तरुण भारत

ट्रम्प यांचे ‘स्वतः’चे समाज माध्यम

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि इ.स. 2024 च्या तेथील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा उतरण्याची अनिवार इच्छा बाळगून असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी परवाच आपण ‘ट्रूथ’ नावाचे स्वतःचे समाज माध्यम अस्तित्वात आणण्याची घोषणा केली आहे. ट्विटर आणि फेसबुक ही जगप्रसिद्ध समाज माध्यमे ट्रम्प विरोधी बनली. अमेरिकन संसद (कॅपिटॉल हॉल) ज्या पद्धतीने ट्रम्प समर्थकांनी त्यांच्याच आदेशावरून वेठीस धरली, ज्या पद्धतीने पराभूत ट्रम्प यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आणि अखेरपर्यंत अध्यक्षपद सोडण्यास जी चालढकल केली त्यामुळे अमेरिकन लोकशाहीस चांगलाच धक्का बसला.

ट्रम्प यांच्या बेलगाम व बेछूट वक्त्यांना प्रसिद्धी देऊ नये, असा दबाव साऱयाच माध्यमांवर आला आणि या प्रक्रियेतूनच ट्विटर व फेसबुक या समाज माध्यमातून ट्रम्प हद्दपार झाले. हुकूमशाही वृत्ती अंगी भिनलेल्या ट्रम्प यांना आरंभापासूनच मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे आपल्या मुठीत हवी होती. ‘राजा बोले आणि दळ हाले’ या पद्धतीने त्यांनी कार्यरत असावे, सदैव आपली भलावण करावी, स्तुती सुमनांचा वर्षाव करीत रहावे, असे आत्मप्रेमात गुरफटलेल्या आणि आत्मप्रौढीत रमलेल्या ट्रम्प यांचे मत होते. परंतु अमेरिकन माध्यमे, त्यांचा आजवरचा इतिहास  पहाता सत्ताधाऱयांपुढे झुकणारी, लोटांगण घालणारी, विकली गेलेली क्वचितच होती आणि आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सत्ताधाऱयांच्या चुका दाखविण्याचे आणि जनमानसाचे प्रतिनिधीत्व करण्याचे काम ती चोखपणे करीत राहिली. या त्यांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे कधी न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, अटलांटिकचे पत्रकार तर  कधी फेसबुक, ट्विटरचे प्रशासन ट्रम्प यांच्या जाहीर टिकेचे लक्ष्य बनत राहिले. अगदी भर सभेतही पत्रकारांवर आरोप करण्यास, त्यांना सभेतून बाहेर जाण्याचा आदेश देण्यासही ट्रम्प यांनी मागे पुढे पाहिले नाही. याचा परिणाम इतकाच झाला की, माध्यमांचे त्यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र बनत गेले. जनमानसात त्यांचे स्थान घसरत गेले आणि अंतिमतः निवडणुकीत ट्रम्प पराभूत झाले.

Advertisements

तसे पहाता, अमेरिका ही जगातील सद्य काळातील सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था आहे. साधारण 130 वर्षांपूर्वी अमेरिकन राज्यघटनेची शताब्दी साजरी करताना तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी वृत्तपत्रांनी नागरी जीवनात निर्माण केलेल्या वैचारिक क्रियाशिलता आणि सजगता याशिवाय लोकसत्ताक राज्यास निश्चितता व स्थिरता लाभणे कठीण आहे. मुक्त प्रसार माध्यमे ही नागरिकांच्या रोजच्या जीवना पलीकडे, त्यांचे अस्तित्व, स्वारस्य आणि जबाबदारी  यांची जाणीव करून देत राष्ट्र व समाज या संकल्पनेविषयी त्यांना विचार प्रवण व सक्रिय करतात,’ असे म्हटले होते. वुड्रो विल्सन या लोकप्रिय अमेरिकन अध्यक्षाने माध्यमांबद्दल अगदी आरंभीच्या काळात असे विवेकपूर्ण सुतोवाच केले असले तरी ट्रम्प यांच्याप्रमाणे काही अमेरिकन अध्यक्षानी प्रसार माध्यमांना अंकीत करण्याचे किंवा त्यांचा अवकाश कुंठीत करण्याचेही प्रयत्न केले आहेत. उदाहरणेच द्यायची तर वॉटरगेट प्रकरणातील अध्यक्ष निक्सन यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत वृत्तपत्रांशी उभा दावा मांडला. ते असेही म्हणाले की, माध्यमे ही कोणाचेच प्रतिनिधीत्व न करणारी, वेगळे हितसंबंध जोपासणारी, बेजबाबदार अशा प्रकारची आहेत व देशभक्त अमेरिकन नागरिकांनी त्यांच्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. आपल्या कारकीर्दीत निक्सन यांनी ट्रम्प यांच्या प्रमाणेच पत्रकारांना  घाबरवणे, त्यांच्यासमोर जाणे टाळणे, टेलिव्हिजनला सोयिस्करपणे हाताशी धरून स्वतःचे समर्थन करणाऱया मुलाखती देणे अशा कारवाया केल्या. दुर्दैवाने त्यांचे वॉटरगेट भ्रष्टाचार प्रकरण वृत्तपत्रानींच लावून धरून त्यांना अध्यक्षपदावरून उतरण्यास भाग पाडले आणि आपले सामर्थ्यही दर्शविले.

