तरुण भारत

ट्रेकर्सना खुणावणारा वासोटा किल्ला उद्यापासून सुरू

वार्ताहर / कास :

राज्यभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक शनिवार 23 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ट्रेक सुरू होत असल्याने पर्यटक व ट्रेकर्स यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisements

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात वासोटा किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी केला गेला. औंधच्या पंतप्रतीनिधी संस्थानच्या काळात त्यांच्या वतीने ताई तेलीन नावाची महिला किल्लेदार होती. तिची आणि पेशव्यांचे सरदार बापू गोखले यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाल्याचे इतिहासात आढळते. दुर्गम असलेला हा किल्ला व्याघ्रगड म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रभरातील ट्रेकर्सना भुरळ घालणारा या किल्ल्याची सफर अविस्मरणीय असते. कोयनेच्या शिवसागर जलाशयातील दीड तासांचा बोटीचा प्रवास, सभोवताली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे राखीव जंगल, पशुपक्ष्यांचा मुक्त संचार अशा रम्य वातावरणात वासोट्याच्या पायथ्याला पोहोचता येते. बामणोली येथील भैरवनाथ बोट क्लबच्या माध्यमातून बोट सेवा उपलब्ध केली जाते. पायथ्याला पोहोचल्यानंतर वन विभागाची परवानगी व आवश्यक शुल्क भरून ट्रेकला सुरुवात होते. वासोट्याचे जंगल एवढे निबीड आहे की इथे सूर्यकिरण ही जमिनीवर पोहोचत नाहीत. सूर्यकिरण मिळवण्यासाठी ताडमाड वाढलेले वृक्ष एकमेकांशी स्पर्धा करतात. मान उंच करून ही हे वृक्ष दिसत नाहीत. दीड तासाच्या चढाईनंतर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्यावर शंकराचे एक प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर, जुन्या वाड्याच्या पायाचे भक्कम अवशेष व बुरुज आढळतात. किल्ले वासोटा किल्ल्याच्या पूर्वेला जुना वासोटा किल्ला आहे. जुना वासोटा किल्ल्याच्या डोंगरावरील एकावर एक असलेले कातळ खडकाचे तर रचून झालेला बाबूकडा पाहताना मनाचा अक्षरशा थरकाप उडतो. या ठिकाणी दिलेल्या आवाजाचा प्रतिध्वनी पुन्हा-पुन्हा उमटतो. अशा या ऐतिहासिक वासोट्याचा ट्रेक चालू झाल्याने स्थानिकांसह व्यवसायिकांमधे आनंदाचे वातावरण आहे. या भागातील रोजगार व पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.

Related Stories

‘लस आपल्या दारी’ उपक्रम फलदायी

datta jadhav

यवतेश्वर परिसरात मानवी सांगडा सापडल्याने खळबळ

Patil_p

सातारा : रुई येथील बहिण भाऊ बेपत्ता

Abhijeet Shinde

यशवंतराव चव्हाण सामाजिक पुरस्काराचे रविवारी वितरण

Patil_p

हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाचा प्रश्न पडला भिजत

Patil_p

एक रुपया टाका अन् शुद्ध पाणी घ्या…

Patil_p
error: Content is protected !!