे विक्रेत्या व फळविक्रेत्यांकडून स्पष्ट नकार मिळाला.

वास्को शहरात नवीन मासळी मार्केट उभारण्याचा विषय मागची पाच वर्षे रखडत राहिलेला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांनी प्रारंभी अनेक मुद्दे मांडून या मार्केटला विरोध केला होता. मात्र, आमदार कार्लुस आल्मेदा तसेच मुरगाव पालिकेला त्यांच्या शंका कुशंका तसेच समस्यां दूर करण्यास मध्यंतरी यश आले होते. मात्र, आता पुन्हा मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी शहरात होणारी घाऊक मासे विक्री व इतर विविध ठिकाणी होणारी मासे विक्री बंद केली तरच मार्केटमधील स्थलांतर करणार असल्याचे स्पष्ट करून प्रशासनावर दबाव आणलेला आहे.

काही महिन्यांपूर्वीच वास्को शहरात नवीन मार्केटच्या बांधकामाला सुरवात होणार होती. मात्र, सध्याच्या मार्केटमधील मासे विक्रेत्यांना इतर ठिकाणी तात्पुरती परंतु सुसज्ज व्यवस्था निर्माण करण्यात वेळ गेल्याने या मार्केटच्या बांधकामाची सुरवात लांबणीवर पडली होती. आता ही अडचण दूर झालेली आहे. साळगावकर हाऊससमोरील खुल्या शासकीय जागेत मासे विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या काळासाठी सुसज्ज मार्केट शेड उभारण्यात आली आहे. या शेडमध्ये मासे विक्रेत्यांचे स्थलांतर होणार आहे.

मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांनी शहर व परीसरात होणारी घाऊक मासे विक्री तसेच इतरत्र ठिकाणी होणारी मासे विक्री बंद करण्याची मागणी केल्याने ही मागणी पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. या मागणीमुळेच मासे विक्रेत्यांचे स्थलांतर काही दिवस लांबणीवर पडले होते. परंतु पालिकेला आता मासळी मार्केटबाहेरील मासे विक्र बंद करण्यासाठी पावले उचलल्याने मासे विक्रेत्यांची ही मागणीही पूर्ण होणार आहे. परंतु जोपर्यंत एकही मासे विक्रेता मार्केटबाहेर मासे विकताना दिसणार नाही तोपर्यंत मार्केटमधील मासे विक्रेत्या महिला मार्केट सोडण्याच्या तयारीत नाहीत.

मार्केट बाहेरील मासे विक्री बंद करण्याचा मुख्याधिकाऱयांना आदेश

नवीन मासळी मार्केटची उभारणी तसेच मासे विक्रेत्यांच्या स्थलांतरच्या प्रश्नावर आमदार कार्लुस आल्मेदा यांनी बुधवारी मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय अधिकाऱयांसमवेत बैठक घेतली व मार्केटचे बांधकाम हाती घेणे आवश्यक असल्याने काही विशिष्ठ सुचना केल्या. या बैठकीला मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, मुख्याधिकारी जयंत तारी, उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, मामलेदार धिरेन बाणावलीकर, मुरगावचे नगरसेवक व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्को शहरात विविध ठिकाणी होणारी घाऊक व इतर मासे विक्री बंद करण्याची सुचना मुख्याधिकाऱयांना केली. या कारवाईमुळे पारंपरीक मासे विकेत्या महिला जुने मासळी मार्केट खाली करतील असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. शहरातील सर्व फळविक्रेत्यांनासुध्दा तात्पुरत्या मासळी मार्केटच्या ठिकाणी आणण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

आज पुन्हा वास्कोतील वातावरण तापण्याची शक्यता

बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर काल गुरूवारी पालिका अधिकाऱयांनी वास्कोतील या मार्केटबाहेरील फळविक्रेत्यांना प्रथम गाठले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस फौजफाटाही होता. आज शुक्रवारपर्यंत तात्पुरत्या काळासाठी बांधण्यात आलेल्या नवीन मार्केटमध्ये स्थलांतर करण्याची सुचना अधिकाऱयांनी फळविक्रेत्यांना केली. मात्र, फळविक्रेत्यांनी आपण मासे विक्रेत्यांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. फळविक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येताच मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी बाहेर येऊ हस्तक्षेप केला. फळविक्रेत्या व मासे विक्रेत्यांपैकी कोणीच स्थलांतर करणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. शहरात अनेक ठिकाणी होणाऱया मासे विक्रीचाही त्यांनी उल्लेख केला व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मासे विक्रेत्या महिलांनी व फळ विक्रेत्यांनी ठाम नकार देऊन अधिकाऱयांना व पोलिसांनी तेथून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही वेळ वातावरण तापले. फळ विक्रेत्यांना आणि मासे विक्रेत्यांना जुन्या मार्केटमधून हटवण्याचा प्रयत्न पालिका व पोलिसांकडून आज शुक्रवारी पुन्हा होणार आहे. त्यामुळे पुन्हा वास्कोतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Related Stories

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा, प्रशिक्षणाने खेळाडू व्यस्तः संजय कवळेकर

Omkar B

येत्या वर्षापासून वैद्यकीय शिक्षणासाठी ओबीसीला राखिवता

Patil_p

आयुष्मान सहकारासाठी सामंजस्य कराराचे अनावरण

Omkar B

ओपा पाणी प्रकल्पाची यंत्रणा निकामी

Omkar B

साळजिणीतील विद्यार्थ्यांचे नेटवर्कअभावी हाल

Patil_p

मडगाव नगरपालिकेचे दयनीय वाहन व्यवस्थापन पुन्हा उघड

Amit Kulkarni
error: Content is protected !!