अमेरिकेचे अलीकडचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी सातत्याने प्रसार माध्यमांचा प्रभाव मर्यादित करण्याचे प्रयत्न केले. माध्यमांपासून माहिती लपवून ठेवण्यासाठी कार्यकारी अधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षा या प्रणालीचा ढाल म्हणून वापर केला. त्यानंतर त्या अर्थाने उदारमतवादी म्हणून गणल्या गेलेल्या बराक ओबामा या अध्यक्षांनाही माध्यमांच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करण्याचा मोह टाळता आला नाही. संपादक, पत्रकारांच्या फोनवरील संभाषणाचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्या एका खात्याद्वारे करण्यात आल्याच्या बातम्या त्यांच्या कार्यकाळातच गाजल्या होत्या. प्रसार माध्यम संघटनेने याप्रकरणी चौकशीची मागणीही केली होती.

या साऱया पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःच्या ‘ट्रम्प मीडीया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप’ या कंपनीच्यावतीने आपल्या विचारांच्या प्रसारांसाठी  ‘ट्रूथ’ हे सोशल ऍप पुढे आणणे हा निखालसपणे विरोध करणाऱया निर्बंध लादणाऱया समाज व प्रसार माध्यमांना शह देण्याचाच प्रयत्न आहे. आतापर्यंत  कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने असा उघड प्रयत्न केल्याचेही ऐकिवात नाही. म्हणूनच तो एतिहासिकही आहे. यासंदर्भात बोलताना ‘तालिबानचा मोठा वावर तुमच्या माध्यमांवर असतो आणि तुम्ही लोकप्रिय अमेरिकन अध्यक्षाला मात्र गप्प बसवता हे स्वीकारार्ह नाही’ असा टोलाही ट्रम्प यांनी हाणला आहे. एकंदरीत या संदर्भातील ट्रम्प यांच्या अविर्भावाकडे पाहता भविष्य काळात ते स्वतःच्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रेही सुरू करू शकणार नाहीत याची आज शाश्वती देता येत नाही.

सध्याच्या जगात असे दिसते की लोकशाहीतील प्रसार माध्यमांकडे  पहाण्याचा सत्ताधाऱयांचा दृष्टीकोन देशोदेशींच्या लोकशाहीत बदलला आहे. जनमत बनवण्याचे त्यांचे सामर्थ्य, अन्याय चव्हाटय़ावर आणून सत्तेस हादरा देण्याची त्यांची क्षमता जर आपल्या सत्तेस आणि तिच्या स्थिरतेस धोका निर्माण करीत असेल तर या माध्यमांचा ताबा आपणच का घेऊ नये? त्यांना आपले अहर्निश असे प्रचार यंत्र का बनवू नये? हा विचार या मुळाशी आहे. तथापि, सत्ताधारी आणि प्रबळ राजकीय, शक्ती जर स्वतःचीच प्रसार माध्यमे पुढे आणू लागले. त्यांना दडपणाखाली, आमिषांद्वारे वा अप्रत्यक्ष खरेदीद्वारे नियंत्रणात आणू लागलेतर मग हुकूमशाही देशातील सरकारी प्रसार माध्यमे आणि लोकशाही देशातील प्रसारमाध्यमे यात गुणात्मक फरक उरणार नाही. प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, स्वतंत्र, स्वायत्त आणि जनमताच्या बाजूचाच असायला हवा. सत्ताधारी, प्रभावी नेते स्वतःच जर तो खिळखिळा करू लागले तर त्याचबरोबरीने लोकशाहीही प्रभावहीन होऊन उतारास लागेल.

अनिल आजगांवकर

Related Stories

खरे कोणाचे…खोटे कोण ?

Amit Kulkarni

हस्तिदंती मनोऱयातील ‘कन्फ्युजन’

Patil_p

गणेशोत्सवात काळजी आवश्यकच!

Patil_p

भारतातील औषधी वनस्पती परंपरा

Patil_p

महाराष्ट्रातील संकटग्रस्त खासगी वनक्षेत्र

Amit Kulkarni

‘कोरोना’विरोधी लढाईतील ‘प्रंटलायनर्स’

Patil_p
error: Content is protected !!