तरुण भारत

रंगमंच पुन्हा एकदा सजला..!

ऐन दिवाळीत रंगभूमी उजळणार; जुन्या-नव्या नाटकांचा फराळ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनामुळे गेली दीड दोन वर्षे काळ्या पडद्याआड गेलेला रंगमंच पुन्हा नव्याने सजला आहे. राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर आज शुक्रवारपासून रंगभूमीवरील नाटकांचे प्रयोग सुरू होत आहेत. नाट्यकर्मींबरोबर नाटकांच्या प्रयोगावर अवलंबून असणार्‍या स्थानिक कलाकार, मदतनीस व इतर घटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नवीन नाटकांच्या प्रयोगासाठी सज्ज करण्यात आले आहे. दरम्यान, आगामी तीन महिन्यांच्या काळातील शनिवार आणि रविवारचे प्रस्तावित नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल झाले असून नाट्यरसिकांनी ऑनलाईन बुकींग करून आपला सहभाग निश्चित केला आहे.

Advertisements

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील चित्रपटगृहांबरोबर नाट्यगृहात होणार्‍या प्रयोगांवर बंदी घातली होती. त्यामुळे दीड पावणेदोन वर्षे रंगभूमीचा आत्मा असणारी नाट्यगृहे पूर्णपणे काळ्या पडद्याआड गेली होती. आता शासनाने सशर्त परवानगी दिल्यानंतर ही नाट्यगृहे सुरू होणार आहेत. राज्यातील विविध नाटक कंपन्यांनी आपल्या नाटकांचे प्रयोग सादर करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यभरातील नाट्यगृहात मायबाप रसिक पेक्षकांच्या मागणीप्रमाणे वेळापत्रकही तयार केले आहे. कोल्हापूरमध्ये आगामी तीन महिन्यात येणार्‍या शनिवार आणि रविवारच्या प्रयोगांचे ऍडव्हास बुकींगही झाल्याची माहिती स्थानिक नाट्यवितरकांकडून देण्यात आली. सादर करण्यात येणार्‍या नाटकांमध्ये गाजलेल्या जुन्या नाटकांसह नवीन नाटकांचाही समावेश आहे. प्रयोग सुरू होणार असल्याने स्थानिक कलाकारांना काम मिळणार आहे तर नाट्यवितरकांनाही दिलासा लाभणार आहे.

दीड वर्षांनी लागणार चेहर्‍याला रंग

कोरोनामुळे नाटकांचे प्रयोग बंद झाल्याने लहान मोठे सर्वच कलाकार अडचणीत आले. त्यांच्या चेहर्‍याला रंग लागला नाही, रंगभूषेबरोबर वेषभूषाही बदलली नाही. नाट्यगृहे सुरू करा, नाटकांच्या प्रयोगांना परवानगी द्या, या मागणीसाठी कोल्हापूरसह राज्यात हजारो कलाकार रस्त्यावर उतरले होते. आता कलेचे चीज होणार आणि काम मिळणार या भावनेने रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांत ऐन दिवाळीच्या तोंडावर आनंदाचे वातावरण आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले सज्ज !

महापालिकेच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची स्वच्छता, सॅनिटायझेशन, लाईट इफेक्ट, रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. कोरोनानंतर या नाट्यगृहात रंगकर्मी कलाबाजारचा पहिला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर विविध नाटक आणि सांगितिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

`केशवराव’मध्ये 3 नोव्हेंबरला `दिवाळी पहाट’

3 नोव्हेंबर रोजी गुणीदास फौंडेशनच्या वतीने दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. महाजन पब्लिसिटी, आनंद कुलकणीं, लोंढे पब्लिसिटी, गायकवाड पब्लिसिटी यासह अन्य नाट्यवितरकांनीही आगामी नाट्यप्रयोगाचे बुकींग केले आहे. शहरातील शाहू स्मारक भवन, शाहू सांस्कृतिक, राम गणेश गडकरी आदी सभागृहातही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

शासन नियमानुसार उत्पन्नावर परिणाम होणार

शासनाने 50 टक्के आसन क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील 714 पैकी 350 आसन व्यवस्था वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नाट्यवितरकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे शासनाने पूर्ण क्षमतेने नाट्यगृह सुरू करावीत.

– आनंद कुलकर्णी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखा

कलाकारांमध्ये चैतन्याचे वातावरण

कोल्हापुरातील रंगकर्मींनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोरोनात आलेली मरगळ झटकून रंगकर्मी नव्या उमेदिने नाटक सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या रंगकर्मींना दिलासा देण्यासाठी नाट्यगृह येथून पुढे सुरूच राहावीत, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना

– सुनील घोरपडे, रंगकर्मी कलाबाजार संघटना, नाट्य कलाकार, दिग्दर्शक

Related Stories

सातवेत ऊसाचा फड पेटवताना शेतकऱ्याचा मृत्यू

Abhijeet Shinde

देशात अनेक राज्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव, पोल्ट्री व्यावसायिकांचे धाबे दणाणले

Abhijeet Shinde

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टला कलम 144 लागू

Abhijeet Shinde

श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिर किमान मुखदर्शनासाठी खुले करा

Abhijeet Shinde

गोकुळ फक्त शेतकरी उद्धाराचा केंद्रबिंदू असेल !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!